वृत्त क्रमांक 339
विष्णुपुरी प्रकल्पातून शेतकऱ्यांना नियोजनानुसारच पाणीपुरवठा
जलसंपदा विभागाकडून चुकीच्या वृत्ताचे खंडण
नांदेड दि.१ एप्रिल : जलसंपदा विभागामार्फत रब्बीसाठी चार पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामा करिता तीन पाणी पाण्याचे नियोजन कधीच घोषित करण्यात आले नाही. ही माहिती चुकीची असून 2024-25 साठी रबी हंगामाकरिता तीन पाणी पाळ्या देण्यात येणार आहे. कृपया शेतकऱ्यांनी त्यानुसार रब्बीचे नियोजन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने रब्बी हंगाम सुरू होतांना केले होते.
यासंदर्भात नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता सी.आर. बनसोड यांनी अधिकृत माहिती जारी केली आहे. काही वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात चुकीचे वृत्त प्रसारित झाल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. सन 2024- 25 यावर्षीच्या धरण साठा व त्या अनुषंगाने सिंचन नियोजन याबाबत नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालयात 11 नोव्हेंबर 2024 रोजी बैठक झाली. त्यामध्ये रब्बी हंगाम 2024 -25 करिता कालव्यावरील सिंचनासाठी तीन पाणी पाळ्या देण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
त्यानुसार प्रथम पाणी पाळी दोन डिसेंबर ते 25 जानेवारी या काळात देण्यात आले. तर 26 जानेवारी ते 14 मार्च या कालावधीत द्वितीय पाणी देण्यात आले. याबाबत लाभ क्षेत्रातील शेतकरी समाधानी आहेत. रब्बी हंगाम २८ फेब्रुवारी ला समाप्त होत असला तरी उभ्या पिकांना गरजे नुसार १४ मार्च पर्यंत आवर्तन सुरू ठेवले होते. उन्हाळी हंगामा करिता कालव्याच्या सिंचनासाठी कोणत्याही पाणी पाळीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे हे निराधार वृत्त विनाकारण पसरविले जात आहे.
लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना या संदर्भातील कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही तक्रारी नाही.मात्र काही वृत्तपत्रांमध्ये रब्बी हंगामाकरिता चार पाणी पाळ्या, उन्हाळी हंगामा करिता तीन पाणी पाळयाचे नियोजन घोषित केल्याचे म्हटले आहे. ही बाब चुकीची असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे.
जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरील सिंचनासाठी देण्यात आलेल्या दोन आवर्तनास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.
काही वृत्तपत्रांनी भुईमूग व उन्हाळी ज्वारीचा शेतकऱ्यांनी पेरा केला असून पिकांना आवश्यक ते पाणी मिळाले नाही. हाती येणारे पीक पाण्याअभावी वाळत आहे, असे नमूद केले आहे. परंतु जलसंपदा विभागातर्फे कालव्यावरील उन्हाळी हंगामातील कोणत्याही पिकांना पाणी देण्याबाबतचे नियोजन कधीच जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा जलसंपदा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती ठेवावी. त्यानुसार आपल्या पिकांचे नियोजन करावे, कोणत्याही अफवांना बळी पडू नये, योग्य ती माहिती घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आली आहे.
00000