Thursday, September 5, 2019


अटल महापणन विकास अभियानांतर्गत
जिल्हास्तरीय लोकसंवाद कार्यक्रम
व्यवसायातून संस्थांना  
आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे
-         जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस
नांदेड दि. 5 :- जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी अनेक प्रकारचे शेती पूरक व इतर व्यवसाय सुरु करुन संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले.  
अटल महापणन विकास अभियानांतर्गत विविध उपक्रमाबाबत जनजागृतीसाठी सहकार विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड येथे आज करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. फडणीस बोलत होते.   
यावेळी सहाय्यक निबंधक गणेश आवटी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक बायस ठाकूर, जिल्हा पणन व व्यवसाय विकास अधिकारी विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा उपनिबंधक श्री फडणीस मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले, जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन संस्थांच्या स्थावर जंगम मालमत्तेचा  संस्थेच्या व्यवसाय व उत्पन्न वाढीसाठी विनियोग करावा. गावातील खातेदार शेतकऱ्यांना संस्थेचे सभासद करुन घ्यावे. सहकाराला सद्यस्थितीवर मात करण्यासाठी उद्योग व्यवसायात वाढ करुन परिस्थितीत बदल करण्यासाठी गटसचिवांनी स्वयंप्रेरणेने कामकाज करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.    
या लोकसंवाद कार्यक्रमात सहाय्यक निबंधक श्री आवटी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्री. ठाकूर, जिल्हा पणन व व्यवसाय विकास अधिकारी श्री पाटील यांनी संस्थांनी प्रेरणादायी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करुन संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.  
याप्रसंगी संस्थामार्फत विविध प्रकारचे व्यवसाय सुरु करुन संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यात मरखेल, कुडली, वझर आदी संस्थांच्या व्यवसाय वाढीमुळे त्यांचे कौतुक व गटसचिवांचा प्रेरणादायी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार जिल्हा देखरेख संस्थेचे के. डी. गव्हाणे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव, सहकार कार्यालयातील कर्मचारी आदींची उपस्थित होती.
0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...