Friday, May 1, 2020

नांदेड जिल्हा प्रशासन आपल्या मदतीला ;
अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी व येण्यासाठी
लागणाऱ्या परवानगीची माहिती ऑनलाईन भरण्याचे आवाहन

नांदेड(जिमाका) दि. 1 :- लॉकाडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना परत त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी तसेच नांदेड जिल्ह्यातील इतरत्र अडकलेल्या व्यक्तींना परत आपल्या मुळगावी येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची आवश्यक ती माहिती ऑनलाईन पद्धतीने पुढील दिलेल्या लिंकवर भरावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावीhttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf6WqrggEuZOxh2bdjdOdMDC0Ix47ByWxQ0_9hJO2sGbUoT3w/viewform?usp=sf_link
तसेच भारताच्या व महाराष्ट्रराज्याच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना नांदेड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSed_VJMqAm5aTWZ-t7nFf8Gp8mvvAEc9AibJrzbydMZ0Tq63w/viewform?usp=sf_link
संबंधितांनी सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हाराज्यतील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून नांदेड जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर आवश्यक माहिती भरून नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-24927902462235077 ईमेल collectornanded1@gmail.com संपर्क करा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
00000

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली
ग्रामीण भागात कोरोना वॉरियर्सचे सातत्यपूर्ण कार्य
घरोघरी सर्वेक्षणाचे 3 हजार 629 पथकांमार्फत सातत्याने काम सुरु
नांदेड, (जिमाका) दि. 1 :- जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात आरोग्‍य विभागामार्फत कोविड-19 अंतर्गत कोरोना, SARI  (Severe  Acute Respiratory Illness) ILI (Influenza Like Illness) च्‍या प्रतिबंध उपाययोजनासाठी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आरोग्‍य यंत्रणा सक्षमरित्‍या कार्य करीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी योग्‍य ती पावले उचलत आहे.  घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी आशा, आरोग्‍य सेवक आणि समुदाय आरोग्‍य अधिकारी यांची 3 हजार 629 पथके तयार करण्‍यात आली असून  या पथकामार्फत ग्रामीण भागात दैनंदिन सर्वेक्षण मागील दिड महिण्‍यांपासून सातत्‍याने करण्‍यात येत आहे.
या सर्वेक्षणामध्‍ये जिल्‍ह्यातील प्रत्‍येक गावात, वाडी, वस्‍त्‍यांमध्‍ये बाहेर जिल्‍ह्यातून येणाऱ्या सर्व व्‍यक्‍तींची ताप सर्दी खोकला व तत्सम लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची माहिती घेऊन अति जोखमीच्‍या व कमी जोखमीच्‍या रुग्‍णांना आवश्‍यकतेनुसार कोरोना केअर सेंटर अथवा जिल्ह्याच्‍या डेडीकेटेड कोविड  हॉस्पिटल्‍स येथे दाखल करण्‍यात येत आहे.
नांदेड जिल्‍ह्यात 20 ठिकाणी कोविड केअर सेंटर्स आणि ताप उपचार केंद्र असून एकुण 3 हजार 50 खाटा उपलब्‍ध आहेत. सात ठिकाणी डेडीकेटेड कोविड केअर सेंटर्स असून तेथे एकुण 480 खाटा उपलब्‍ध आहेत. तसेच शासकिय व खाजगी अशा 9 डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल्‍समध्‍ये 780 खाटांची उपलब्‍धता करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार जिल्‍ह्यात एकुण 4 हजार 310 खाटा उपलब्‍ध केल्‍या आहेत.
गुरुवार 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्‍ह्यात 84 हजार 23 व्‍यक्‍ती अन्‍य देशातून, राज्‍यातून व जिल्‍ह्यातून नांदेड जिल्‍ह्यात आले असून त्‍यांची प्रत्‍येकाची आरोग्‍य तपासणी करुन 28 दिवसाच्‍या होम क्‍वारंटाईनचा सल्‍ला देऊन, हातावर होम क्‍वॉरेंटाईन शिक्‍के मारण्‍यात येऊन निरिक्षणाखाली ठेवण्‍यात आले आहे.
नांदेड जिल्‍ह्यातील सर्व गावांमध्‍ये कोरोना विरोधात जनजागृती करण्‍यात येत आहे. आरोग्‍य विभाग कोरोना महामारीच्‍या परिस्‍थीतीवर ग्रामीण भागात विशेष दक्षता घेत आहे. कोविड-19 या आजाराचे 6 रुग्‍ण जिल्‍ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आजपर्यंत आढळले असून आरोग्‍य विभाग व अन्‍य यंत्रणांमार्फत उपाययोजना करण्‍यात येत आहेत. नांदेड शहराच्‍या या भागामध्‍ये दैनंदिन सर्वेक्षण करण्‍यात येत असून ग्रामीण भागात बाहेर राज्‍यातून  प्रवास करुन आलेला एक व्‍यक्‍ती क्‍वारंटाईनमध्‍ये नांदेड येथे असतांना कोविड पॉझिटीव्‍ह आढळून आला आहे. त्‍या भागात सर्वेक्षण व प्रतिबंधात्‍मक उपाय योजना करण्‍यात येत आहेत.
ग्रामीण, शहरी भागातील जनतेने घाबरुन जाऊ नये व आपल्‍या घरातच राहावे. गरज असेल तरच बाहेर जावे. ताप किंवा कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळल्‍यास तातडीने नजिकच्‍या ताप उपचार केंद्रामध्‍ये जाऊन तपासणी व उपचार करुन घ्‍यावेत. सर्वेक्षणात आपल्‍या घरी येणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना  योग्‍य ती खरी माहिती देऊन सहकार्य करावे. हात वारंवार साबणाने स्‍वच्‍छ धुवावेत, संपर्कातील व्‍यक्‍तींशी योग्‍य अंतर ठेवावे, मास्‍क अथवा स्‍वच्‍छ रुमाल वापरावा, साथ पसरु नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्‍यावी. आपल्‍या मोबाईल मध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाउनलोड करुन त्‍याचा वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी व प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.
जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आरोग्‍य यंत्रणा सक्षमरित्‍या कार्य करीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी योग्‍य ती पावले उचलत आहे. आरोग्‍य सेविका, आरोग्‍य सेवक, आशा, अंणवाडी कार्यकर्ती इत्‍यादी कर्मचारी हे नांदेड जिल्‍ह्यातील आरोग्‍य यंत्रणेचे खरे कोरोना वॉरियर्स असून ते तालुका आरोग्‍य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली कोरोना (कोविड-19) अनुषंगाने ग्रामीण भागात कोरोना विरुध्‍दचा लढा अतिशय  सक्षमपणे लढत आहे. - डॉ. बालाजी शिंदे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड.
00000



शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प ;
जलाशयाच्या दोन्ही तिरावरील बागायतदारांनी
नियोजनानुसार पाण्याचा योग्य वापर करावा  
·         अवैध पाणी उपसा केल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार   
नांदेड(जिमाका) दि. 1 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयाच्या दोन्ही तीरावरील बागायतदारांनी नियोजनानुसार पाण्याचा योग्य वापर करावा व पाण्याचा नाश, अपव्यय टाळावा. विद्युत पुरवठा बंद कालावधीत अनाधिकृत विद्युत जोडणी होत असल्यास व अवैध पाणी उपसा करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. बंद कालावधीत मोटार बंद ठेवून जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयावरील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 30 एप्रिल रोजी घेण्यात आली. या बैठकीतील निर्देशानुसार शेतीचा पाणीवापर काही प्रमाणात मर्यादीत करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार 1 मे 2020 ते 10 मे 2020 पर्यंत या भागातील सिंगल फेज विद्युत पुरवठा वेळापत्रकाप्रमाणे दररोज सुरु राहिल व शेतीपंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा एक दिवसआड सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर सोमवार 11 मे 2020 रोजी झालेल्या पाणी वापराची आढावा बैठक घेऊन विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा  निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.
00000


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने सोहळा साजरा  
महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण
यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण संपन्न
नांदेड, (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या  60 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण आज संपन्न झाला. 
कोरोना विषाणुंच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन करुन अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात आला. 
याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







