Monday, June 1, 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने फेसबुक लाईव्हवर 2 जून रोजी सायं. 7.30 वा. साधणार संवाद



नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोविड 19 च्या या आव्हानात्मक काळात आपले शासन आणि विविध सेवाभावी संस्था एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या प्रयत्नांना आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेने समर्थ साथ दिली आहे. आपली ही प्रयत्नांची पराकाष्ठा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सावरण्याची आहे. शेतकरी, कष्टकरी व कामगारांना, समाजातील सर्वच घटकांना सावरण्याची आहे. 
अशा या काळात जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे यासाठी आपल्याशी फेसबुक लाईव्हद्वारे आपले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उद्या सायं. 7.30 ते 8.30 वा. ह्रदयस्पर्शी संवाद साधणार आहेत. त्यांचा हा संवाद https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/  या फेसबुक पेजवर सर्वांना साधता येईल.
*संवाद दिनांक 2 जून 2020*
*वेळ सायंकाळी 7.30 ते 8.30 वा*
*लाईव्ह पहा https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/ या लिंकवर*
 *******

सोळा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी तीन रुग्ण पॉझिटिव्ह



नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोरोना विषाणुची बाधा झालेल्या आज 16 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी दिली असून या रुग्णांच्या परिवारातील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळीच आषोधोपचार त्यांनी सुरु केल्यामुळे या रुग्णांना कोरोनावर यशस्वीरित्या मात करता आली.
जिल्ह्यात सोमवारी 1 जून रोजी सायं.  5  वा. प्राप्त झालेल्या 116 अहवालापैकी 108 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 3 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 149 झाली आहे. या तीन रुग्णांपैकी 25 व 35 वर्षांचे दोन पुरुष रुग्ण हे देगलूर नाका येथील तर 40 वर्षे वयाचा एक रुग्ण शिवाजीनगर नांदेड येथील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 21 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. या 21 रुग्णांपैकी तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे.
आतापर्यंत एकूण 149 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 21 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 9 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील कोविड केअर सेंटर येथे 1 रुग्ण असून एक रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आला आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
          कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 40 हजार 307, घेतलेले स्वॅब 3 हजार 995, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 486, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 3, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 149, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 152, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 28, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 120, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 21, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 176 एवढी आहे.
दिनांक 31 मे  रोजी पाठविण्यात आलेल्या 187 स्वॅब तपासणी अहवालापैकी 116 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 71 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 1 जून रोजी  105 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
000000


नांदेड जिल्ह्यात कलम 144 लागू  
सायं. 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी
केश कर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर बंद राहतील
नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हयात सोमवार 1 जून 2020 पासून पुढील आदेशापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये लागू करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात सायं. 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. याचबरोबर आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टिने केश कर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी दिलेली मुभा रद्द करण्यात आली आहे.
अंत्यविधीमध्ये 50 नागरीकांना पर्यंत सहभागाची दिलेली मुभा कमी करुन त्याऐवजी 20 नागरीकांपेक्षा जास्त नागरीकांना सहभागी होता येणार नाही. संचारबंदीच्या काळात कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरिता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्त रुग्ण व त्यांच्यायसोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्य्क्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
 नांदेड जिल्हा नॉन रेड झोनमध्ये असल्याने यापूर्वी या कार्यालयाकडून दुकाने व आस्थापना व इतर परवानगी दिलेल्याबाबी प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन्स) वगळून उर्वरित क्षेत्राकरिता नियम व अटीच्या अधीन सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत यापुढेही चालू राहतील.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.
अत्यावश्यक साधने, सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द सर्व संबंधित यंत्रणांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश 31 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...