Monday, April 21, 2025

 वृत्त क्रमांक 415

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   

नांदेड दि. 21 एप्रिल :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 एप्रिल चे 6 वाजेपासून ते 19 मे 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त जागा, ज्याची चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 एप्रिल 2025  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 वृत्त क्रमांक 414

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 21 एप्रिल :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरले आहेत अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पद्धतीने तपासणी झाली आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. ही शेवटची संधी असून अर्ज त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी http://www.syn.mahasamajkalyan.in संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या अर्जातील त्रुटीची पुर्तता एसएमस प्राप्त झाल्याच्या 28 एप्रिल 2025 या कालावधीत कार्यालयास सादर करावयाची आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

संकेतस्थळ :- http://www.syn.mahasamajkalyan.in ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटित आले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीवर ज्या कागदपत्रांची पुर्तता केली आहे, त्याची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन ग्यानमाता शाळेसमोर नमस्कार चौक नांदेड येथे समक्ष सादर करावा. दिलेल्या मुदतीनंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण  सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहेत.

0000


 वृत्त क्रमांक 413

क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण 

नांदेड जिल्ह्याचा उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन 

नांदेड दि.२१ एप्रिल :आधार कार्ड विषयीच्या तक्रारी आता एक क्यू आर कोड स्कॅन करून सोडवता येणार आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेतला असून नागरिकांनी आपल्या आधार कार्ड संदर्भातील समस्या क्यू आर कोड स्कॅन करून सोडवाव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित असते. त्यासाठी आता आधार कार्डविषयी तक्रार कशी करावी, हे माहिती नसल्यामुळे अनेक वेळा तक्रारच नोंदवता येत नाही. त्यामुळे आधार कार्डसंदर्भात तक्रार नोंदविणे सोपे व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.  क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दिसणाऱ्या अर्जात आवश्यक माहिती भरल्यानंतर तक्रार दाखल होऊन ती निकाली काढल्या जाते.

विविध शासकीय लाभ, शैक्षणिक सुविधा, बैंक व्यवहार व ओळखपत्र म्हणून आधारकार्ड महत्त्वाचे आहे. या कार्डसंबंधात नागरिकांना अनेक प्रकारच्या तक्रारी असतात. त्यासाठी स्थानिक स्‍तरावर तक्रार निवारणाची सोय उपलब्‍ध नव्‍हती, यावर स्थानिक स्तरावरून कार्यवाही होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात जिल्हा आधार कक्षाने एक विशिष्ट कोड तयार केला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर तक्रार नोंदणी अर्ज मोबाईल किंवा संगणकावर उघडल्या जातो. यात नागरीकाचे नाव , आधार प्राधिकरणास तक्रार केली असल्‍यास त्‍याची माहिती, ईमेल, संपर्क क्रमांक इत्‍यादी माहिती नमुद केल्यानंतर सदर तक्रार आपोआप जिल्‍हा आधार तक्रार कक्षाला सादर होते. या कक्षातून त्‍यावर कार्यवाही केली जाते. जिल्‍हा कक्षाकडून तक्रारीचे निराकरण होणे शक्‍य नसल्‍यास सदर अर्ज मुंबई येथील आधार प्रकल्‍पाच्‍या प्रादेशीक कार्यालयास वर्ग केला जातो व तक्रारीचे निराकरण केले जाते.    

आधारकार्डमध्ये नावात बदल, मोबाईल क्रमांक अपडेट, पत्‍यामध्‍ये बदल  किंवा आधारकार्ड डाऊनलोड न होणे अशा प्रकारच्या आधारकार्ड धारकांच्या तक्रारी असतात. या तक्रारी आता ते केवळ एक क्यूआर कोड स्कॅन करुन सोडवू शकतात.  सदर तक्रारी आधार प्रकल्‍पाच्‍या, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई यांचेमार्फत निकाली काढल्या जाते. अशा प्रकारचा आधारकार्ड धारकांना दिलासा देणारा हा अभिनव उपक्रम आहे.

या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना खालील सुविधा लाभणार आहेत:

थेट तक्रार नोंदवण्याची सुविधा,

तक्रारींचे जलद निराकरण

सेवा प्रक्रियेतील पारदर्शकता

नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणारा पर्याय

आधारकार्ड तक्रारदारांनी क्यूआर कोड स्कॅन करून  तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 412

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार 

नांदेड दि. 21 एप्रिल :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षांपर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, आत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते.  

येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते, तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिक,सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहाकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गानी न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याच्या फायदा घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधीक्षक माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह), हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड येथील शासकीय महिला राज्यगृह अधीक्षक ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 411

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात 

जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई -ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक

6 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान

नांदेड दि. २१ एप्रिल :- वर्धा येथे जिल्हाधिकारी असताना राहुल कर्डिले यांनी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई - ऑफिस प्रणालीसाठी २०२४-२५ चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

मुंबई येथे आज प्रशासकीय दिनाच्या पर्वावर आयोजित या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा मुख्य सचिव सुजाता सौनिक  उपस्थित होत्या. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक पुरस्कार प्राप्त सनदी अधिकारी, तसेच निवृत्त सनदी अधिकारी उपस्थित होते.

नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाच्या कामात नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते. वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सन 2023-24 मध्ये यशस्वीरित्या राबविली. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली. या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान 2023-24 स्पर्धेत वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी व आताचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्य कर्तृत्वाला द्वितीय पारितोषिक जाहिर झाले आहे. विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या तालुकास्तरावर देखील त्यांनी ई -ऑफिस प्रणाली सुरू केली होती. त्यामुळे फायलींचा पसारा कमी करण्यात मदत झाली. नांदेडमध्येही त्यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे. यापूर्वी नांदेड येथे कार्यरत जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांना देखील त्यांच्या नागपूर येथील कार्यकर्तृत्वासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

00000






 वृत्त क्रमांक 410

तहसील कार्यालय नांदेड येथील लोकशाही दिन संपन्न

नांदेड दि.२१ एप्रिल :आज तहसील कार्यालय नांदेड येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन संजय वारकड तहसीलदार नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

 यावेळी उपाधीक्षक भूमि अभिलेख यांच्या अनुषंगाने एक लोकशाही दिनामध्ये प्रकरण प्राप्त त्वरित प्रकरणावर कार्यवाही करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना प्रकरण वर्ग करण्यात आला. तालुकास्तरीय लोकशाही दिन तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी घेतला  जातो. 

 आज पार पडलेल्या तालुका स्तरही लोकशाही दिनासाठी श्री परमेश्वर कदम पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन, श्री. नारवटकर सहाय्यक गटविकास अधिकारी नांदेड, श्री. मुंडे तालुका आरोग्य अधिकारी, श्री. सय्यद पोलीस उपनिरीक्षक लिमगाव, श्री. बोदगिरे उप निबंधक नांदेड, तालुका कृषी अधिकारी, दुय्यम निबंधक, नायब तहसीलदार महसूल, नायब तहसीलदार निवडणूक , तालुका पुरवठा अधिकारी, गटशिक्षणाधिकारी इत्यादी हजर होते. नांदेड तालुक्यामधील जनतेला आव्हान करण्यात येते की, ज्यांना तालुका लोकशाही दिनमध्ये तक्रार द्यावयाचे आहे. त्यांनी प्रत्येक महिन्याच्या सहा तारखेपर्यंत तक्रार द्यावी. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे,असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे.

000



वृत्त क्रमांक 409

टंचाई व नियोजनसंदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांची आढावा बैठक 

 जलसंधारण व टंचाई निवारण्याच्या कामाला प्राधान्य देण्याचे आदेश 

नांदेड दि २१ एप्रिल : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज आपल्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये विविध विभागाच्या आढावा बैठकी घेतल्या. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जिल्हा नियोजनच्या आराखड्यावरही संबंधित यंत्रणेची चर्चा केली.

पालकमंत्री अतुल सावे यांचे शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी १० वाजता आगमन झाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी त्यांचे स्वागत केले.

विश्रामगृहात त्यांच्या भेटीला यावेळी खासदार डॉ.अजित गोपछेडे,आ.राजेश पवार हे देखील आले होते.याशिवाय विविध पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

दुपारी पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विविध विभागांच्या बैठकांना सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या दिवसातील विविध विभागांकडून होणारी टंचाई निवारण व जलसंधारणाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी आज दिले.तसेच जिल्हा नियोजन समितीचे आराखडे देताना अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण आराखडे सादर करण्याबाबत तयारीला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आज सर्वप्रथम पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांची यावेळी उपस्थिती होती.

शहरातील समस्यांसंदर्भात व विविध प्रलंबित विषयांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. विशेषत: शहरातील वाहतूक,स्वच्छता,रस्ते,यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्या. शहरांमधील वाहतूक अधिक चांगली करण्याबाबतचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, यांच्यासोबत दुसरी बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठा, पाणीटंचाई, चारा टंचाई, याबाबतचे आगामी काळातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच अन्य बाबींचे काटेकोर नियोजन करण्याची यावेळी पालकमंत्र्यांनी सूचना केली.

0000






 पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विविध विभागांच्या बैठकांना सुरुवात. आज सर्वप्रथम पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. शहरातील समस्यांसंदर्भात व विविध प्रलंबित विषयांचा आढावा पालकमंत्री यावेळी विभाग प्रमुखांकडून घेत आहेत.





वृत्त क्रमांक   520 खतांची उपलब्धता पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिक ॲपचा उपयोग करावा कृषि विभागाचे आवाहन नांदेड दि. 21 मे : खरीप हंगाम 2025 लव...