नांदेड जिल्ह्यातील सात ऑगस्टपर्यंतची मतदाराची नव विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी
Thursday, August 8, 2024
विशेष वृत्त 683
विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान
जिल्हयात 27.21 लाख मतदार ; तुम्ही त्यात आहे काय ? खातरजमा करा
दावे व हरकती 20 ऑगस्टपर्यत सादर करा
नांदेड, दि. 8 ऑगस्ट : "यादयामध्ये अनेक मृतकांची नावे आहेत, गेल्या वेळी या मतदान केंद्रावर होते आता त्या मतदान केंद्रावर नाव कसे गेले, माझे नाव कालपर्यंत होते आज का वगळले आहेत, प्रशासनाने लक्ष दिले नाही" ,मतदानाच्या दिवशी असे आरोप करण्यापेक्षा 20 ऑगस्ट पर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्या व आपल्या नावाची खातरजमा करा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.
मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर नोंदणी करण्यासाठी 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. थोडक्यात येत्या विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आपली नावे मतदान यादीत आहे, हे माहिती करून घेण्यासाठी जिल्ह्यातील तमाम मतदारांना 20 ऑगस्ट पर्यंत आपल्या हरकती व दावे नोंदवता येणार आहे. यासाठी 20 ऑगस्टपर्यंत आपल्या नियमित मतदार केंद्रावर दररोज मतदान केद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ ) उपस्थित राहणार आहे. 30 ऑगस्टला ही प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यानंतर अंतिम होणाऱ्या यादीतील मतदारांनाच विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे, याची अतिशय गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट,हदगाव,भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे.नागरिकांना या यादीत काही दावे व हरकती असल्यास 20 ऑगस्टपर्यत सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
मतदार यादीतील सध्याची संख्या
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघाच्या मतदारांची यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द झाली आहे. प्रारुप मतदार यादीतील मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे. 83 –किनवट मतदार संघ एकूण 2 लाख 71 हजार 892 तर 84- हदगाव मतदारसंघात 2 लाख 91 हजार 646, ८५ –भोकर मध्ये 2 लाख 96 हजार 20 मतदाराची संख्या आहे, ८६ -नांदेड उत्तर मतदार संघात 3 लाख 50 हजार 55 तर 87- नांदेड दक्षिण मतदार संघात 3 लाख 10 हजार 832, 88-लोहा 2 लाख 94 हजार 152 तर 89 –नायगाव मतदार संघात 3 लाख 3 हजार 367, 90- देगलूर मतदार संघात 3 लाख 5 हजार 438 व 91-मुखेड मतदार संघात 2 लाख 98 हजार 18 मतदार संख्या आहे. नऊ विधानसभा मतदार संघात एकूण 27 लाख 21 हजार 420 मतदारांची संख्या असून यात 14 लाख 3 हजार 943 पुरुष तर 13 लाख 17 हजार 310 महिलांचा तर 167 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. या नऊ मतदार संघात 18 ते 19 वयाचे एकूण 48 हजार 586 नवमतदार असून नवीन मतदार नोंदणी फार्म संख्या 38 हजार 601 आहे.
या ठिकाणी बघा प्रारूप याद्या
नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तसेच सहाय्यक नोंदणी अधिकारी तहसीलदार यांचे कार्यालय व सर्व पदनिर्देशित ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सहा ऑगस्ट रोजी भारत निवडणूक आयोगाच्या निर्धारित कार्यक्रमानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.
20 ऑगस्टपूर्वी आक्षेप नोंदवा
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आगामी विधानसभा निवडणूक पुढे ठेवून सुरू झाला असून त्या अंतर्गत ही दुसरी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यासंदर्भात कोणाला आक्षेप असल्यास 20 ऑगस्ट पूर्वी राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिक आपला अर्ज आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर असणाऱ्या बीएलोकडे दाखल करू शकतात.
कुठे करायची मतदार नोंदणी ?
आपल्या घरातील कोणी मृत झाले असेल तर त्याचे नाव काढणे, ही आपली जबाबदारी आहे. यासाठी बीएलओला गावामध्ये ग्रामसेवकाने सहकार्य करावे. आपल्या घरातील अठरा वर्षावरील मुला मुलीचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे , आपल्या केंद्राची माहिती घेणे, आपले नाव नव्याने मतदार संघात आले असल्यास नोंदविणे, जुन्या मतदारसंघातून काढणे या सर्व प्रक्रियेसाठी तुम्ही ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील मतदान केंद्रावर दररोज 20 तारखेपर्यंत काम करणार आहे. तसेच या कामासाठी विशेष मोहीम 10 व 11 तसेच 17 व 18 ऑगस्टला राबविली जाणार आहे. दररोज कार्यालयीन वेळेत केंद्रस्तरीय अधिकारी उपलब्ध असेल. त्याच्याकडे ही सर्व कामे होऊ शकतात व मतदार म्हणून नोंदणी ही होऊ शकते. येणाऱ्या दोन शनिवार व रविवारी विशेष नोंदणी शिबीराला या कामाला नागरिकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बीएलओ गैरहजर राहिल्यास कारवाई
सहा तारखेपासून नोंदणी सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी बीएलओ हा महत्त्वाचा घटक आहे. वीस तारखेपर्यंत मतदान केंद्रावर त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी खातरजमा करावी. ज्याला ही जबाबदारी दिली आहे, तो केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहील, याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
00000
वृत्त क्र. 682
मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 8 ऑगस्ट :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे उदा : चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी. खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु केली आहे. पात्र रक्कम 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड येथे अर्ज सादर करावेत.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे आवश्यक
दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावे. आधार कार्ड / मतदान कार्ड. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे बँक पासबुक झेरॉक्स. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. उत्पन्नाचे प्रमाणपत्र. (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे.)
