Thursday, April 23, 2020


मनपा क्षेत्रातील कन्टेनमेंट झोनमधील
13 हजार 309 व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे तपासणी
नांदेड, दि. 23 (जिमाका)  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर कन्टेनमेंट झोन मधील एकुण 3 हजार 79 घरांमधील 13 हजार 309 व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतांना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उपआयुक्त (आरोग्य) अजिपाल सिंघ संधू, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मो. बदीयोद्दीन, डॉ. बळीराम भुरके, डॉ. बालाप्रसाद कुंटुरकर, डॉ. कल्याण पवार, आरोग्य पर्यवेक्षक, 40 आशा वर्कर आणि 40 परिचारिका यांनी कन्टेनमेंट झोनमध्ये नागरिकांची तपासणी केली.
पिरबुऱ्हाणनगर येथील एका 64 वर्षीय नागरिकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर व इंदिरानगर इ. परिसर हा कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना बाधीत व्यक्तीच्या परिवारातील 8 सदस्यांना आरएनआय निवास येथे आज दाखल करण्यात आले.
00000


                    शेतीविषयक आस्थापना चालू ठेवण्यास
सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत वेळेची मुभा  
नांदेड, दि. 23 (जिमाका) शेतकऱ्यांची खरीप पूर्व शेती विषयक कामाची निकड लक्षात घेता शुद्धीपत्रक 24 एप्रिल मध्ये अंशत: बदल करुन केवळ अशा शेतीविषयक आस्थापना, दुकाने, कृषि उत्पन्न बाजर समित्या व त्यांच्याशी निगडीत पुरवठा व वाहतूक ज्यांना यापुर्वीच्या आदेशान्वये चालू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यांना  आता सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा वेळोवेळी निर्गमीत आदेशात नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.  
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच यापूर्वी जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयाने निर्गमित केलेले दि. 13, 15, 19, 21 एप्रिल 2020 वर नमूद आदेश व दिनांक 20 एप्रिल 2020 वर नमूद शुद्धीपत्रकाद्वारे शेती विषयक आस्थापना, दुकाने वगळून इतरांसाठी दिलेले वेळेचे बंधन इत्यादी यापुर्वी प्रमाणेच अंमलात राहील, असे शुद्धीपत्रक जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 23 एप्रिल 2020 रोजी निर्गमित केले आहे.  
00000


मुस्लीम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करावे
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे आवाहन
 नांदेड दि. 23 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी पासून सुरु होत आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरीत्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह इफ्तार पार्टीसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग / संक्रमण मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता असते त्यामधून मोठया प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांनी पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करावे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे पवित्र रमजान महिन्यामध्ये काटेकोरपणे पालन करुन अंमलबजावणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम बांधव मस्जीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार पार्टीसाठी एकत्र येवू नये. घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. लोकांकडून कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येवून साजरे होणार करु नयेत. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह इफ्तार पार्टी इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ठ करु नये.
वरील दिलेल्या सुचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन करुन आपले कर्तव्य पार पाडून समाजातील लोकांचे आपल्या कुटूंबियांच्या आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडून समाजापुढे आदर्श घडवू या. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोरोना विषाणूविरुध्दचा आपला लढा जिंकण्याची मनीषा आपण सर्वजण मिळून बाळगू या...! असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड जिल्हयातील जनतेला केले आहे.
0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...