Thursday, February 15, 2018


प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक भूमिकेतून
समाजाचा विकास घडतो : जी. श्रीकांत
लातूर, दि.15 :- प्रत्येक व्यक्तीची दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाचनाने होते. शासन आणि समाज यांच्यामधील संवादक म्हणून प्रसार माध्यमे काम करतात. समाजातील व्यक्तीचा विकास समोर ठेवून प्रसार माध्यमांनी सकारात्मक भूमिकेतून काम केल्यामुळे देशाचा विकास होतो, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी  पत्र सूचना कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आज येथे व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे, जयप्रकाश दगडे, वस्तू व सेवाकर उपायुक्त जी.एस.गवंडी, लीड बँकेचे व्यवस्थापक शंकर बोर्डे, दै.यशवंतचे ओमप्रकाश मोतीपवळे, रविंद्र जगताप, सहायक संचालक (माहिती) मीरा ढास यांच्यासह मोठया संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.  
या कार्यशाळेचे प्रस्ताविक पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक नितीन सप्रे यांनी करुन कार्यशाळा आयोजना मागील उद्देश स्पष्ट केला. केंद्र शासनामार्फत प्रसारमाध्यमांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांची  माहिती संगणकीय सादरणाद्वारे दिली. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती पत्रकारांच्या मार्फत विविध माध्यमांना शासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाते, याविषयीची माहिती त्यांनी दिली.
ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांचे विकास पत्रकारिता या विषयावर भाषण झाले. ते म्हणाले की, स्वता:तील मीपणा संपूवन विकास पत्रकारिता केली जावी. माणसाचा विकास केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या दिशेने वाटचालीत प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. प्रत्येकाच्या मनात विकासाची प्रेरणा निर्माण करणाऱ्या विकास पत्रकारितेकडे पत्रकारांनी लक्ष द्यावे, असेही त्यानी यावेळी सांगितले.
श्री.शंकर बोर्डे यांनी उद्योगाच्या वाढीसाठी शासन प्रयत्न करीत असून मुद्रा योजनेतंर्गत सुशिक्षित बेराजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची संधी शासनाने उपलब्ध केल्याची माहिती दिली. वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारांनी समाजातील गरजूपर्यंत मुद्रा योजनेची माहिती पोहचविण्याचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी आपत्ती व्यवस्थापनात प्रसारमाध्यमाची नेमकी कोणती भूमिका असावी. या संदर्भात जागतिक स्तरावरील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विविध घटना प्रसार माध्यमाची भूमिका समाजासाठी कशी साहय्यभूत ठरली. तसेच आपत्तीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी, याविषयीचे मार्गदर्शन त्यांनी केले. पत्रकारांनी आपत्तीच्या वेळी मानसिक संतूलन बिघडू न देता प्रशासनास सहकार्याची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.                                                 
यावेळी रविंद्र जगताप यांनी सोशल मीडिया विषयी मार्गदर्शन केले. माध्यमातील काळानुरुप झालेला बदल यात वर्तमानपत्र, दूरचित्रवाहिन्या, ऑनलाईन आवृत्ती, वेब आणि पत्रकारिता समाज माध्यमाची भूमिका याविषयी अनुभवावर आधारित मार्गदर्शन केले. समाज माध्यमाचा योग्य वापर केला तर समाजावर चांगला परिणाम होईल. समाज मनावर ज्या प्रमाणात चांगल्या विचाराचे अनुकरण केले तर चांगला परिणाम होतो. तसेच समाजाचा विकास होण्यात समाज माध्यमांचा चांगला उपयोग केला तर  मदत होईल, असेही ते म्हणाले.  
याचबरोबर नव्याने लागू झालेल्या जीएसटी (वस्तू व सेवा कर प्रणाली ) विषयी  श्री.गवंडी यांनी देशातील करप्रणालीमध्ये झालेला बदल, उद्योग, व्यापारामध्ये या धोरणामुळे आलेली पारदर्शकता तसेच देशाच्या विकासात या करप्रणालीचे योगदान या विषयी माहिती दिली.
कार्यशाळेच्या शेवटी अन्य सहभागी पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी  अशा कार्यशाळेचे आयोजन पत्रकारांना दिशादर्शक असून तालुका स्तरावर अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना पत्र सूचना कार्यालयाकडे केली.  नितिन सप्रे आभार यांनी मानले.
                                                            ****



कर्करोग उपचार शिबिराचे आज आयोजन
नांदेड, दि. 15 :- कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार 16 फेब्रुवारी 2018 रोजी श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, शिवाजी पुतळ्याजवळ नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत करण्यात आले आहे. संबंधितांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
कर्करोग दिन व पंधरवाडा संदर्भात जिल्हाधिकारी डोंगरे यांचे उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. या शिबिरात मुंबई येथील कॅन्सर वारीयर्स टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. सष पवार तसेच कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र सिंह गुलाटी, डॉ. मोरे, जिल्हा रुग्णालयातील कान, नाक, घसा तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ व शल्यचिकित्सक यांच्या उपस्थितीत कर्करोग निदान व उपचार करण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या कार्यक्रमानुसार सार्वजनिक ठिकाण तसेच विविध महाविद्यालयात पोस्टर्स स्पर्धा, पथनाट्य, व्याख्याने घेऊन जनजागृती करण्यात येत आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  
000000


