Tuesday, April 21, 2020


नांदेड शहरातील पिरबुरहान भागात
64 वर्षीय कोरोनाचा संशयित रुग्ण पॉझिटिव्ह ;
जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून सहकार्य करावे
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन ;
पिरबुरहान भागाचा पाच कि.मी. परिसर पूर्णतः सील
नांदेड दि. 22 :-  कोव्हीड-19 चे अनुषंगाने नांदेड शहरातील पिरबुरहान भागातील 64 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जनतेने घाबरून न जाता, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
हा रुग्ण सोमवार 20 एप्रिल 2020 रोजी दुपारी शासकीय महाविद्यालय नांदेड येथे ताप खोकला व दम लागणेच्या तक्रारीमुळे दाखल झाला होता. या रुग्णावर उपचार सुरु असून पिरबुरहान भागाच्या आसपासचा पाच कि.मी.चा परिसर पूर्णतः सील करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सील केलेल्या भागात रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत. 
000000



प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा सुधारीत आदेश निर्गमीत ;
वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करण्यास परवानगी,
मास्क व सॅनिटायजरचा वापर आवश्यकच;
ई-कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने
आवश्यक परवानगीसह चालू ठेवता येतील
            नांदेड दि. 21 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम 144 ची मुदत 20 एप्रिल ते 3 मे 2020 पर्यंतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहे.
महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडील अधिसुचनेनुसार राज्य शासनाचे आदेश 21 एप्रिल 2020 अन्वये प्राप्त निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 मधील जमावबंदी आदेशामध्ये नमुद बाबींमध्ये पुढीलप्रमाणे सुधारीत आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (i) मधील प्रसारमाध्यमासह इलेक्ट्रॉनिक मिडिया ज्यामध्ये डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असले. (तथापि वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करता येणार नाही) ऐवजी प्रसारमाध्यमासह इलेक्ट्रॉनिक मिडिया ज्यामध्ये डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असले (वृत्तपत्राची घरपोच सेवा मागणीदाराला पूर्वकल्पना देवून सुरु करता येईल. तथापी घरपोच वृत्तपत्र, दैनिक, मासिके वितरण करणाऱ्या व्यक्तिने चेहऱ्यावर मास्क वापरणे, हाताला वारंवार सॅनेटायझरचा वापर करणे आणि सामाजिक सुरक्षेच्या मानकाची पूर्तता करणे या अटीवर वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.)
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (V) मधील ई-कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने आवश्यक त्या परवानगीसह चालू ठेवता येतील. ज्यामध्ये अन्न, औषधे, वैद्यकिय उपकरणे आणि विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे या सारख्या सर्व प्रकारचे वस्तु आणि मालाचा पुरवठा ऐवजी  ई-कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने आवश्यक त्या परवानगीसह चालू ठेवता येतील. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अन्न, औषधी आणि वैद्यकिय उपकरणे असा बदल करण्यात येतो.
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचा आदेश दिनांक 19 एप्रिल 2020 मधील मुळ मुद्दा क्र. 11 (XIII) मधील कन्फेशनरी, फरसाणा, मिठाई दुकान (उक्त ठिकाणी खाण्याची बैठक व्यवस्था नसावी) ही परवानगी (वगळण्यात) रद्द करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 13, 15 19 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई आदेश दि. 3 मे 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले आहे. तसेच 20 एप्रिल 2020 रोजीच्या शुद्धीपत्रकान्वये शासकीय, निमशासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारी आस्थापना व त्यांच्याशी निगडीत दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने (केवळ अशा आस्थापना, दुकाने ज्यांना 13, 15 19 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशानुसार चालू ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे) हे केवळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहतील असे याद्वारे आदेशित केले आहे.
          सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
            तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने निर्गमित केलेले दि. 13, 15, 19 एप्रिल 2020 वर नमूद आदेश व दिनांक 20 एप्रिल 2020 वर नमूद शुद्धीपत्रकाद्वारे दिलेले वेळेचे बंधन इत्यादीसह अंमलात राहील, असे सुधारीत आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 21 एप्रिल 2020 रोजी निर्गमित केले आहे.  
00000


