Monday, September 18, 2017

नांदेड मनपा निवडणुकीसाठी
विविध बाबींवर निर्बंध आदेश  
नांदेड दि. 18 :- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 ची घोषणा केली असून त्यानुसार या नांदेड मनपा क्षेत्रात आचारसंहिता अंमलात आली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय्य वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून शासकीय विश्रामगृह, ध्वनिक्षेपक, मिरवणुका, घोषणा, उपोषण, सभा, शासकीय वाहन, वाहनावर प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे, मतदान व मतमोजणी केंद्र याविषयी निर्बंध जारी केले आहेत.  
नांदेड शहरासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी हे आदेश काढले आहेत. हे आदेश निर्गमीत झाल्यापासून शुक्रवार 13 ऑक्टोंबर 2017 पर्यंत अंमलात राहतील.
विश्रामगृहाच्या वापरावर नियंत्रण
शासकीय व निवडणुकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्‍या पूर्व परवानगी शिवाय नांदेड शहरातील शासकीय, निमशासकीय विश्रामगृहात अथवा त्‍या परिसरात प्रवेश करता येणार नाही.
ध्‍वनीक्षेपक, ध्‍वनिवर्धकाचा वापर नियमन व नियंत्रण
कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर सक्षम प्रधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगी शिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावरील ध्वनीक्षेपक वापर करता येणार नाही. जिल्हाधिकारी यांचे आदेश 24 ऑगस्ट 2017 नुसार ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर ध्‍वनी प्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही.
कार्यालये, विश्रामगृहे इत्‍यादी परिसरात
मिरवणुका, घोषणा, उपोषण, सभा घेण्यावर निर्बंध
निवडणुकीच्या कालावधीत नांदेड शहरातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय, विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  
शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध 
नांदेड शहरासाठी निवडणुकीच्या कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाड्या अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. 
निवडणूक प्रचारासाठी वापरण्‍यात येणाऱ्या वाहनांवर
पक्ष प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे बाबत
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचारासाठी वापरण्‍यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्‍यादी बाबींसाठी पुढील प्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. फिरत्‍या वाहनांनवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्‍या डाव्‍या बाजुला विंड स्‍क्रीन ग्‍लासच्‍या पुढे राहणार नाही आणि तो त्‍या वाहनाच्‍या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्‍त राहणार नाही. प्रचाराच्‍या फिरत्‍या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्‍या आसनामागे वाहनाच्‍या डाव्‍या व उजव्‍या बाजुनेच लावण्‍यात यावा, इतर कोणत्‍याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्‍या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्‍या वाहना व्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही वाहनावर लावता येणार नाही.
मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंध
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक हद्दीत ज्याठिकाणी बुधवार 11 ऑक्टोंबर 2017 रोजी मतदान होणार आहे त्याठिकाणापासून 200 मीटर परिसरात व गुरुवार 12 ऑक्टोंबर 2017 रोजी ज्‍या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतिरिक्‍त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्‍या कामाव्‍यतिरिक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरिता प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
हा आदेश नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक हद्दीत मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्र परिसरात बुधवार 11 ऑक्टोंबर रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यंत व मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात गुरुवार 12 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी सुरु झाल्‍यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.

00000
सोयाबीन, कपाशीवरील रोग
नियंत्रणासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 18 :-  जिल्ह्यात सोयाबीन, कापुस पिकांसाठी कीड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
सोयाबीनवरील चक्री भुंगा, उंटअळी, पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी स्पीनोटोरोम 11.7 एस.सी. 9 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 एस. सी. 3 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी बुप्रोफेझीन 25 टक्के एस. सी. 10 मिली प्रती दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे  यांनी केले आहे.

000000
ऑक्टोंबरचा लोकशाही दिन रद्द
नांदेड दि. 18 :-  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील मंगळवार 3 ऑक्टोंबर 2017 चा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
ऑक्टोंबर महिन्यातील पहिला सोमवार 2 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक सुट्टी त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस मंगळवार 3 ऑक्टोंबर रोजीचा लोकशाही दिन आचारसंहितेमुळे रद्द केला आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन झाल्याने  
दहा कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबीत ;
तक्रारींसाठी संपर्क साधण्याचे आवाहन 
नांदेड दि. 18 :- खत विक्री केंद्राकडून खत नियंत्रण आदेश 1985 चे खंड 35 चे उल्लंघन झाल्याने खताची विक्री करु नये म्हणून जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील दहा परवाने नुकतेच निलंबीत केले आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे, खते किटकनाशकांच्या बाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल एसएमएसद्वारे तसेच कृषि विभागाचा क्रमांक (02462) 234767 भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
निलंबीत परवान्यांमध्ये श्री रोहीत ग्रो एजन्सीज नवा मोंढा नांदेड, विठ्ठल भांडार नवा मोंढा नांदेड, जाधव कृषि सेवा केंद्र नवा मोंढा नांदेड, नवभारत ट्रेडिंग कंपनी नवा मोंढा नांदेड, श्री संतकृपा बीज भांडार इतवारा नांदेड, विलास ग्रो एजन्सीज वाडीपाटी नांदेड, साईकृपा कृषि विकास केंद्र नवा मोंढा नांदेड, गुरुकृपा फर्टीलायझर्स नवा मोंढा नांदेड, प्रथमेश ग्रो एजन्सीज मालेगांव रोड खुरगावफाटा नांदेड, नायगाव तालुक्यातील कृष्णुर येथील विजयालक्ष्मी कृषि सेवा केंद्र यांचा समावेश आहे.  ग्रीष्मा ग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे विद्राव्य खताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेस पाठविले असता ती निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने कंपनीवर यापर्वी गुन्हा नोंद झाला आहे. विद्राव्य खते परवान्यात समाविष्ट करुन घेता खताची खरेदी विक्री, रासायनिक खताचे मासिक खरेदी विक्री अहवाल नियमित सादर करणे, आदी त्रुटीमुळे खत परवाने निलंबनाचा प्रस्ताव नांदेड जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला होता.
जिल्हयातील शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते किटकनाशक औषधी अधिकृत परवानाधारक  विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. फसवणूक टाळण्यासाठी विक्रेत्याकडून पक्क्या पावती घ्यावी. पावतीवर शेतकरी विक्रेता या दोघाच्या स्वाक्षरी असावी. कमी वजनाची छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने बियाणे, रासायनिक खते किटकनाशक औषधी विक्री होत असल्यास, जादा दराने तसेच कच्ची पावतीद्वारे बियाणे खताची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ कृषि विभागास, तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती कृषि अधिकारी जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...