Wednesday, February 21, 2024

 वृत्त क्रमांक 155

 

कॉपीमुक्त परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 'ड्रोन'चा वापर

 ·     जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संवेदनशील केंद्रांना भेटी 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- आजपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाने ड्रोन कॅमेराचा वापर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक संवेदनशील केंद्रांना आज भेटी देऊन या अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा केली. 

21 फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये प्रशासनाने 28 संवेदनशील केंद्राची निवड केली आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून कुठेही गैरप्रकार होऊ नये यासाठी आज ड्रोन कॅमेरा वापरण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांसोबतच इतरांवरही कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. 

आज प्रशासनाने ड्रोन कॅमेराद्वारेच अनेक केंद्रांवर या संदर्भातील काळजी घेतली. जनता हायस्कूल नायगाव, नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल पानभोसी तालुका कंधार या केंद्रावर ड्रोनने परिसराची तपासणी करण्यात आली. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक केंद्रांना आज भेटी दिल्या. संवेदनशील केंद्रांची पहाणी केली. सन 2024 परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व केंद्रावर करडी नजर ठेवली जात आहे. याबाबत तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून नागरिकांनीही या अभियानात हेल्पलाइनवर तक्रार करून प्रशासनाची मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

000000








 

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...