नागरीसेवा दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांना पुष्प तसेच डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मृतीचिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या.  (छाया : विजय होकर्णे, नांदेड)











नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात, दिलासादायक परिस्थिती
कोरोना : आतापर्यंत 378 नमुने निगेटीव्ह ;
66 नागरिकांचा तपासणी अहवाल बाकी
            नांदेड दि. 21 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने नांदेड जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 683 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 222 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 89 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 70 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 613 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 66 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 449 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 378 नमुने निगेटीव्ह आले असून 66 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 77 हजार 676 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
00000


जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांसह विशेषत:
कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी
आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांनी विशेषत : कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपून प्ले स्टोअर मधून आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा. तसेच या आरोग्य सेतू ॲपमध्ये प्रवासाची व आरोग्याची खरी माहिती देऊन प्रशासनास मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
सध्यस्थितीमध्ये सर्वत्र कोरोना विषाणूची लागण होऊन संपूर्ण जगभर प्रादुर्भाव वाढत असून अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. सध्यातरी या विषाणूच्या उपचारासाठी कोणतेही लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे गर्दीत न जाणे किंवा एखाद्या लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात न जाणे हाच एकमेव उपाय आहे.  
संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांनाच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे. तरी देखील या विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्र आणि देशात अनेक जिल्ह्यात काही कोरोना विषाणूमुळे प्रादुर्भाव झालेल्या हॉटस्पॉट किंवा कोरोना बाधित शहरे जसे की, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, यवतमाळ इत्यादी ठरविण्यात आलेली आहे. लॉकडाऊन लावण्यापूर्वी आणि नंतरही अंदाजित 60 हजार लोक हे वरील बाधित क्षेत्रामधून प्रवास करुन आपल्या जिल्ह्यात येत आहेत असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आपल्या नांदेड जिल्ह्यातही कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्याचे  मुख्य सचिव यांचे निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांनी विशेषत : बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपून प्ले स्टोअर मधून आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा. तसेच या आरोग्य सेतू ॲपमध्ये प्रवासाची व आरोग्याची खरी माहिती देऊन प्रशासनास मदत करावी. जेणेकरुन या विषाणूची लागण आपल्याच नजीकच्या नातेवाईकांना आणि समाजातील इतर नागरिकांना होणार नाही. आपल्या या सहकार्यामुळे विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनास मदत होईल आणि लॉकडाऊनमुळे स्तब्ध झालेले सर्व सामाजिक व आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येतील, असेही आवाहन नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
00000


बांधकाम कामगारांना 2 हजार रुपयांचे
अर्थसहाय्य बँक खात्यामध्ये थेट जमा होणार ;
दलालाच्या भुलथापांना बळी पडून कोठेही गर्दी करु नका
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे आवाहन
नांदेड दि. 21 :- सध्या लॉकडाऊची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यास शासनाने 18 एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये, सामाजिक अंतर ठेवावे, कोठेही गर्दी करु नये व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अन्वर सय्यद यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकाम बंद झाले आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांनी सध्या कोणतेही कामकाज करता येत नाही. त्यामुळे या सर्व नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नाही. यामुळे त्यांना दैनंदिन गरजांची तजवीज करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्याची लॉकडाऊची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यास शासनाने 18 एप्रिल 2020 रोजी मंजुरी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील काही दलाल सक्रिय झाले असून घरोघरी जाऊन कामगारांना सांगत आहेत की, तुमचे पैसे येणार असून तुम्ही यासाठी पाचशे रुपये आम्हाला द्या व तुमचे कागदपत्रे द्या असे बोलून ठगत आहे. असे कोणी कामगारांस ठगत असेल तर त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाणे येथे बांधकाम कामगारांनी करावी. सध्या देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून संबंधीत नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) कामागरांच्या खात्यावर डीबीटीद्वारे, रास्त कामगारांच्या खात्यावर महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुख्यालयातून टाकण्यात येणार आहेत.
यामुळे बांधकाम कामगारांनी दलालाच्या भुलथापांना बळी पडू नये व सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करुन कोठेही गर्दी करु नये व प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अन्वर सय्यद यांनी केले आहे.
0000


