Saturday, January 6, 2024

वृत्त क्र. 22 

समाज घडविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची

- जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे 

नांदेड (जिमाका), दि. 6 :- पत्रकारीतेची जबाबदारी ही मोजता येत नाही. आपण जे काही लिहतो अथवा अभिव्यक्त होतो ते वास्तवाशी कितपत खरे उतरणारे आहे हे स्वत:च तपासून घेतले पाहिजे. आपण ज्या बाजूने लिहितो त्याची दुसरी बाजू अभ्यासून घेतली पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला अचूक बातमी घडवू शकते. अचूक बातमी समाजात सकारात्मक विश्वासार्हता निर्माण करु शकते. मात्र चुकीच्या आधारावर, माहितीवर केलेली बातमी अथवा भाष्य कुणाच्या आयुष्याला उध्वस्त करु शकते हे आपण समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. 

जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, माधवराव पवार, उर्दू दै. आलमी तेहरीकचे संपादक अलताफ अहेमद सानी, उर्दू दै. तहेलका टाईम्सचे संपादक महमद ताहेर सौदागर, दै. गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, दै. एकमतचे आवृत्ती प्रमुख चारुदत्त चौधरी, उर्दू दै. नांदेड टाईम्सचे संपादक मुन्‍तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, उर्दू दै. गोदावरी ऑब्झर्वरचे संपादक महमद अब्दुल मुख्तार आबेद, पत्रकार प्रकाश काबंळे, अहमद करखेलीकर, राम तरटे आणि नांदेड जिल्ह्यातील मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. 

समाज घटकातील प्रत्येक घटनेच्या ठिकाणी पत्रकार सर्वात अगोदर पोहोचतो. आहे त्या परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडतो. नागरिकांच्या अडी-अडचणी समजून घेतो. समाजाचे प्रश्न, अडचणी, समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी पत्रकार प्रभावीपणे करीत असतात. ही जबाबदारी पार पाडतांना पत्रकारांनी सकारात्मक समन्वय साधण्यावर अधिक भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केली. 

ज्या प्रमाणात विविध माध्यमांची संख्या वाढत आहे त्याच प्रमाणात माध्यम प्रतिनिधींची संख्या वाढत आहे. समाजात माध्यमे वाढणे ही सकारात्मक बाब आहे. ही सकारात्मकता पाहत असताना माध्यम म्हणून, माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून आपलीही कायद्याच्या दृष्टीने जबाबदारी वाढलेली आहे याचा विसर पडता कामा नये असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. समाजाला जागे करण्याची भूमिका पत्रकाराची आहे. बातम्यांमुळे कामकाजात सुधारणा होते असे त्यांनी सांगितले. 

यावेळी अनिकेत कुलकर्णी, अलताफ अहेमद सानी, केशव घोणसे पाटील, प्रकाश कांबळे, महमद अब्दुल मुख्तार आबेद, मुन्‍तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, अहमद करखेलीकर यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. सुत्रसंचलन व आभार पत्रकार राम तरटे यांनी मानले. पोलीस स्थापना दिवस सप्ताहाच्या निमित्ताने यावेळी आपल्या कलात्मक सादरीकरणातून समाजात चेतना व प्रेरणा निर्माण करणाऱ्या पोलीस बॅड पथकाचा यावेळी सन्मान करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम एक आकलन हे पुस्तक व स्मृतिसंदर्भिका उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकारांना देण्यात आले. यावेळी दै. गोदातीर समाचारच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

00000








छायाचित्र : पुरूषोत्तम जोशी

वृत्त क्र.  21 

 माळेगाव यात्रेसाठी संकेतस्थळाची निर्मिती

- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

  ·    लाईव्ह दिशादर्शकासह यात्रेसंदर्भात इत्यंभूत माहिती  

नांदेड (जिमाका), दि. 6 :  दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील श्री खंडोबाची यात्रा येत्या 10 जानेवारीपासून सुरू होत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पहिल्यांदाच माळेगाव यात्रेसंदर्भात संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लाईव्ह दिशादर्शकासह यात्रेची इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. 

दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये माळेगाव येथे यात्रा भरणार आहे. यानिमित्त भाविकांना यात्रेत विविध सुविधा प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या माहितीसाठी माळेगाव यात्रासंबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. http://malegaonyatra.ceozpnanded असे संकेतस्थळाचे नाव असून या संकेतस्थळावर माळेगाव यात्रेची माहिती देण्यात आली आहे.  

