Thursday, August 8, 2024

 विशेष वृत्त 683 

विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान

 

जिल्हयात  27.21 लाख मतदार ; तुम्ही त्यात आहे काय ? खातरजमा करा

 

दावे व हरकती 20 ऑगस्टपर्यत सादर करा 

 

नांदेड, दि. 8 ऑगस्ट : "यादयामध्ये अनेक मृतकांची नावे आहेत, गेल्या वेळी या मतदान केंद्रावर होते आता त्या मतदान केंद्रावर नाव कसे गेले, माझे नाव कालपर्यंत होते आज का वगळले आहेत, प्रशासनाने लक्ष दिले नाही" ,मतदानाच्या दिवशी असे आरोप करण्यापेक्षा 20 ऑगस्ट पर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्या व आपल्या नावाची खातरजमा करा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

 

मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर नोंदणी करण्यासाठी 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. थोडक्यात येत्या विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आपली नावे मतदान यादीत आहे, हे माहिती करून घेण्यासाठी जिल्ह्यातील तमाम मतदारांना 20 ऑगस्ट पर्यंत आपल्या हरकती व दावे नोंदवता येणार आहे. यासाठी 20 ऑगस्टपर्यंत आपल्या नियमित मतदार केंद्रावर दररोज मतदान केद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ ) उपस्थित राहणार आहे. 30 ऑगस्टला ही प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यानंतर अंतिम होणाऱ्या यादीतील मतदारांनाच विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे, याची अतिशय गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील किनवट,हदगाव,भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे.नागरिकांना या यादीत काही दावे व हरकती असल्यास 20 ऑगस्टपर्यत सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

मतदार यादीतील सध्याची संख्या

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघाच्या मतदारांची यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द झाली आहे. प्रारुप मतदार यादीतील मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे. 83 –किनवट मतदार संघ एकूण 2 लाख 71 हजार 892 तर  84- हदगाव मतदारसंघात 2 लाख 91 हजार 646,  ८५ –भोकर मध्ये 2 लाख 96 हजार 20 मतदाराची संख्या आहे,  ८६ -नांदेड उत्तर मतदार संघात 3 लाख 50 हजार 55 तर 87- नांदेड दक्षिण मतदार संघात 3 लाख 10 हजार 832, 88-लोहा 2 लाख 94 हजार 152 तर  89 –नायगाव मतदार संघात 3 लाख 3 हजार 367, 90- देगलूर मतदार संघात 3 लाख 5 हजार 438 व 91-मुखेड मतदार संघात 2 लाख 98 हजार 18 मतदार संख्या आहे. नऊ विधानसभा मतदार संघात एकूण 27 लाख 21 हजार 420 मतदारांची संख्या असून यात 14 लाख 3 हजार 943 पुरुष तर 13 लाख 17 हजार 310 महिलांचा तर 167 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. या नऊ मतदार संघात 18 ते 19 वयाचे एकूण 48 हजार 586 नवमतदार असून नवीन मतदार नोंदणी फार्म संख्या 38 हजार 601 आहे.

 

या ठिकाणी बघा प्रारूप याद्या

 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तसेच सहाय्यक नोंदणी अधिकारी तहसीलदार यांचे कार्यालय व सर्व पदनिर्देशित ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सहा ऑगस्ट रोजी भारत निवडणूक आयोगाच्या निर्धारित कार्यक्रमानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

20 ऑगस्टपूर्वी आक्षेप नोंदवा

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आगामी विधानसभा निवडणूक पुढे ठेवून सुरू झाला असून त्या अंतर्गत ही दुसरी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यासंदर्भात कोणाला आक्षेप असल्यास 20 ऑगस्ट पूर्वी राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिक आपला अर्ज आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर असणाऱ्या बीएलोकडे दाखल करू शकतात.

 

कुठे करायची मतदार नोंदणी ?

आपल्या घरातील कोणी मृत झाले असेल तर त्याचे नाव काढणे, ही आपली जबाबदारी आहे. यासाठी बीएलओला गावामध्ये ग्रामसेवकाने सहकार्य करावे. आपल्या घरातील अठरा वर्षावरील मुला मुलीचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे , आपल्या केंद्राची माहिती घेणे, आपले नाव नव्याने मतदार संघात आले असल्यास नोंदविणे, जुन्या मतदारसंघातून काढणे या सर्व प्रक्रियेसाठी तुम्ही ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील मतदान केंद्रावर दररोज 20 तारखेपर्यंत काम करणार आहे. तसेच या कामासाठी विशेष मोहीम 10 व 11 तसेच 17 व 18 ऑगस्टला राबविली जाणार आहे. दररोज कार्यालयीन वेळेत केंद्रस्तरीय अधिकारी उपलब्ध असेल. त्याच्याकडे ही सर्व कामे होऊ शकतात व मतदार म्हणून नोंदणी ही होऊ शकते. येणाऱ्या दोन शनिवार व रविवारी विशेष नोंदणी शिबीराला या कामाला नागरिकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

बीएलओ गैरहजर राहिल्यास कारवाई

सहा तारखेपासून नोंदणी सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी बीएलओ हा महत्त्वाचा घटक आहे. वीस तारखेपर्यंत मतदान केंद्रावर त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी खातरजमा करावी. ज्याला ही जबाबदारी दिली आहे, तो केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहील, याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...