Monday, April 21, 2025

 वृत्त क्रमांक 413

क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण 

नांदेड जिल्ह्याचा उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन 

नांदेड दि.२१ एप्रिल :आधार कार्ड विषयीच्या तक्रारी आता एक क्यू आर कोड स्कॅन करून सोडवता येणार आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेतला असून नागरिकांनी आपल्या आधार कार्ड संदर्भातील समस्या क्यू आर कोड स्कॅन करून सोडवाव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित असते. त्यासाठी आता आधार कार्डविषयी तक्रार कशी करावी, हे माहिती नसल्यामुळे अनेक वेळा तक्रारच नोंदवता येत नाही. त्यामुळे आधार कार्डसंदर्भात तक्रार नोंदविणे सोपे व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.  क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दिसणाऱ्या अर्जात आवश्यक माहिती भरल्यानंतर तक्रार दाखल होऊन ती निकाली काढल्या जाते.

विविध शासकीय लाभ, शैक्षणिक सुविधा, बैंक व्यवहार व ओळखपत्र म्हणून आधारकार्ड महत्त्वाचे आहे. या कार्डसंबंधात नागरिकांना अनेक प्रकारच्या तक्रारी असतात. त्यासाठी स्थानिक स्‍तरावर तक्रार निवारणाची सोय उपलब्‍ध नव्‍हती, यावर स्थानिक स्तरावरून कार्यवाही होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात जिल्हा आधार कक्षाने एक विशिष्ट कोड तयार केला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर तक्रार नोंदणी अर्ज मोबाईल किंवा संगणकावर उघडल्या जातो. यात नागरीकाचे नाव , आधार प्राधिकरणास तक्रार केली असल्‍यास त्‍याची माहिती, ईमेल, संपर्क क्रमांक इत्‍यादी माहिती नमुद केल्यानंतर सदर तक्रार आपोआप जिल्‍हा आधार तक्रार कक्षाला सादर होते. या कक्षातून त्‍यावर कार्यवाही केली जाते. जिल्‍हा कक्षाकडून तक्रारीचे निराकरण होणे शक्‍य नसल्‍यास सदर अर्ज मुंबई येथील आधार प्रकल्‍पाच्‍या प्रादेशीक कार्यालयास वर्ग केला जातो व तक्रारीचे निराकरण केले जाते.    

आधारकार्डमध्ये नावात बदल, मोबाईल क्रमांक अपडेट, पत्‍यामध्‍ये बदल  किंवा आधारकार्ड डाऊनलोड न होणे अशा प्रकारच्या आधारकार्ड धारकांच्या तक्रारी असतात. या तक्रारी आता ते केवळ एक क्यूआर कोड स्कॅन करुन सोडवू शकतात.  सदर तक्रारी आधार प्रकल्‍पाच्‍या, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई यांचेमार्फत निकाली काढल्या जाते. अशा प्रकारचा आधारकार्ड धारकांना दिलासा देणारा हा अभिनव उपक्रम आहे.

या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना खालील सुविधा लाभणार आहेत:

थेट तक्रार नोंदवण्याची सुविधा,

तक्रारींचे जलद निराकरण

सेवा प्रक्रियेतील पारदर्शकता

नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणारा पर्याय

आधारकार्ड तक्रारदारांनी क्यूआर कोड स्कॅन करून  तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार... अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे! https://notto.abd...