Wednesday, June 1, 2022

 जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप मोहिमेला अभूतपूर्व यश

 

जिल्ह्यात एकाच दिवशी 84 ठिकाणी

बचतगट व शेतकऱ्यांनी घेतला लाभ

 

जिल्हा प्रशासन व बँकांनी दिला कर्तव्य तत्परतेचा प्रत्यय

 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- पीक कर्जाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक सहाय्य करता यावे यादृष्टिने जिल्हा प्रशासन आणि बँकांच्या समन्वयातून संपूर्ण जिल्हाभर आयोजित केलेल्या एक दिवसीय शिबिरास आज उत्स्फूर्त यश मिळाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वत: अर्धापूर तालुक्यातील लिंबगाव, मालेगाव व अर्धापूर येथील शिबिरांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पात्र शेतकऱ्यांनी बँकांमध्ये जाऊन पीक कर्जाचे नूतनीकरण करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या हस्ते आज कर्ज मंजुरी पत्राचे शेतकरी व बचतगटांना वाटप करण्यात आले.

 

प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना व बचतगटांना कर्ज मिळावे यादृष्टीने मागील आठवड्यात जिल्हा प्रशासन व बँक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक दिवसीय शिबीर घेण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येक तालुक्यातील संबंधित बँका, तहसिल कार्यालय, तलाठी, गटविकास अधिकारी आणि त्या-त्या गावातील शासनाच्या प्रतिनिधींनी संपूर्ण जिल्हाभरात आज 84 ठिकाणी हे शिबीर आयोजित करून शेतकऱ्यांना व बचगटांना पात्रते प्रमाणे पीक कर्ज दिले.  

 

लिड बँक मॅनेजर अनिल गचके यांनी जिल्ह्यातील 23 बँकांच्या समन्वयातून संपूर्ण बँक अधिकाऱ्यांना विश्वास दिला. आजच्या शिबिरात या बँकेच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टीकोन घेत ही मोहिम यशस्वी करून दाखविली. येत्या 15 दिवसात जास्तीत जास्त पीक कर्जाचे नूतनीकरण करण्याचा निर्धार बँकांतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

00000






 जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयांना

अत्याधुनिक रोव्हर्सचे वाटप

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पुढाकार

 

नांदेड, (जिमाका), दि. 1 :- भूमि अभिलेख विभागाअंतर्गत जिल्ह्यातील मोजणीच्या कामांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर दिला जात आहे. हे काम अधिक अचूक व उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण व्हावे यादृष्टीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले. नाविन्यपूर्ण योजनेतून त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या 1 कोटी 20 लाख रुपये निधीतून जिल्ह्याला आता नवीन 12 रोव्हर्स उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया यांनी दिली. भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी याबाबत दोन दिवसाचे विशेष प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते संबंधित विभागाला आज रोव्हर्सचे वाटप करण्यात आले.    

 

यावेळी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया, उपअधीक्षक निलेश उंडे, रविंद्र निकम, टी. पी. पेंदोर, व्ही. बी. अन्नमवार, पी. आर. माळी, मोरे व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाअंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून यात सर्व तालुक्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयांना हे रोव्हर्सचे नवीन तंत्रज्ञान व साहित्य मिळाल्यामुळे आता जमीन मोजणीच्या कामांना गती मिळणार आहे.

 

अशी आहे रोव्हर्स यंत्रणा

प्रत्येक जागेला अक्षांश-रेखांशावर अचूक मोजमाप करून नोंदविता येते. सॅटेलाईटच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आता हे मोजमाप शक्य झाले आहे. जीपीएस प्रणालीने हे मोजमाप अधिक विस्तारीत केले असून रोव्हर्सद्वारे मोजमाप हा आता जीपएसच्या पुढचा टप्पा आहे. पिढ्यानपिढ्या चालणारे जमिनीच्या मोजमापावरून निर्माण झालेले वाद या तंत्रज्ञानाच्या अचूक मोजणीमुळे आता संपुष्टात येण्यास मोलाची मदत होईल, असे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया यांनी सांगितले. प्रत्येक भूधारकाला याद्वारे आपल्या जागेची अचूक मोजणी करून घेता येईल. यापूर्वी मोजणीसाठी जो वेळ लागत होता तो कालावधी निम्याने कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

 

अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण

हे रोव्हर्स मशिन्स सॅटेलाईशी कनेक्टेड असून नांदेड जिल्ह्यात उमरी व देगलूर या दोन ठिकाणी याला आवश्यक असणारे कोर्स स्टेशन उभारण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांना याचे दोन दिवसीय प्रशिक्षण दिले जात आहे. भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या माध्यमातून या हे तंत्रज्ञान नियंत्रीत केले जात आहे. 12 रोव्हर्सच्या माध्यमातून जीपीएस आधारे जी मोजणी होईल त्याचा डाटा (माहिती) कोर्स स्टेशनमार्फत सॅटेलाईटशी जुळल्या जाईल. हा डाटा / मोजणी कायमस्वरुपी सर्व्हरवर जतन केली जाईल. यामुळे हा डाटा केंव्हाही उपलब्ध होऊ शकेल.  

00000 





 सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

रोजगार मेळावा संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य ओळखून भविष्यातील आवाहनांना सामोरे जावे असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

 

या रोजगार मेळाव्यास खालसा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य गुरुबच्चन सिंगऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस. बिरादारऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य एस.एस.परघनेमहाव्यवस्थापक प्रविण खडकेजिल्हा उद्योग केंद्राचे सहा. प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रबंधक सौ. राठोडखादी ग्रामोद्योग चे एस.बी.रामे यांची उपस्थिती होती.

 

विद्यार्थ्यांनी वाढती बेरोजगारी यावर आजच्या युवक-युवतींनी कशा प्रकारे मात केली पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांची बेरोजगारी दूर व्हावी असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी यावेळी सांगितले.

 

या रोजगार मेळाव्यात एकूण 9 नामांकित कंपन्यानी सहभाग नोंदवला. त्यामध्ये स्पार्क मिंडा मुंबईफियाट पुणेधुत ट्रान्समिशन औरंगाबादमहिंद्रा अँड महिंद्रा पुणेहेलिकल्स औरंगाबादसुझुकी मोटार गुजरातखादी ग्रामोद्योग तसेच इतर कंपन्याचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. महिंद्रा अँड महिंद्रा पुणे या कंपन्यामार्फत एकूण 367 विद्यार्थ्यांची मुलाखत घेवून भरती प्रक्रिया सुरु आहे. या कंपनीसाठी पुढील चार दिवसापर्यंत या कार्यालयाशी संपर्क साधून इच्छूक बेरोजगार उमेदवार आपले नाव नोंदणी करु शकतात असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

सुधारीत वृत्त 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रारुप

प्रभाग रचनेची अधिसूचना 2 जून रोजी होणार प्रसिद्ध 

नांदेड, (जिमाका), दि. 1 :- नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची रचना दिनांक 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या आदेशाच्या मसुद्याची प्रत ही जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव खै, लोहा, कंधार, मुखेड, व देगलूर येथील तहसिलदार कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथे फलकावर प्रसिद्ध केले जात आहे. आदेशाच्या मसुदास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्या संदर्भात सकारण लेखी निवेदने/ हरकती/ सूचना तहसिलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे 8 जून 2022 पर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेली निवेदने/हरकती/सूचना आदी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.  

000000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...