Thursday, October 14, 2021

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 761 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 351 एवढी झाली असून यातील 87 हजार 678 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, देगलूर 1, हिंगोली 1 असे एकुण 3 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणात येथील 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आज 21  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 43 हजार 593

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 40 हजार 66

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 351

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 678

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

 

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे 

नांदेड, दि. 14 (जिमाका) :- कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशान्वये विविध बाबींवर, कामावर आणलेले निर्बंध पूनर्विचारांनी शिथिल करण्यात येत असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 11 ऑक्टोंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आले आहेत.  

त्याअनुषंगाने शासन मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तीचे पालन करण्याच्या अधीन राहून चित्रपटगृहे, नाट्यगृहे, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व अटी व शर्तीचे तंतोतंत पालन होत असल्याची खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

000000


 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्देश 

नांदेड, दि. 14 (जिमाका) :- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कोविड-19 मुळे ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे, अशा संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी दिले आहेत. यात नियोजन आराखड्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याबाबत स्पष्ट केले आहे. 

त्याअनुषंगाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील संस्थाची अर्हता दिनांकाप्रमाणे प्रारुप मतदार यादी तयार करुन प्राधिकरणाचे आदेशानुसार निवडणूक निधीसह संबंधित जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व तालुका सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सहकारी संस्था व समिती सदस्य  यांनी आपल्या संस्थेची प्रारूप मतदार यादी विहित नमुन्यात तयार करुन निवडणूक निधीसह तात्काळ जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी किंवा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयास सादर करावी. ज्या संस्था प्रारुप मतदार यांदी निवडणूक निधीसह सादर करणार नाहीत अशा संस्थांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची राहील, असेही जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.

0000

अनाधिकृत बायोडिझेल विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात अनाधिकृतरित्या बायोडिझेलची विक्री करताना कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास जिवनाश्यक वस्तु अधिनियम 1955 च्या तरदुदीन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहेत. 

राज्यात बायोडिझेलच्या अवैध विक्रीस प्रतिबंध बसावा यासाठी 11 मे 2021 रोजी राज्याचे बायोडिझेल उत्पादन साठवणुक पुरवठा व विक्री धोरण 2021 धोरण निश्चित करण्यात आले. या धोरणानुसार विनापरवानगी बायोडिझेलची विक्री करणाऱ्या व्यक्ती व संस्थावर गुन्हा नोंदवून प्रस्तापित करावाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात तक्रार संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांच्याकडे लेखी तक्रार करावी तसेच तक्रारीमध्ये दोषी आढल्यास त्याच्याविरूध्द वस्तु अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने करवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहे.

00000


तंबाखू नियंत्रण पथकामार्फत भोकर येथे 24 विक्रेत्यांवर कारवाई 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- भोकर तालुक्याच्या ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची सरार्स विक्री होत असल्याचे जिल्हाप्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी धाडी टाकून  24 तंबाखू विक्रेत्यांकडून 31 हजार 50 रूपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन व विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

शासन निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन किंवा धुम्रपान अथवा विक्री करता येत नाही. केवळ तंबाखू साठी नव्हे तर सुगंधित सुपारी, पान मसाला, खुला तंबाखू व धुम्रपान यासाठी लागू आहे.खाण्यापिण्याच्या गोष्टी विक्रीच्या ठिकाणी तंबाखू असलेली कोणतीही गोष्ट विकण्यास मनाई करण्यात आली आहे.तंबाखू विक्रीसाठी  परवाना लागत असून सदर परवाना धारक ठिकाणी कोणत्याही  प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय विक्री करता येत नाही.उल्लंघन करणाऱ्यांवर विविध कायदा तसेच त्यातील विविध कलमान्वये कार्यवाही करता येईल.

जिल्हा शल्यचिकित्सक निलंकठ भोसीकर, नोडल अधिकारी डॉ.हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.या पथकात जिल्हा सल्लागार डॉ.साईप्रसाद  शिंदे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, ग्रामीण रूग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंढे, दंतशल्य चिकित्सक डॉ.राजाराम कोळेकर, पोलिस निरीक्षक विकास पाटील याची उपस्थिती होती.सार्वजनिक ठिकाणी अथवा शैक्षणिक शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष येथे तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निलंकठ भोसीकर यांनी केले आहे.

000000





 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात 144 कलम 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 ऑक्टोंबर पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 नोव्हेंबर 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

0000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-जिल्ह्यात रविवार 31  ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यात  शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहे,अशी माहिती  अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 17 ऑक्टोबर रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून 31 ऑक्टोबर 2021 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. 

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना या आदेशात नमूद असलेल्या कृत्ये सार्वजनिक परिसरात किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश कामावरील पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी तसचे परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी सभा, मिरवणुका मोर्चा, काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलिस अधिक्षक नांदेड यांना प्राधिकृत केलेल्या इतर पोलिस अधिकारी यांना राहील.

00000

 पीएसए (ऑक्सीजन) प्लांट ऑपरेटर अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय पीएसए प्लांट ऑपरेटर या अभ्यासक्रमासाठी निशुल्क प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी एनटीसी (आयटीआय) फिटर या विषयात एनएटीसी पास होणे आवश्यक आहे. फिटर, वेल्डर, एमएमटीए, आरएसी इलेक्टीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, एओसीपी, एमएमसीपी, आयएमसीपी आदी ट्रेड मध्ये उत्तीर्ण असल्यास उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजनेंतर्गत असलेले हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र 02462-251674 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

 आसना नदीवरील नवीन पुलावरुन आजपासून एकेरी वाहतूक होणार सुरू 

·         जनतेच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य 

नांदेड, दि. 14 (जिमाका) :- नांदेड जवळील आसना नदीवरील नवीन पुलावरुन आजपासून विजयादशमीचे मुहूर्त साधत एकेरी वाहतूक सुरू केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत नुकताच धोरणात्मक निर्णय घेऊन रस्त्यावरील अपघात व वाहतुकीची होणारी कोंडी कमी करण्याच्यादृष्टिने धोरणात्मक निर्णय जाहीर केला होता. 

