जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयांना
अत्याधुनिक रोव्हर्सचे वाटप
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पुढाकार
नांदेड, (जिमाका), दि. 1 :- भूमि अभिलेख विभागाअंतर्गत जिल्ह्यातील मोजणीच्या कामांचा जलद गतीने निपटारा करण्यावर भर दिला जात आहे. हे काम अधिक अचूक व उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण व्हावे यादृष्टीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले. नाविन्यपूर्ण योजनेतून त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या 1 कोटी 20 लाख रुपये निधीतून जिल्ह्याला आता नवीन 12 रोव्हर्स उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया यांनी दिली. भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी याबाबत दोन दिवसाचे विशेष प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते संबंधित विभागाला आज रोव्हर्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया, उपअधीक्षक निलेश उंडे, रविंद्र निकम, टी. पी. पेंदोर, व्ही. बी. अन्नमवार, पी. आर. माळी, मोरे व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाअंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून यात सर्व तालुक्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयांना हे रोव्हर्सचे नवीन तंत्रज्ञान व साहित्य मिळाल्यामुळे आता जमीन मोजणीच्या कामांना गती मिळणार आहे.
अशी आहे रोव्हर्स यंत्रणा
प्रत्येक जागेला अक्षांश-रेखांशावर अचूक मोजमाप करून नोंदविता येते. सॅटेलाईटच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आता हे मोजमाप शक्य झाले आहे. जीपीएस प्रणालीने हे मोजमाप अधिक विस्तारीत केले असून रोव्हर्सद्वारे मोजमाप हा आता जीपएसच्या पुढचा टप्पा आहे. पिढ्यानपिढ्या चालणारे जमिनीच्या मोजमापावरून निर्माण झालेले वाद या तंत्रज्ञानाच्या अचूक मोजणीमुळे आता संपुष्टात येण्यास मोलाची मदत होईल, असे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया यांनी सांगितले. प्रत्येक भूधारकाला याद्वारे आपल्या जागेची अचूक मोजणी करून घेता येईल. यापूर्वी मोजणीसाठी जो वेळ लागत होता तो कालावधी निम्याने कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण
हे रोव्हर्स मशिन्स सॅटेलाईशी कनेक्टेड असून नांदेड जिल्ह्यात उमरी व देगलूर या दोन ठिकाणी याला आवश्यक असणारे कोर्स स्टेशन उभारण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांना याचे दोन दिवसीय प्रशिक्षण दिले जात आहे. भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या माध्यमातून या हे तंत्रज्ञान नियंत्रीत केले जात आहे. 12 रोव्हर्सच्या माध्यमातून जीपीएस आधारे जी मोजणी होईल त्याचा डाटा (माहिती) कोर्स स्टेशनमार्फत सॅटेलाईटशी जुळल्या जाईल. हा डाटा / मोजणी कायमस्वरुपी सर्व्हरवर जतन केली जाईल. यामुळे हा डाटा केंव्हाही उपलब्ध होऊ शकेल.
00000
No comments:
Post a Comment