Thursday, July 4, 2024

 वृत्त क्र. 555

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

नांदेड दि. 4 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 ऑगस्ट 2024 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी 29 जुलै, 2024 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे.  

या प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणाऱ्या 109 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 29 जुलै, 2024 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजूस गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड नि कोड-431811, संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 7219709633 वर संपर्क करावा, असेही कळविले आहे.  

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येइल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत, उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधाण्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उतीर्ण उमेदवारांना तसेच पदवी धारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 29 जुलै, 2024 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 पेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थिचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थिचे बँक खात्यामध्ये दर महा जमा करण्यात येणार असल्यामूळे प्रशिक्षणार्थिंचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 554

कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत

शासनास जमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन 

नांदेड दि.4 :-  कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन लोकांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन देण्याची योजना आहे. या  योजनेअंतर्गत रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे शासनास जमीन विक्री करणाऱ्या इच्छुक शेती विक्रेत्यांनी संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडुन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेजवळ, नांदेड या कार्यालयाशी संपर्क करावा.

अर्जासोबत विहित नमुना अर्ज फोटोसह,  भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे), दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे ), आधार कार्ड (पुरावा वय 18 ते 60 वर्ष ), जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती व नवबौद्ध), उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे), प्राधान्य(परित्यक्ता/विधवा/अनु.जाती अत्याचार पीडित) इत्यादी कागदपत्रे जोडून कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

 वृत्त क्र. 553

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये : जिल्हाधिकारी 

 चला सेतू केंद्रावर;एक रुपयात पिक विमा योजना ;१५ जुलै शेवटची तारीख 

 नांदेड, दि. 4 :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 पिक विमा पोर्टल चालू झालेले असून 15 जुलै 2024 पर्यत अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरुन घ्यावा. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा/ पुनर्गठन करुन शासनाच्या एक रुपये पिक विमा योजनेत अधिक सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

पिक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्रचालकांनी सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता  भरुन घ्यावा. तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरुस्ती करुन घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णत: बदल असेल तर, अशा शेतकऱ्यांचा विमा भरुन घेऊ नये, कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील, आधारकार्डवरील सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे.

तरी सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरीत भरून घेवून शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांचे नावात दुरुस्ती करुन घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे असे कृषि विभागाने कळविले आहे.

००००

 


माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यामध्ये कॅम्प आयोजित करणार. जिल्ह्यातील समस्त पात्र भगिनींचा सहभाग होईल याची खातरजमा प्रशासन करणार . कोणत्याही एजंटला बळी पडू नका. सर्वांना अर्ज भरण्याची संधी मिळणार : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. सर्व माध्यमांनी विपुल प्रसिद्धी द्यावी ही विनंती🙏🏻

वृत्त क्र. 552

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी

नांदेड जिल्ह्यामध्ये 8 जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी  

 

• 31 ऑगस्ट शेवटीच तारीख; धावपळ, गोंधळ करण्याची गरज नाही; सर्वांची नोंद करण्यात येईल

 

नांदेड, दि. 4 : नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनिंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन 8 जुलै पासून करण्यात येईल, असे घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केली.

 

यासंदर्भात आज जाहीर केलेल्या आपल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या योजनेच्या प्रती खुप मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतो. त्यामध्ये अनेक महत्वाचे बदल 3 जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेमधील जे लाभार्थी आहेत अशा 21 ते 65 वयोगटातील सर्व विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्ता, किंवा निराधार महिला तसेच प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना या योजनेमध्ये लाभ घेता येईल.

 

त्याचबरोबर ज्या कुटूंबामध्ये 5 एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्यांनाही या योजनेत सहभाग घेता येणार आहे. बाह्ययंत्रणा, किंवा स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी कुटुंबाचे 2.50 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब आहेत त्यामधील महिला देखील पात्र ठरतील. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेमध्ये 1 हजार 500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते अशा महिलांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही, त्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

या योजनेसाठी अर्ज करतांना कोणीही धावपळ करू नये. सुधारीत शासन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी व सुलभ झाली आहे. उत्पन्नाचा दाखल्याबाबत आता आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. रहिवासी पुराव्यासाठी 15 वर्षापूर्वीचे जुने रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असेल तर रहिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही. इतर राज्यातील विवाह करून आलेल्या महिलांसाठी त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.  

 

आता या योजनेसाठी दोन महिने म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक गावात 8 जुलै पासून या योजनेचे अर्ज करण्यासाठी शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबिरात महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी कोणीही एजंट मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींच्या अमिषाला बळी पडू नये. या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आपण स्वत: किंवा आपल्या घरातील एखादा तरुण सदस्यामार्फत अर्ज भरू शकता. छायाचित्र काढून ई-केवायसी करून इतर माहिती भरू शकता. शासनामार्फत आयोजित शिबिरातही याबाबत मदत केली जाणार. नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र महिला भगिनिंना या योजनेमध्ये लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: दक्ष आहे. प्रशासनाची सर्व टिम आपल्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारची धावपळ न करता, घाईगडबड न करता, अमिषाला बळी न पडता या योजनेसाठी अर्ज करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

0000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...