वृ.वि.2381
दि.5सप्टेंबर, 2019
विशेष वृत्त
‘स्वयंम’ योजनेत 7381 अनुसूचित
जमातीतीलविद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी साहाय्य
मुंबई, दि. 5 : पंडित दीनदयाल
उपाध्याय ‘स्वयंम’योजनेंतर्गत गेल्या 4 वर्षांत 7 हजार 381 अनुसूचित जमाती
संवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 28 कोटी रूपयांचे
साहाय्य करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम वितरित केली
जाते.
या योजनेंतर्गत
महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील शैक्षणिक
संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना निवास, आहार, निर्वाह तसेच
शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्याकरिता अर्थसहाय्य देण्यात येते.
2018-19 या शैक्षणिक
वर्षापासून तालुका स्तरावरील इ.12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त
तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत
प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न
मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येत
आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी
विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त
नसावे. केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न
मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न
मर्यादा लागू राहील. विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत
असावा. विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या,सामाजिक न्याय
विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला
नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. आदिम
जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राथम्याने
दिला जाईल. योजनेंतर्गत अर्जाकरिता संकेतस्थळ :-http://swayam.mahaonline.gov.in
पहावे.
००००
वृ.वि.2382
दि.5सप्टेंबर, 2019
विशेष वृत्त
एक राज्य ई-चलान
32
जिल्ह्यात प्रकल्प सुरु
मुंबई,
दि. 5 :
गृह विभागाने 32 जिल्ह्यात‘एक राज्य एक ई-चलान’ हा
प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना
आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम व इतर माहिती पाहण्यासाठी महाट्रॅफिक ॲपची
निर्मिती केली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी व मुंबई व्यतिरिक्त इतर पोलीस
दलासाठी वेगळे असे दोन ॲप आहेत. हे ॲप आयओएस व अँड्रॉइड मोबाईलवर डाऊनलोड करता
येते.
मुंबईट्रॅफिक ॲप,
महाट्रॅफिक ॲप या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई- चलानची
माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. चलानची माहिती घेणे,
ई चलानचा दंड भरणे यामुळे सोईचे झाले आहे.
या
ॲप्लिकेशनमधील,‘माय व्हेइकल’ या विभागात दंड आकारण्यात आलेल्या वाहनाची माहिती
देण्यात येईल. वाहनाचा क्रमांक व त्याचा चेसिस/इंजिन क्रमांक टाकल्यास ही माहिती
दिसेल. ‘माय ई- चलान’ या विभागात वाहनाच्या चलानबद्दलची माहिती दिसेल. चलानच्या
दंडाची रक्कम ऑनलाईन भरण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या ॲप्लिकेशनमुळे चलान
प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण झाली असून वाहतूक नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावी
कारवाई होत आहे.
००००
नंदकुमार
वाघमारे/विसंअ/4.9.2019
वृ.वि.2385
दि.5सप्टेंबर, 2019
विशेष वृत्त
मुंबईत ३८ हेक्टर
क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती
- सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. ५:
मुंबई येथे ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८
हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्चून तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर
४८.८० कोटी रुपये खर्चून कांदळवन उद्यान
विकसित केले जात असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
गोराई कांदळवन
गोराई कांदळवन
उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, मँग्रो ट्रेल, पक्षी निरीक्षण
मनोरा, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन, यासारखी कामे
प्रस्तावित असून २०२१ च्या दीपावलीच्या आधी हा प्रकल्प पर्यटकांसाठी उपलब्ध होईल
यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध
करून दिला आहे.
दहिसर कांदळवन
दहिसर कांदळवन
उद्यानाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कांदळवनाची
जैवविविधिता खुप मोठी असून येथे
कांदळवनाच्या ११ प्रजाती आढळतात. त्यामुळे संशोधन आणि मनोरंजन या दृष्टीने
हा परिसर पर्यटकांसाठी आणि अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
येथे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील. या
उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, मँग्रो ट्रेल, जैवविविधतेसह
आभासी संग्रहालय, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन यासारखे उपक्रम
राबविले जाणार आहेत. राज्य योजनेतून हा प्रकल्प राबविला जात असून ऑक्टोबर २०२२ पर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले
आहे.
३० हजार
हेक्टर क्षेत्रावर कांदळवने
राज्यात एकूण
३० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदळवने असून यात १७ हजार हेक्टर क्षेत्र हे
शासकीय मालकीचे तर १३ हजार हेक्टर
क्षेत्रावरील कांदळवने खाजगी जमीनीवर आहेत.
०००००