Saturday, January 6, 2024

वृत्त क्र.  21 

 माळेगाव यात्रेसाठी संकेतस्थळाची निर्मिती

- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

  ·    लाईव्ह दिशादर्शकासह यात्रेसंदर्भात इत्यंभूत माहिती  

नांदेड (जिमाका), दि. 6 :  दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील श्री खंडोबाची यात्रा येत्या 10 जानेवारीपासून सुरू होत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पहिल्यांदाच माळेगाव यात्रेसंदर्भात संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लाईव्ह दिशादर्शकासह यात्रेची इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. 

दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये माळेगाव येथे यात्रा भरणार आहे. यानिमित्त भाविकांना यात्रेत विविध सुविधा प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या माहितीसाठी माळेगाव यात्रासंबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. http://malegaonyatra.ceozpnanded असे संकेतस्थळाचे नाव असून या संकेतस्थळावर माळेगाव यात्रेची माहिती देण्यात आली आहे.  

यामध्ये माळेगाव यात्रेत देण्यात आलेल्या सुविधा, नागरिकांनी माळेगावात कसे यावे, आपत्कालीन संपर्क नंबर, लाईव्ह दिशादर्शकही यात देण्यात आले आहेत. संपूर्ण माळेगाव यात्रेचा नकाशा, माळेगाव यात्रेतील कार्यक्रम, कला महोत्सवाच्या ठिकाण, मंदिराचे ठिकाण, कुस्त्याचे मैदान, कृषी व पशुप्रदर्शन, शौचालयाचे ठिकाण अशा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जिथे आपल्याला जायचे आहे त्याठिकाणी संकेतस्थळावरील मॅपच्या मदतीने भाविकांना जाता येणार आहे. अशा पद्धतीने या संकेतस्थळाचा फायदा होणार आहे.  

तसेच या वेबसाईटवर मंदिर स्थळदर्शक नकाशा, यात्रेची पंरपरा व इतिहासाची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे संदेश तसेच माळेगाव यात्रेचे फोटो गॅलरी देखील या संकेतस्थळावर राहणार आहे. यात्रेदरम्यानचे विविध कार्यक्रमांच्या फोटोसह हे संकेतस्थळ यात्रा कालावधीत वेळोवेळी अपडेट करण्यात येणार आहे. नागरिकांनी सदर संकेतस्थळ स्थळाला भेट देऊन यात्रेसंदर्भातील माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  महत्त्वाचे वृत्त  क्र.  108      चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही     ·           कोणत्याही अफवांना ब...