Wednesday, June 1, 2022

 जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप मोहिमेला अभूतपूर्व यश

 

जिल्ह्यात एकाच दिवशी 84 ठिकाणी

बचतगट व शेतकऱ्यांनी घेतला लाभ

 

जिल्हा प्रशासन व बँकांनी दिला कर्तव्य तत्परतेचा प्रत्यय

 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- पीक कर्जाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक सहाय्य करता यावे यादृष्टिने जिल्हा प्रशासन आणि बँकांच्या समन्वयातून संपूर्ण जिल्हाभर आयोजित केलेल्या एक दिवसीय शिबिरास आज उत्स्फूर्त यश मिळाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वत: अर्धापूर तालुक्यातील लिंबगाव, मालेगाव व अर्धापूर येथील शिबिरांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पात्र शेतकऱ्यांनी बँकांमध्ये जाऊन पीक कर्जाचे नूतनीकरण करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या हस्ते आज कर्ज मंजुरी पत्राचे शेतकरी व बचतगटांना वाटप करण्यात आले.

 

प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना व बचतगटांना कर्ज मिळावे यादृष्टीने मागील आठवड्यात जिल्हा प्रशासन व बँक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक दिवसीय शिबीर घेण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येक तालुक्यातील संबंधित बँका, तहसिल कार्यालय, तलाठी, गटविकास अधिकारी आणि त्या-त्या गावातील शासनाच्या प्रतिनिधींनी संपूर्ण जिल्हाभरात आज 84 ठिकाणी हे शिबीर आयोजित करून शेतकऱ्यांना व बचगटांना पात्रते प्रमाणे पीक कर्ज दिले.  

 

लिड बँक मॅनेजर अनिल गचके यांनी जिल्ह्यातील 23 बँकांच्या समन्वयातून संपूर्ण बँक अधिकाऱ्यांना विश्वास दिला. आजच्या शिबिरात या बँकेच्या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टीकोन घेत ही मोहिम यशस्वी करून दाखविली. येत्या 15 दिवसात जास्तीत जास्त पीक कर्जाचे नूतनीकरण करण्याचा निर्धार बँकांतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

00000






No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...