पिरबुऱ्हाणनगर, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रुग्णांचा मृत्यू
पॉझिटिव्ह चार रुग्णांची प्रकृती स्थीर, संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
नांदेड, (जिमाका) दि. 1 :- कोरोना विषाणु संदर्भात आज शुक्रवार 1 मे 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात 1 हजार 112 संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण घेण्यात आलेले स्वँब 985 असून त्यापैकी 962 जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे तर  7 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 5 जणांचा स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. चार जणांचा निष्कर्ष निघाला नाही. घेण्यात आलेले स्वँब 985  त्यापैकी 6 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आहेत.
पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा (वय 64 वर्ष) पॉझीटिव्ह अहवाल हा बुधवार 22 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता सदर रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यांसारखे गंभीर आजार होते. रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे गुरुवार 30 एप्रिल रोजी झाला असून मृताचा दफनविधी हा आसरानगर कबरस्तान येथे पाच व्यक्तिंच्या उपस्थितीत ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आला. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले होत त्या सर्व व्यक्तींचे अहवाल पहिल्यांदा निगेटिव्ह आले आहेत. त्याप्रमाणे 51 निकटवर्तीय व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वँब घेण्यात आलेले असून त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला रुग्णाचा (वय वर्ष 51 ) पॉझीटिव्ह अहवाल हा 30 एप्रिल रोजी प्राप्त झाला. या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. या  रुग्णाने औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे सदर रुग्णाचा मृत्यू गुरुवार 30 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे झाला.
नांदेड शहरातील अबचलनगर येथील एका रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल रविवार 26 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वँब घेण्यात येवून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 व्यक्तींच्या स्वँब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.
श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे ­2 वाहनचालक आणि त्यांचा एक मदतनीस यांचाही स्वँब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. सदर वाहन चालक आणि मदनीस हे गुरुवार 23 एप्रिल रोजी पंजाब येथे जाऊन मंगळवार  28 एप्रिल रोजी परत आले असता त्यांना नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सिमेवरच अडवून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. या तीन व्यक्तींचे बुधवार 29 एप्रिल रोजी स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले होते. सद्यस्थितीत या रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचार सुरु आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या सर्व कोरोना बाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु आहेत. जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


पोलीस दलातील आठ अधिकारी कर्मचाऱ्यांना
पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह जाहीर ;   
पालकमंत्री  अशोक चव्हाण यांनी केला  सत्कार
नांदेड, (जिमाका) दि. 1 :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात  आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नांदेडच्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी बोधचिन्ह आणि सन्मानचिन्ह जाहीर केले आहे.याबद्दल या सर्वांचा सत्कार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन  केला.
यामध्ये प्रशांत अनंतराव पवार पोलीस निरीक्षक यांना सतत 15 वर्षे उत्तम सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार,  खामराव रामराव वानखेडे सहपोलीस उपनिरीक्षक मांडवी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना पोलीस पदक,  अशोक शिवदास देशमुख पोलीस हेडकॉन्स्टेबल नांदेड ग्रामीण याना सेवेत सतत 15 वर्षे उत्तम कामगिरीबद्दल आणि माधव मोहनराव पल्लेवाड पोलिस हेडकॉन्स्टेबल नाहरा उत्तम सेवा पंधरा वर्ष पूर्ण केल्याबद्दल, बालाजी गणपतराव सोनटक्के दहशतवादी विरोधी पथक यांनी दरोडेखोर, गुन्हेगारांची टोळी विरुद्ध केलेली कारवाई विषयी पोलीस पदक, शामसुंदर यादवराव छात्रकर  उस्माननगर, दरोडेखोर गुन्हेगारीच्या टोळीयुद्ध केलेली कार्यवाही याविषयी सन्मान सूर्यकांत व्यंकटराव घुगे ईतवारा पोलीस स्टेशन सेवेत सतत 15 वर्षे उत्तम कामगिरीबद्दल, मारुती रामराव केसगिर पोलीस मुख्यालय नांदेड पंधरा वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मान
खामगाव हद्द या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र मनोज लोहिया,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर , जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त  डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अरुण जऱ्हाड यांची उपस्थिती होती.
00000


क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघातर्फे
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 ला 51 हजारची मदत,
 पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केला धनादेश सुपूर्द
           
