Tuesday, April 1, 2025

वृत्त क्रमांक 337

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत 7 एप्रिलपर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड दि. 1 एप्रिल :-  मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉनटेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबलटेनिस, वेटलिफटींग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अश्या संस्थाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

इच्छुक संस्थानी अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे क्रीडा अधिकारी विपुल दापके यांचा मो.क्र. 9511724095, 9860521534 यांचेशी संपर्क साधावा. हा अर्ज 7 एप्रिल, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रासह परीपुर्ण भरुन द्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्यावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वेधकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूसाठी करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी प्रशिक्षक व संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र शासनाने “मिशन लक्ष्यवेध” या महत्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने सबंधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, 51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग व 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. क वर्ग अकादमींना वार्षिक रु 10 लक्ष, ब वर्ग अकादमींना वार्षिक 20 लक्ष रुपये व अ वर्ग अकादमींना वार्षिक 30 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य, पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ. बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे. तरी नांदेड जिल्हयातील इच्छुकांनी या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार... अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे! https://notto.abd...