आपत्ती व्यवस्थापनात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची
- महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड, दि. 3 :- प्रगत देशांमध्ये सामाजिक शिस्त, देशाप्रतीचे
प्रेम, आदर नागरी कर्तव्यांचे काटेकोर पालन आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी
या तीन गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले जाते आणि त्याला अनुसरूनच आपली जीवनशैलीही
पाळली जाते. प्रगत देश या सर्व गोष्टींसाठी अत्यंत जागरुक असतात आणि आपत्ती व
आपत्ती व्यवस्थापन याविषयीची जनजागृती यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका ही अत्यंत
महत्त्वाची असते, असे प्रतिपादन महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज
येथे केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
दीक्षांत मंच येथे दि. 3
जून ते 12 जून या कालावधीत होणाऱ्या
राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर, आव्हान-2019 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रमुख
पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख तसेच विशेष कार्य
अधिकारी डॉ. अतुल साळुंके, महामहीम राज्यपाल महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बी.
वेणूगोपाल रेड्डी, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी हे उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले ,सध्याच्या
काळात प्रत्येक राष्ट्राने आपत्ती व्यवस्थापनाकरिता नेहमीच सज्ज राहायला हवे. खरे तर
आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच देणे, ही
काळाची गरज आहे. भारत देश हा विकसनशील
देशांमधील अग्रेसर देश आहे. एकविसाव्या
शतकातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे सबंध जग पहात आहे. अशा या टप्प्यावर भारताकडे असलेल्या युवा
शक्तीचा वापर राष्ट्रहितासाठी प्रगतीसाठी योग्य मार्गाने होणे गरजेचे आहे.
महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव आपल्या
भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष कौतुक करताना म्हणाले की, राष्ट्रउभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका
अत्यंत आवश्यक व मोलाची आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या स्वच्छ भारत
मिशन अभियानामध्ये या विद्यार्थ्यांचा खूप चांगला उपयोग होणार आहे. हेच युवक -
युवती उद्याचे देशाचे भविष्य आहे. या विद्यार्थ्यांना या वयात दिले जाणारे
प्रशिक्षण त्यांच्या पुढील आयुष्यभरासाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे
दरवर्षी राष्ट्रीय “ आपत्ती
प्रतिसाद पथका ”तर्फे अशा प्रकारची
प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात यावीत, मात्र त्याचबरोबरीने दरवर्षी सुरक्षा कवायतही
(Security Drill) आयोजित करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात राज्याच्या विविध
महाविद्यालयांमधून आलेल्या 800 मुले व 600 मुलींचे राज्यपाल
श्री. राव यांनी विशेष अभिनंदन केले आणि त्यांना आवाहनही केले की, या प्रशिक्षणाचा सर्वार्थाने लाभ घ्या आणि
समाजाला उपयोगी पडेल असे काम करा. जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे
प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निश्चितच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी
यावेळी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमापूजनाने व
तद्नंतर दीपप्रज्वलनाने या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याचबरोबर एनएसएसच्या विद्यार्थिनींनी
राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत गाऊन येथील वातावरण अधिक उत्साही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. या
प्रास्ताविकात त्यांनी राज्यभरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित
करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. स्वामी
रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या विविध
कामगिरीबाबतचा विस्तृत अहवाल महामहीम राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव , उपस्थित
मान्यवर तसेच विद्यार्थ्यांना सादर केला.
शेवटी आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे
विद्यापीठातील संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले.
विद्यापीठ परिसरात महामहीम राज्यपाल चे.
विद्यासागर राव यांच्या हस्ते
विविध कार्यक्रम संपन्न
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
या भेटीदरम्यान महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसही भेट दिली. त्याचप्रमाणे
त्यांनी एनडीआरएफच्या आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शनास भेट दिली. त्यानंतर त्यांच्या
हस्ते श्री. गुरू गोविंद सिंघजी अध्यासन संकुलाच्या इमारतीचे भूमीपूजन संपन्न झाले.
त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल
इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर व प्राणी संग्रहालयाच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन महामहीम
राज्यपाल श्री. चे . विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच या परिसरात त्यांच्या
हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.
रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार
समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी, निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण
पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी
मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.
00000