प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरो
(महाराष्‍ट्र आणि गोवा प्रदेश)
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारत सरकार
प्रेस नोट
कोविड-19 ला प्रतिबंध करण्‍यासाठी माहिती आणि‍ प्रसारण मंत्रालयाच्‍या
महाराष्‍ट्र आणि गोवा विभागाच्‍या प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोतर्फे विविध माध्‍यमातून पुढाकार

·         ऑनलाईन डिजीटल प्रचार सामुग्री तयार करणे
·         फिरत्‍या ऑडियो अनाऊन्‍समेंट द्वारे ग्रामीण भागातून प्रचार अभियान
·         लॉकडाऊनच्‍या काळात शासनाच्‍या विविध योजनाबाबत जनतेच्‍या प्रतिक्र‍िया जाणून घेण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न
डिजीटल प्रचार साधनांचे अभियान
कोविड-19 या म‍हामारीच्‍या विविध मुदयाबाबत जनजागृती होण्‍यासाठी माहिती आणि‍ प्रसारण मंत्रालयाच्‍या महाराष्‍ट्र आणि गोवा विभागाच्‍या प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोतर्फे विविध डिजीटल्‍ प्रचार साधनांची निर्मिती करण्‍यात येत आहे. यामध्‍ये  वैयक्‍त‍िक स्‍वच्छता राखणे, लॉकडाऊनच्‍या काळात घरामध्‍येच राहणे, सार्वजनिक ठिकाणी योग्‍य सामाजिक अंतर (सोशल डिस्‍टन्सिंग) पाळणे, शासनाच्‍या विविध सूचना व आदेश पाळणे, आरोग्‍य सेतु अॅप डाऊनलोड करणे, लॉकडाऊनमध्‍ये सुरु असलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवांची यादी देणे, शारीरिक व मानसिक आरोग्‍य टिकवणे आणि अफवांना आळा बसवणे यावर भर देण्‍यात येत आहे. ही सर्व प्रचार साधने प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोच्‍या सोशल मिडीयांवर तसेच विभागाच्‍या सर्व कर्मचाऱ्यांच्‍या वैयक्‍त‍िक संपर्क माध्‍यमांवर अपलोड करण्‍यात येत आहे. हे सर्व संदेश व्‍हॉटसअॅपच्‍या माध्‍यमातून दररोज जवळजवळ 13 हजार लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.
फिरत्‍या ऑडियो अनाऊन्‍समेंट द्वारे जनजागृती अभियान
प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरोच्‍यावतीने ध्‍वनीमुद्रि‍त गीते व संदेशाद्वारे फिरत्‍या ऑटोरिक्‍शा, टेम्‍पोमधून ऑडियो अनाऊन्‍समेंट सिस्‍टीमने जनजागृती अभियान राबविले. यामध्‍ये प्रामुख्‍याने कोविड-19 चा प्रसार रोखण्‍यासाठी विविध प्रतिबंधात्‍मक उपायांवर गीत व संदेशाद्वारे जनजागृती केली.
हे अभियान महाराष्‍ट्र व गोव्‍यातील कोविड-19 प्रभावित 16 जिल्‍हे- पुणे, परभणी, नासिक, नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, उस्‍मानाबाद, कोल्‍हापूर, जळगांव, अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, बीड व साऊथ गोवा या जिल्‍हयात राबविण्‍यात आले. दिनांक 7 ते 14 एप्रिल दरम्‍यान या अभियानात एकुण 23 ऑटोरिक्‍शा / टेम्‍पो वरील 16 जिल्‍हयात सुमारे 7 हजार  कि.मी. अंतर कापून प्रचार करण्‍यात आला.
जनतेच्या सूचना व प्रतिक्रिया शासनास सादर
लॉकडाऊनच्‍या काळात जनतेसाठी विविध सुविधा व लाभ शासनामार्फत जाहीर करण्‍यात आले. प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरो मार्फत सामान्‍य जनतेच्‍या सूचना व प्रतिक्र‍िया शासनास सादर करणे हे कार्य ही करते. या अभियानात ब्‍युरोमार्फत लॉकडाऊनच्‍या काळात ग्रामीण जनतेच्‍या हिताच्‍या शासनाच्‍या विविध योजनांविषयीच्‍या प्रतिक्र‍िया शासनास कळविण्‍यात आल्‍या. ब्‍युरो कोविड-19 बाबत केवळ शासनाच्‍या विविध योजनांचा प्रचार करीत नाही तर शासन व जनता यांच्‍यातील दुवा म्‍हणूनसुध्‍दा काम करीत आहे.
सुप्रिम कोर्टाच्‍या आदेशाने अफवा/चुकीची माहितीचा प्रसार रोखण्‍यासाठी भारत सरकारच्‍या प्रेस इन्‍फर्मेशन ब्‍युरो मध्‍ये स्‍थापन केलेल्‍या वस्‍तुस्थिती पडताळणी समितीसप्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरो सहाय करीत आहे. यासाठी जिल्‍हा प्रशासनाशी समन्‍वय साधण्‍यात येत आहे.
प्रादेशिक लोक संपर्क ब्‍युरो हे कार्यालय केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारित येणारे कार्यालय असून महाराष्‍ट्र आणि गोवा या राज्‍यासाठी पुणे, हे त्‍याचे मुख्‍यालय  आहे.
भारत सरकारच्‍या योजनांचा आणि उपक्रमांचा प्रसार आणि संपर्क कार्यासाठी राज्‍यात दहा उप कार्यालये क्षेत्रीय लोकसंपर्क या नावाने कार्यरत असून ती पुणे कार्यालया अंतर्गत कार्यरत आहेत.
00000







