Wednesday, March 1, 2017

जिल्हा वार्षिक योजनेच्या
प्रारूप आराखड्यास मान्यता
औरंगाबाद येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न
नांदेड , दि. 1 :- जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2017-18 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदेडच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2017-18 साठी 215 कोटी 26 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्याचे वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री अर्जून खोतकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीस नियोजन विभागाचे प्रधान सचिव सुनिल पोरवाल, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, उपायुक्त नियोजन विजय आहेर, नांदेडचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, उपवनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू आदींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.
बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2017-18 च्या 215 कोटी 26 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच अतिरिक्त निधीच्या मागणीबाबतचा प्रस्तावही आगामी काळात विचारात घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. बैठकीत विभागनिहाय विविध योजना व त्याअनुषंगाने मागण्या व तरतुदींचाही आढावा घेण्यात आला.

000000
 वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 1 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे मार्च 2017 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 21 मार्च 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 22 मार्च ते शुक्रवार 24 मार्च 2017 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.

वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299/प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी  पथकाकडे  सादर  करावीत, असे सूचित केले आहे.  
लोकशाही दिनाचे 6 मार्च रोजी आयोजन
नांदेड, दि. 1 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकू घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 6 मार्च 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्‍वरुपाच्‍या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
न्याप्रविष्ट, राजस्व तसेच अपिलातील सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तसेच तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल, तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात पंधरा दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिना दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील  महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...