Thursday, February 15, 2018


महिला दिन राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर होणार साजरा   
महिलांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यात मतदार यादीत महिला मतदार नोंदणी प्रमाणातील तफावत दूर करण्यासाठी महिला दिनी महिला मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या महिलांचे मतदार नोंदणी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. संबंधीतांनी तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडे बुधवार 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीतजास्त वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सन 2009 पासून "स्वीप" कार्यक्रम हाती घेतला आहे. आयोगाच्या सुचनेनुसार सन 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीचे व्यापक कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात येत्या 8 मार्च रोजी महिला दिन हा कार्यक्रम राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर साजरा करण्यात येणार आहे.
येणाऱ्या महिला दिनानिमित्त महिला मतदारामध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी महिला उन्नतीसाठी काम करणाऱ्या शासकीय व अशासकीय संस्था, महामंडळे यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दिनांक 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार नांदेड जिल्ह्यात महिलांच्या लोकसंख्येच्या 937 च्या प्रमाणात प्रत्यक्ष महिला मतदारांच्या संख्येचे प्रमाण 920 इतके आहे. तेंव्हा या महिला दिनानिमित्त 17 मतदारांची तफावत दूर करण्याचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमात ज्या महिलांची नव्याने मतदार नोंदणी झाली आहे अशा 15 ते 20 प्रातिनिधीक महिलांना मतदार छायाचित्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शासकीय व अशासकीय संस्था, महामंडळे यांचे मदतीने महिला मतदारांची नोंदणी करुन 8 मार्च रोजी जास्तीतजास्त नवीन महिला मतदारांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत. मुली व महिलांचा समावेश असलेल्या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर केवळ मुलींसाठी वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला तसेच विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मतदारांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी यासाठी अपवादात्मक कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धा उपक्रमामध्ये विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या महिला व मुलींचा देखली सत्कार करण्यात येणार आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...