रमजान महिन्यात नमाज पठण,
तरावीह, इफ्तारसाठी एकत्र येऊ नये
अल्पसंख्यांक विकास विभागाचे आवाहन  
          नांदेड दि. 21 :- कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी रमजान महिन्यामध्ये नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीच्या अनुषंगाने एकत्र येऊ नये, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुचा (कोव्हीड 19) प्रसार होत आहे. यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणुचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम, 1897 लागू करण्यात आलेला यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. तसेच भारतीय दंडसंहिता कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. दि. 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेन्वये व दि. 17 एप्रिल 2020 रोजीच्या सुधारित आदेशात यासंदर्भातील नियमावली प्रसिद्ध करण्यात आली असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत दि. 14 मार्च 2020 च्या अधिसुचनेन्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत वारंवार निर्देश दिलेले आहेत.
          नजीकच्या भविष्यात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग / संक्रमण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते व त्यामधून मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग / सक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम समाज बांधवांच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे असल्याने सार्वजनिकरित्या / मस्जीदमध्ये सर्व मसाजबांधवांनी एकत्र येऊ नमाज अदा न करणे हितावह ठरणार आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्रलायाचे मंत्री यांनी  16 एप्रिल 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरसमध्ये दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मुस्लीम समाजात जनजागृती करण्यासाठी मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे सूचना देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुचना देण्यात याव्यात.
          कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे.
          कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये.
घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी दिले आहेत.
00000


अत्यावश्यक सेवा वगळता ;
इतर सर्व आस्थापना, दुकाने
सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच उघडे राहतील,
जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांचे आदेश
    नांदेड दि. 21 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नांदेड जिल्ह्यात रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन दि. 13, 15 19 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशामध्ये नमूद शासकीय, निमशासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारी आस्थापना व त्यांच्याशी निगडीत दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने (केवळ अशा आस्थापना, दुकाने ज्यांना पूर्वी दि. 13, 15 19 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशानुसार चालु ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे.) हे केवळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहतील, असे शुद्धीपत्रक निर्गमीत केले आहेत.
       नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून आदेशात नमूद काही खाजगी दुकाने व आस्थापना चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनाच्या अनुषंगाने सदर विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास यश प्राप्त झाले आहे.
      जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 13 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात मनाई आदेश 14 ते 30 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले होते. दि. 15 19 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार हा कालावधी रविवार 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
          सदर आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. असे शुद्धीपत्रक जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 20 एप्रिल 2020 रोजी निर्गमित केले आहे.  
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...