Monday, June 27, 2022

रासायनिक खतांची खरेदी व निविष्ठांची लिकिंग

किंवा सक्ती होत असल्यास तक्रार नोंदवावी

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि.27:- जिल्हयात सध्या खरीप हंगाम पेरणीचे कामे सुरु आहेत. शेतकरी खते बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत चाचपणी करीत आहेत. जर रासायनिक खत खरेदी सोबत घाऊक खत विक्रेते शेतकऱ्यांना तसेच किरकोळ विक्रेत्यांना इतर निविष्ठांची सक्ती करीत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तात्काळ तक्रार नोंदवावी. तसेच जिल्हा तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक 9673033085 (व्हॉटसप क्रमांक) व 02462-284252 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

बाजारपेठेत आज स्थितीत जिल्हयात किरकोळ कृषि सेवा केंद्र धारकाकडे खालील प्रमाणे खत साठा उपलब्ध आहे. युरीया 18360 मे.टन, डीएपी 2481 मे.टन, एमओपी 1676 मे.टन, संयुक्त खते 14411 मे.टन, एसएसपी 8634 मे.टन असे एकूण 45 हजार 562 मे. टन साठा खत साठा शिल्लक उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी गरजेनुसार व कृषि विद्यापिठ यांच्या शिफारस मात्रेनुसार पिकांना लागणाऱ्या खतांची खरेदी करावी. एकात्मिक अन्न व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट खतांचा संतुलीत वापर करावा. विद्यापिठाने शिफारस मात्रेनुसार खत नियोजन करते वेळेस कमी खर्चात खतांचे नियोजन होईल याची काळजी घ्यावी. एकाच कोणत्याही खताची आग्रह न धरता उपलब्ध खतापासुन पिकास शिफारस मात्रेप्रमाणे खताचा वापर करावा असेही आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

 गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील

जमीन मालकांना अकृषिक परवानगीची आवश्‍यकता नाही

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि.27 :-जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी आवश्‍यक परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि कार्यप्रणालीत सुलभता आणण्‍यासाठी शासनाने महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42-ब, 42-क,42-ड समाविष्‍ट केले आहे. या कलमान्‍वये अकृषिक आकारणी व रूपांतर कर भरणा केलेले चलन किंवा पावती ही विकास योजनेत दर्शविलेल्या वापरामध्‍ये अकृषिक झाल्‍याचे पुरावा म्‍हणून ग्राहय धरण्‍यात येईल. त्‍याबाबतीत आणखी कोणताही पुरावा आवश्‍यक असणार नाही. नागरीकांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर केले आहे. 

ज्‍या ठिकाणी प्रारूप/अंतिम विकास योजना आणि प्रारूप/अंतिम प्रादेशिक योजनेमध्‍ये प्रसिध्‍द केलेल्‍या गटातील क्षेत्रात विकास योजनेनुसार वापर निश्चित असलेल्‍या प्रयोजनासाठी तसेच गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील समाविष्‍ट गटांच्‍या जमीन मालकांना अकृषिक परवानगीची आवश्‍यकता असणार नाही. नांदेड जिल्‍हयातील प्रारूप/अंतिम विकास योजना,अंतिम प्रादेशिक योजनेमध्‍ये प्रसिध्‍द केलेल्‍या विकास योजनेनुसार वापर निश्चित असलेल्‍या स.नं/गट नं.ची यादी संबधित कार्यक्षेत्रातील तहसिलदार व तलाठी कार्यालयात तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या nanded.nic.in या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. गावठाणाच्‍या कलम 122 खालील घोषीत हद्दीपासून वापर निश्चित असलेल्‍या जमीनीचे स.नं./गट नं. च्‍या यादया तयार करून संबधित गावातील तलाठी यांचेमार्फत जमीन मालकांना अकृषिक आकारणी व रूपांतर कर भरणा करणेकामी नोटीसा लवकर पाठविण्‍यासाठी तहसिलदार यांना सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. 

नांदेड जिल्‍हयामधील प्रारूप/अंतिम विकास योजनेमध्‍ये आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्‍ये तसेच गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील समाविष्‍ट असलेल्‍या स.नं./गट नं. मधील जमीन मालकांनी स्‍वतः संपर्क साधून संबधित कार्यक्षेत्रातील तहसिल किंवा तलाठी कार्यालयात अकृषिक आकारणी व रूपांतर कर रक्‍कमेचा भरणा करावा. त्‍यानुसार केवळ अकृषिक आकारणी व रूपांतर कर रक्‍कमेच्‍या भरलेल्‍या पुराव्‍यावरून विकास अथवा बांधकाम परवानगी नियोजन प्राधिकरणाकडून दिली जाणार आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  15 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 851 एवढी झाली असून यातील 1 लाख 136 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 2 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण  3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 18, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2 असे एकुण 23 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 7 हजार 405

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 237

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार851

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 136

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...