स्वयं-घोषणापत्र - CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र नमुद करण्यात यावे. वर नमूद साधनांपैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमुद करणे.
वरिल कागदपत्रे पुर्ण करणारे लाभार्थ्यांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर , नांदेडयेथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. तसेच या पूर्वी अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे करीत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.
00000
वृत्त क्र. 681
राष्ट्रीय मुख दिनानिमित्त ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. 8 ऑगस्ट : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाने राष्ट्रीय मुख दिनाचे औचित्य साधून 7 ऑगस्ट रोजी ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता . हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल] विष्णुपूरी येथे इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख उदिष्ट विद्यार्थ्यांना दंत आणि मुख आरोग्याचे महत्व पटवून देणे आणि तंबाखूच्या व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समाजावून सांगणे हे होते. यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध आणि रांगोळी स्पर्धा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धामध्ये मोठया प्रमाणात उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या सर्जनशीलतेतून तंबाखूच्या दुष्पपरिणामाचे चित्रण केले.
अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांच्या उपस्थितीत विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. दंतशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला जाधव, श्री. वेद पाठक, डॉ. समीक्षा, डॉ. प्रतीक्षा इ. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मुख आरोग्याचे महत्व आणि तंबाखूच्या व्यसनाचे गंभीर परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सुशील येमले आणि डॉ. ऐश्वर्या चंद्रण यांनी खेळामध्ये होणाऱ्या इजा आणि त्यांच्यावर कशी काळजी घ्यावी याबाबत व्याख्यान दिले. यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या आयुष्यातील आरोग्याविषयक काळजीबद्दल जागरुकता निर्माण झाली.
कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण करुन झाली. तसेच मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. जे पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचे महत्व अधोरेखित करतात. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन डॉ. अरुण नागरिक यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले आणि विद्यार्थ्यामध्ये मुख आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात या उपक्रमाने मोलाचे योगदान दिले.
00000
गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
वृत्त क्र. 680
गोशाळांनी अनुदानासाठी 25 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 8 ऑगस्ट :- गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत गोशाळांना अनुदान देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पात्र व इच्छूक गोशांळाचे अर्ज मागविण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, उमरी, नायगाव, भोकर, कंधार, देगलूर या सहा तालुक्यामधून पात्र व इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.
सर्वसाधारण अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत
सदर संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी. भारत पशुधन प्रणालीवर गोशाळा मालकाची व गोशाळेत असलेल्या पशुधनाची नोंद असणे बंधनकारक आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे तपासणी अहवालात नमुद पशुधनाच्या नोंदीनुसारच अनुदान देय राहील. या संस्थेचे नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेखा परिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असावा. संस्थेकडे चारा, वैरण उत्पादनासासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा 30 वर्षे नोंदणीकृत भाडेपट्यावरची किमान 5 एकर जमीन असावी. संस्थेने या योजनेअंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी 10 टक्के एवढे खेळते भागभांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे. संस्थेस गोसेवा, गोपालनाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहील. संबंधित संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. संस्थेवर कार्यरत कर्मचारी, मजूर यांचे वेतन इ. चा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी संस्था आर्थिकदृष्टया सक्षम असावी. या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल त्याच बाबीसाठी भविष्यात नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार नाही. ज्या संस्थेकडे पशुधनाच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वत:च्या उत्पनाचे साधन आहे अशा संस्थाना प्राधान्य देण्यात येइल. प्रशासकीय विभागाची पुर्वपरवानगी घेऊन केवळ मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देय राहील. प्रशासकीय विभागाची पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुलभूत सुविधा निर्माण केल्यास अशा बाबीसाठी या योजनेत अनुदान मंजूर करण्यात येणार नाही.
निवड करण्यात आलेल्या गोशाळेस त्यांच्याकडे असलेल्या पशुधन संख्या विचारात घेवून दोन टप्यामध्ये अनुदान देय राहील.
50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळेना 15 लक्ष रुपये अनुदान देय राहील. प्रथम हप्ता 9 लक्ष व दुसरा हप्ता 6 लक्ष रुपये याप्रमाणे राहील. 101 ते 200 पशुधन संख्या असलेल्या गोशाळेला 20 लक्ष रुपयापर्यत अनुदान देय राहील. प्रथम हप्ता 12 लक्ष व दुसरा हप्ता 8 लक्ष रुपये आहे. 200 पेक्षा जास्त पशुधन असलेल्या गोशाळांना 25 लाख रुपये अनुदान देय असून प्रथम हप्ता 15 लक्ष व दुसरा हप्ता 10 लक्ष रुपये राहील. अर्जाचा नमुना तसेच नियम व अटी याबाबतच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे पात्र व इच्छूकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
00000
वृत्त क्र. 679
जिल्हा रेशीम कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर
नांदेड, दि. 8 ऑगस्ट :- जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड हे नवीन जागेवर स्थलांतरीत झाले असून या कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे आहे. संबंधितानी या कार्यालयाशी संपर्क साधताना नवीन पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी एन.बी.बावगे यांनी केले आहे.
जिल्हा रेशीम कार्यालयाचा पत्ता- जिल्हा रेशीम कार्यालय, रामाकृष्णा इमारत , दुसरा मजला, एम एफ होंडा शोरुमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रक्टर सर्व्हिस सेंटरच्या समोर, हिंगोली रोड नांदेड-431602 तसेच कार्यालयाचा ई-मेल dso3nanded@gmail.com आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असेही कळविले आहे.
-----
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...