नांदेड, (जिमाका) दि. 1 :-  कोरोनाचा उपचारासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील विविध दानशूर व्यक्ती, संस्था भरभरुन मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19 साठी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम) महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 साठी 51 हजार रुपयाचा धनादेश तथा  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, "लसाकम"चे महासचिव गुणवंत काळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के,  जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, सचिव डॉ. अशोक झुंजारे आदींची उपस्थिती होती.
00000


लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या लोकांना
त्यांच्या गावी जाण्यास कार्यप्रणाली निश्चित
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश निर्गमीत
नांदेड, दि. 1 :- लॉकडाऊनच्या कालावधीत विविध राज्यात, जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना नांदेड जिल्ह्यात येण्यासाठी व नांदेड जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या संबंधित राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता आवश्यक असणारी परवानगी देण्यासाठी संबंधीत जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.
नांदेड जिल्ह्यातून राज्यांतर्गत, परराज्यात वरीलप्रमाणे नमूद लोकांना जाण्यासाठी करावयाची कार्यप्रणाली पुढील प्रमाणे राहील.
संबंधित तहसिलदार हे तहसिल स्तरावर अशा लोकांची यादी तयार करतील. यादीनुसार तालुका स्तरावरील कॅम्प किंवा रवानगीच्या ठिकाणी अशा सर्वांची थर्मल व वैद्यकिय तपासणी करुन त्याबाबतचे संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे. या तपासणीत कोरोना रोगाचे लक्षणे नसलेल्या व्यक्तिंची यादी ते ज्या राज्यातील आहेत त्या राज्य, जिल्हा, तालुका, गाव या पद्धतीने तयार करण्यात यावी. प्रवासासाठी पात्र व्यक्तिंची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय अधिकारी तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे सादर करावी. अशा याद्या तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती ज्या राज्यात जात आहेत त्या व्यक्तिच्या रहिवास पर्यंतचा रुट प्लॅन तयार करण्यात यावा. त्यानंतर ही यादी जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करावी. यादीस मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधीत सक्षम प्राधिकारी / जिल्हाधिकारी यांना ते सादर करुन त्यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर अशा व्यक्तिंना प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाची निर्जतूकिकरण करुन रवानगीची कार्यवाही त्या-त्या ठिकाणावरुन करावी. वाहनासोबत प्रवाशांची यादी, वैद्यकीय प्रमाणपत्र, वाहन पास, रुट प्लॅन, संबंधीत प्रवाशांचे हमी प्रमाणत्र ठेवावे.
नांदेड जिल्ह्यात राज्यांतर्गत / पराज्यातून येणाऱ्या लोकांना नांदेड जिल्ह्यात येण्यास परवानगीबाबची कार्यवाही राज्यांतर्गत / परराज्यातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तिंची संबंधीत नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होणारी यादी / जोडपत्र मधील परवानगी वैद्यकीय प्रमाणपत्र, रुटप्लॅन, वाहनाची परवानगी, वाहनाचे प्रकार, प्रवासाचा कालावधी इत्यादी पत्रासह माहिती प्राप्त झाल्यानंतर अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यास समन्वय अधिकारी तहसलिदार संगायो श्रीमती वैशाली पाटील, डॉ. मृणाल जाधव, डॉ. संजय बिराजदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर संबंधितांना परवानगीचे पत्र पाठवावे. अशी प्राप्त संबंधीत तहसिलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी.
याप्रमाणे येणाऱ्या व्यक्तिंची नांदेड जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी वैद्यकिय पथक गठित करण्यात यावे. ज्यामध्ये पोलीस, महसूल व वैद्यकिय अधिकारी यांचा समावेश असावा. या पथकामार्फत आलेल्या प्रत्येक व्यक्तिंची थर्मल गनद्वारे व इतर अनुषंगिक तपासणी करुन तपासणीअंती आवश्यकतेनुसार होम क्वारंटाईन किंवा आ यशोलेशन क्वारंटाईन करण्याची कार्यवाही करावी. ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे अशा व्यक्तिंची पुढील 14 दिवसांसाठी शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिक, नगरपंचायत हे पाहतील तर ग्रामीण भागात संबंधीत ग्रामसेवक हे पाहतील.
वरीलप्रमाणे सर्व संबंधीत तहसिलदार यांनी अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सनियंत्रणेत वेळेत जबाबदारी पार पाडावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, समूह यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी  निर्गमीत केले आहेत.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...