यामध्ये माळेगाव यात्रेत देण्यात आलेल्या सुविधा, नागरिकांनी माळेगावात कसे यावे, आपत्कालीन संपर्क नंबर, लाईव्ह दिशादर्शकही यात देण्यात आले आहेत. संपूर्ण माळेगाव यात्रेचा नकाशा, माळेगाव यात्रेतील कार्यक्रम, कला महोत्सवाच्या ठिकाण, मंदिराचे ठिकाण, कुस्त्याचे मैदान, कृषी व पशुप्रदर्शन, शौचालयाचे ठिकाण अशा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जिथे आपल्याला जायचे आहे त्याठिकाणी संकेतस्थळावरील मॅपच्या मदतीने भाविकांना जाता येणार आहे. अशा पद्धतीने या संकेतस्थळाचा फायदा होणार आहे.  

तसेच या वेबसाईटवर मंदिर स्थळदर्शक नकाशा, यात्रेची पंरपरा व इतिहासाची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे संदेश तसेच माळेगाव यात्रेचे फोटो गॅलरी देखील या संकेतस्थळावर राहणार आहे. यात्रेदरम्यानचे विविध कार्यक्रमांच्या फोटोसह हे संकेतस्थळ यात्रा कालावधीत वेळोवेळी अपडेट करण्यात येणार आहे. नागरिकांनी सदर संकेतस्थळ स्थळाला भेट देऊन यात्रेसंदर्भातील माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 20

 नांदेड जिल्ह्यात 785 पोलीस पाटील पदांसाठी

भरती प्रक्रिया सुरू 

·   ऑनलाईन अर्ज करण्याची जानेवारी पर्यंत मुदत

नांदेड (जिमाका), दि. 6 :  नांदेड जिल्ह्यातील उपविभागांतर्गत कार्यरत 16 तालुक्यातील पोलीस पाटील पदाची भरती करण्यासाठी जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने https://nanded.gov.in  https://nanded.applygov.net या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  पोलीस पाटील  पदासाठी भरावयाच्या पदांची संख्या उपविभाग निहाय पुढीलप्रमाणे आहे. यात नांदेड उपविभागात 88, भोकर 82, कंधार 170, हदगाव 101, देगलूर 143, धर्माबाद 64, बिलोली 97 तर किनवट उपविभागात 40 पदे असून एकुण पदासंख्या 785 एवढी आहे. 

या पदाच्या भरतीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि. ते सोमवार जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार आहेत. मंगळवार जानेवारी रोजी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बुधवार 10 ते शनिवार 13 जानेवारी कालावधीत उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करून घ्यावे लागतील. तर या पदासाठी रविवार 14 जानेवारी 2024 रोजी लेखी परीक्षा नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेत प्रत्येक प्रश्नास एक एकुण याप्रमाणे 80 गुणांची राहील. परिक्षेचा अवधी दोन तासांचा असेल. रविवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी वाजेपर्यंत उत्तरपत्रिकेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचा nandedrdc@gmail.com या ईमेलवर आक्षेप सादर करता येतील. सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईलअसे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

0000

 वृत्त क्र. 19 

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम अंतर्गत

आतापर्यंत 130.10 कोटी रुपयांचा पिक विमा वाटप

 

नांदेड (जिमाका), दि. 6 :  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत आतापर्यंत 130.10 कोटी 25 टक्के अग्रिम पिक विमा वाटप करण्यात आला आहे. 

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सर्व 93 महसूल मंडळामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अँडव्हर्सिटी) मंजूर करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यास 285 कोटींचा 25 टक्के अग्रिम मंजूर झाला आहे.  त्यापैकी आता पर्यंत 130 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती विमा कंपनी दिली आहे. यावर्षी प्रथमच केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आधार प्रणालीद्वारे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टलवरून नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात येत आहेत.

 

पिक विमा नुकसान भरपाई अदा करण्यास होत असलेल्या विलंबासंबंधी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचेमार्फत पाठपुरावा चालू आहे. नुकसान भरपाई अदा करण्यास पोर्टलवरील काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असून लवकरच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती विमा कंपनीने दिली  आहेअसे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000  

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...