वृत्त क्र. 762
नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी
• आपले सरकार पोर्टल 2.0 नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा
• विभागप्रमुखांनी प्रलंबित तक्रारीचा निपटारा करण्यावर भर द्यावा
• जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन
नांदेड दि. 23 ऑगस्ट :- सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वारंवार भेट देण्याची गरज नसून, त्यांचा वेळ आणि मेहनत वाचविण्यासाठी शासनामार्फत आपले सरकार पोर्टल 2.0 ही तक्रार प्रणाली सर्व जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केली आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या तक्रारी करता येणार आहेत. या तक्रारीचे विहित कालावधीत निपटारा करण्यावर विभाग प्रमुखांनी प्राधान्याने भर द्यावा. तसेच त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पोर्टल प्रभावी पध्दतीने राबवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये आपले सरकार पोर्टल प्रभावी पध्दतीने राबविण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
राज्यामध्ये आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीचा 100 टक्के निपटारा व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. आज या प्रशिक्षण सत्रात ई-गव्हर्नस तज्ञ देवांग दवे यांनी या पोर्टलबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच तक्रार करण्यापासून ते तक्रारीचा निपटारा होण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. तसेच तालुका, जिल्हा पातळीवर या पोर्टलद्वारे तक्रारीच्या निवारणाबाबत पोर्टल अद्ययावत करावे.
आपले सरकार पोर्टल 2.0 ही प्रणाली पारदर्शक असून प्रत्येक तक्रारीचे ट्रकिंग आणि निराकरण सुनिश्चित केले जाते, त्यामुळे शासनावर विश्वास निर्माण होतो. आपले सरकार हे पोर्टल लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शासनाची कटिबध्दता दर्शविते. अधिकाऱ्यांनी हे पोर्टल कार्यक्षमतेने राबविणे अत्यंत महत्वाचे असून ही प्रणाली डेटा विश्लेषणाद्वारे मौल्यवान माहिती प्रदान करते. जी पुनरावृत्ती होणाऱ्या समस्यांची ओळख करुन देवून प्रणालीतील समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते. हे पोर्टलवर केलेल्या तक्रारीचे निवारण करुन सर्व शासकीय विभाग आपल्या कामाची गुणवत्ता सिध्द करु शकते. तसेच तक्रार करणारा व वरिष्ठ कार्यालये या कार्यवाहीचे अवलोकन करु शकतात अशी सविस्तर माहिती ई-गव्हर्नन्स तज्ञ देवांग दवे यांनी या पोर्टलच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.
00000