आसना नदीच्या पुलावरुन होणारी वाहतूक व वाहनांची संख्या आणि अपघाताचे  प्रमाण लक्षात घेऊन आसना नदीवर नवीन पूल उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. गत जानेवारी महिन्याच्या अखेरीस भूमीपूजन झालेल्या या पुलाचे काम अवघ्या 9 महिन्यात युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. जनतेच्या हिताला अधिक प्राधान्य देऊन नवीन उभारण्यात आलेला हा पूल उद्घाटनाचा कोणताही सोपस्कार न करता येत्या विजयादशमीपासून खुला करण्याचा  निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन युध्दपातळीवर गुणवत्तापुर्ण कामातील कटिबद्धतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.

 

अवघ्या 250 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची निर्मिती कंत्राटदार टी ॲन्ड टी लि. पुणे यांच्याकडून सुरक्षिततेचे सर्व मापदंड व निकष पूर्ण करून केली आहे. विशेष म्हणजे जुन्या पुलापेक्षा या पुलाची उंची थोडी अधिक घेतल्याने पूर परिस्थितीतही या नवीन पुलावरुन पाणी गेले नाही, हे विशेष. या पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची झालेली सुमार अवस्था, सध्या वाहतूक सुरू असलेल्या पुलावरील मार्गाची झालेली दूरअवस्था, अपघाताची  श्रृखंला, रोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले नागरीक, राष्ट्रीय महामार्गावरील संथगतीने चालू असलेल्या प्रस्तावित पुलाबाबतची वस्तुस्थिती लक्षात घेऊन सदरील पूल या विजयादशमीपासून कोणत्याही औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याची माहिती भोकर येथील कार्यकारी अभियंता कोरे यांनी कळविले आहे. पुलाच्या पोचमार्गाचे व इतर काम या महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

000000

 पिकांच्या नुकसान वाटप रक्कमेतून कोणतीही वसुली न करण्याचे बँकांना आदेश 

नांदेड, दि. (जिमाका) 14 :- राज्य सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे शासन परिपत्रकान्वये गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या खात्यावर जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली न करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. 

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, व्यापारी, ग्रामीण तसेच सहकारी बँकांनी परिपत्रकात दिलेल्या सूचनेनुसार शासनाकडून पिकांच्या नुकसानीसाठी वाटप केलेल्या रक्कमेसंबंधित खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसूली करु नये तसेच शासन परिपत्रकाची अंमलबजावणी कटाक्षाने करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.

0000

 कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाबाबत लवकरच कार्यपद्धती

 नांदेड, दि. (जिमाका) 14 :- सर्वोच्च न्यायालयाचे 30 जून 2021 रोजीच्या आदेशानुसार व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी 11 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये  एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे.

त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या निर्देशानुसार रुपये 50 हजार एवढे सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड नियंत्रण कक्ष / आपत्ती व्यवस्थापन प्रभाग तळमजला, वजिराबाद नांदेड-431601. संपर्क क्र. (02462) 235077, टोल फ्री क्र. 1077 वेब साईट:-www.nanded.gov.in   ई-मेल:- nandedrdc@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधता येईल.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हाधिकारी नांदेड आहेत. मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपद्धती लवकरच अधिसूचित करण्यात येईल.  त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड विभागाने  कळविले आहे.

0000

 जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत

प्रति पिक बारा कापणी प्रयोग 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता काढण्यासाठी महसुल मंडळामध्ये प्रति पिक बारा कापणी प्रयोग नुकताच घेण्यात आला. नांदेड तालुक्यातील सुगाव बु येथील  शेतकरी संजय तुकाराम गुबरे  यांच्या शेतातील सोयाबिनची कापणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत करुन वजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वत: पिकाची पाहणी केली. 

सन 2021 च्या खरी हंगामामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात शेतामध्ये पाणी साचणे, शेतामधून पाणी वाहने आदी बाबीमुळे सोयाबिन, कापूस, तुर, उडीद, इत्यादी पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनी व कृषि सह महसुल प्रशासनाकडे तक्रार सुचना प्राप्त झाले आहेत. त्याच अनुषंगाने नुकतीच सोयाबिन पिकांतील पिक कापणी प्रयोग घेण्यात आला. सुगाव बु गावातील संजय तुकाराम गुबरे यांच्या गट क्र. 174 यांच्या शेतात 10x5  मी. अर्धा गुंठा क्षेत्रातील सोयाबिनची कापणी करण्यात आली या कापणी प्रयोगाच्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषि अधिकारी सिध्देश्वर मोकाळे, मंडळ कृषि अधिकारी लिंबगाव पप्रकाश पाटील, सतीश सावंत , कृषि पर्यवेक्षक लिंबगाव लांबडे , कृषि सहाय्यक देवजी बारसे, वसंत जारीकोटे, विमा कंपनीचे गौतम कदम, महेश हनुमंते, सुगावचे सरपंच तानाजी फुलारी, पोलीस पाटील विजय रावळे, तलाठी शिवलिंग गंठोड, ग्रामसेविका निलकंठवार, शेतकरी तुळशीराम हिंगमिरे, कोंडीबा भोसले, विजय गुबरे, श्रीनिवास शिंदे व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

00000





 दसऱ्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु

नांदेड (जिमाका) दि. 14 :- दसरा सणानिमित्त शुक्रवार 15 ऑक्टोंबर 2021 रोजी सार्वजनिक सुट्टी आहे.  या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहनाच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...