Thursday, April 23, 2020


मुस्लीम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करावे
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे आवाहन
 नांदेड दि. 23 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी पासून सुरु होत आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरीत्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह इफ्तार पार्टीसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग / संक्रमण मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता असते त्यामधून मोठया प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांनी पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करावे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे पवित्र रमजान महिन्यामध्ये काटेकोरपणे पालन करुन अंमलबजावणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम बांधव मस्जीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार पार्टीसाठी एकत्र येवू नये. घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. लोकांकडून कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येवून साजरे होणार करु नयेत. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह इफ्तार पार्टी इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ठ करु नये.
वरील दिलेल्या सुचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन करुन आपले कर्तव्य पार पाडून समाजातील लोकांचे आपल्या कुटूंबियांच्या आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडून समाजापुढे आदर्श घडवू या. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोरोना विषाणूविरुध्दचा आपला लढा जिंकण्याची मनीषा आपण सर्वजण मिळून बाळगू या...! असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड जिल्हयातील जनतेला केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...