मृदा चाचणीतून शेतीत होतोय सकारात्मक बदल
-
रविशंकर चलवदे
· जागतिक मृदा दिन साजरा
नांदेड (जिमाका) दि. 5 :- शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा कार्यक्षम वापर करावा. मृदा चाचणीतून शेतीमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.
दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी नांदेड यांच्यावतीने आत्मा कार्यालय नांदेड येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड पंचायत समिती सभापतीचे प्रतिनिधी बबनराव वाघमारे तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील शास्त्रज्ञ राजीव इंगोले यांची उपस्थिती होती.
मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करून सर्वांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खताच्या मात्रा द्याव्यात, असे श्री. चलवदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतीतील मृदा नमुना कसा घ्यावा व प्रयोग शाळेमध्ये कसा पाठवायचा याविषयी शास्त्रज्ञ राजीव इंगोले यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीतील बिजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, इत्यादी घटकांचा वापर वाढवावा असे मत बबनराव वाघमारे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या मातीची तपासणी करावी असे आवाहन त्यांनी केले. तर प्रगतशील शेतकरी विश्वनाथ होळगे यांनी झीरो बजेट शेती विषयी माहिती दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भालकी, वडगाव, एमशेटवाडी, इलेचपुर, फत्तेपूर, धानोरा आदी गावातील उपस्थित शेतकरी यांना जामीन आरोग्य पत्रिकीचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोनटक्के यांनी जमिनीची होणारी धूप थांबण्याचे उपाय सांगून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केले तर शेवटी नांदेडचे तालुका कृषी अधिकारी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी
अधिकारी प्रकाश पल्लेवाड, कृषी
पर्यवेक्षक शिवाजी शिंदे, कृषी सहायक दत्तात्रय चिंतावर,
गजानन पडलवार, जावेद शेख, मोहन बेरजे, श्रीमती सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
00000