वृत्त
कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 'ड्रोन'चा वापर
· जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संवेदनशील केंद्रांना भेटी
नांदेड, (जिमाका) दि. 21 :- यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास कोणतीही गय केली जाणार नाही. तसेच उपद्रवी केंद्राची मान्यता काढण्याची शिफारस मंडळाकडे करण्यात येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 7 फेब्रुवारी 2024 च्या बैठकीत केले होते. त्यानुसार आजच्या पहिल्या दिवशीच्या इंग्रजी विषयीच्या पेपरच्या दिवशी काही निवडक परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले. असा प्रयोग करणारा नांदेड जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
यावर्षी दिनांक 7 व 14 फेब्रुवारी 2024 या तारखांना जिल्हाधिकारी यांनी बैठका घेतल्या होत्या व कोणत्याही गैरप्रकारास थारा दिला जाणार नाही याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आजच्या पहिल्या दिवशीच्या पेपरला जिल्हयातील नायगाव व मुखेड तालुक्यातील काही निवडक केंद्रावर ड्रोनद्वारे परीक्षा केंद्राचे चित्रीकरण करण्यात आले. यामध्ये उपद्रवी व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांचेविरुध्द फौजदारी कारवाई करण्यासाठी निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्याचा प्रयोग करणारा नांदेड जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे. यामुळे गैरप्रकार करणा-या व्यक्तींना व त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना चपराक बसणार आहे.
जिल्हयात एकुण 101 केंद्रावर बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आलेली असून प्रत्येक बैठे पथकात महसूल, पंचायत समिती व शिक्षण विभाग असे एकुण 3 सदस्य आहेत. बैठे पथकाने पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर थांबून परीक्षा सुरळीत चालू राहण्यासाठी कार्यवाही करायची आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग-1 अधिका-यांची 5 विशेष भरारी पथके नियुक्त केली असून त्यांनी संवेदनशील केंद्रांना भेटी देण्यासाठी आदेशित केलेले आहे. तसेच मंडळ कार्यालयाकडून 06 भरारी पथके कार्यान्वित असून यामध्ये प्राचार्य डायट, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक व विशेष महिला पथक जिल्हयात कार्यान्वित आहे. अशा प्रकारे जिल्हयात एकुण 51 भरारी पथके कार्यान्वित आहेत.
आजच्या इयत्ता 12 वीच्या पेपरच्या दिवशी जिल्हयातील सर्व अधिकारी यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये स्वत: जिल्हाधिकारी यांनी कंधार व नायगांव तालुका पिंजून काढला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नांदेड शहरातील केंद्रांना भेटी दिल्या. पोलीस अधिक्षक यांनी कंधार, नायगांव व बिलोली तालुक्यातील केंद्रांवर भेटी दिल्या. तर मंडळाकडून नियुक्त भरारी पथकांनी मुखेड, अर्धापूर, हदगांव, किनवट, देगलूर, माहूर या तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यामध्ये शेकापूर येथे 07, गांधीनगर येथे 01 व हिमायतनगर येथील केंद्रावर 01 असे एकुण 09 प्रकरणे गैरप्रकाराची जिल्हयात घडली आहेत. आजच्या एकुण 101 परीक्षा केंद्रावर 42089 परीक्षार्थ्यांपैकी 41118 परीक्षार्थी उपस्थित होते. तर 971 परीक्षार्थी अनुपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.69 टक्के एवढी होती.
000000