पोलीस, सैन्यदल भरती पुर्व प्रशिक्षणासाठी शिबीर
नांदेड दि. 15 :- अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील युवक व युवतींसाठी अमरावती येथे आयोजित सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी शुक्रवार 23 फेब्रुवारी 2018 रोजी नांदेड जिल्हयातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी  केले आहे.
            सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक व युवतींसाठी सैन्य व पोलीसमध्ये भरती करण्याकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर केला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी पात्र अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वयोगटातील असावे. उमेदवाराची पुरुष उंची 165 से.मी व महिला उंची 155 से.मी. छाती न फुगवता पुरुष 79 से.मी. (फुगवुन 84 से.मी. ) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नोंदणी आणि ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारीरीक व मानसिक दृष्टया निरोगी असावा.
            प्रशिक्षणाच्या निवडीसाठी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतीनी शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, नमस्कार चौक, नांदेड येथे मुळ कागदपत्रासह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे. उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या-येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी यांनी केले आहे.
00000



जिल्हा कृषि महोत्सवात
सहभागासाठी माहिती देण्याचे आवाहन    
            नांदेड, दि. 15 :- जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन 21 ते 25 मार्च 2018 या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांशी निगडीत माहिती, प्रात्यक्षिके, जीवंत नमुने, प्रक्रिया उद्योग, सुधारीत औजारे आदी माहितीचा सहभाग असणार आहे. महोत्सवात सहभाग घेण्यासाठी माहिती संबंधीतांनी मंगळवार 27 फेब्रुवारी 2018 पर्यंत प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, नवा मोंढा नांदेड येथे सादर करावी, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा नांदेड यांनी केले आहे.
            जिल्हा कृषि महोत्सवात शासकीय दालनात 40 स्टॉल, कृषि निविष्ठा 30 स्टॉल, कृषि तंत्रज्ञान व सिंचन 30 स्टॉल, गृहोपयोगी वस्तू 40 स्टॉल, धान्य महोत्सव 20 स्टॉल, खाद्य पदार्थ 20 स्टॉल असे अंदाजे 200 स्टॉलचा समावेश आहे. शासकीय कार्यालयास स्टॉल विनामुल्य आहेत. सुसज्ज माहितीसह स्टॉल उभारणीबाबत आवश्यक ती कार्यवाही संबंधीत कार्यालय प्रमुखांना करावी. शासनाने शेतकऱ्यांना विविध कृषि योजना, उपक्रम, संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ, पुरक व्यवसाय इत्यादी बाबत मार्गदर्शन व्हावे तसेच कृषि विषयक परिसंवाद, व्याख्याने तसेच थेट उत्पादक ते ग्राहक विक्री व्हावी या उद्देशाने जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्यात  येणार आहे. यामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, विविध महामंडळे बरोबरच इतर सर्व शासकीय यंत्रणा, खाजगी कंपन्या, बचतगट, उद्योजक यांचा सहभाग अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय नांदेड, संतोष बीज भांडार जवळ नवा मोंढा नांदेड येथे दूरध्वनी क्र. 02462-284428 ईमेल pdatmananded@gmail.com वर संपर्क सधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000


महिला दिन राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर होणार साजरा   
महिलांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यात मतदार यादीत महिला मतदार नोंदणी प्रमाणातील तफावत दूर करण्यासाठी महिला दिनी महिला मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या महिलांचे मतदार नोंदणी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. संबंधीतांनी तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडे बुधवार 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीतजास्त वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सन 2009 पासून "स्वीप" कार्यक्रम हाती घेतला आहे. आयोगाच्या सुचनेनुसार सन 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीचे व्यापक कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात येत्या 8 मार्च रोजी महिला दिन हा कार्यक्रम राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर साजरा करण्यात येणार आहे.
येणाऱ्या महिला दिनानिमित्त महिला मतदारामध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी महिला उन्नतीसाठी काम करणाऱ्या शासकीय व अशासकीय संस्था, महामंडळे यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दिनांक 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार नांदेड जिल्ह्यात महिलांच्या लोकसंख्येच्या 937 च्या प्रमाणात प्रत्यक्ष महिला मतदारांच्या संख्येचे प्रमाण 920 इतके आहे. तेंव्हा या महिला दिनानिमित्त 17 मतदारांची तफावत दूर करण्याचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमात ज्या महिलांची नव्याने मतदार नोंदणी झाली आहे अशा 15 ते 20 प्रातिनिधीक महिलांना मतदार छायाचित्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शासकीय व अशासकीय संस्था, महामंडळे यांचे मदतीने महिला मतदारांची नोंदणी करुन 8 मार्च रोजी जास्तीतजास्त नवीन महिला मतदारांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत. मुली व महिलांचा समावेश असलेल्या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर केवळ मुलींसाठी वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला तसेच विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मतदारांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी यासाठी अपवादात्मक कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धा उपक्रमामध्ये विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या महिला व मुलींचा देखली सत्कार करण्यात येणार आहे.
000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...