Monday, January 18, 2021

 

34 कोरोना बाधितांची भर तर    

30 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 18 :- सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 34 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 5 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 30 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 415 अहवालापैकी 373 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 110 एवढी झाली असून यातील 20 हजार 993 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 335 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 579 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, खाजगी रुग्णालय 7, माहूर तालुक्यांतर्गत 1, मुखेड कोविड रुग्णालय 1 असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.94 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 19, देगलूर तालुक्यात 1, मुखेड 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 1, भोकर 1, नायगाव 1, यवतमाळ 1 असे एकुण 29 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, किनवट तालुक्यात 1, हदगाव 1  असे एकुण 5 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 335 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 21, मुखेड कोविड रुग्णालय 18, हदगाव कोविड रुग्णालय 1, महसूल कोविड केअर सेंटर 31, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 133, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 50, खाजगी रुग्णालय 26 आहेत.  

 

सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 72 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 96 हजार 024

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 69 हजार 732

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 110

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 993

एकुण मृत्यू संख्या-579

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.94 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-335

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.           

00000

 

रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली संपन्न

रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ

 नांदेड, (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यातील रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 चा प्रारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निस्सार तांबोळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ झाला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांची उपस्थिती होती. या रॅलीस जिल्हाधिकारी कार्यालय येथून पोलीस अधिक्षक कार्यालय-कलामंदिर, आयटीआय-वर्कशॉप कॉर्नर-भाग्यनगर-आनंदनगर-नागार्जुना हॉटेल चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या मार्गाने निघून आयटीआय येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत जिल्हाभरातून विविध सायकल ग्रुपचे सदस्य, शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग घेतला होता. या रॅलीचा समारोप प्रसंगी रस्ते सुरक्षेवर बनविण्यात आलेल्या साहित्याचे विमोचन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते झाले.

प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी रस्ते सुरक्षा अभियानाचे स्वरुप, उद्देश व आगामी महिन्याभरात होणाऱ्या जनजागृतीपर कार्यक्रमाचे विवेचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

0000








 

 

मध केंद्र योजनेतील (मधमाशापालन)

पात्र व्यक्ती / संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 18 :-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) कार्यान्वित झालेली असून पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, औद्योगिक वसाहत उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-240674 व संचालक मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ शासकीय बंगला नं. 5 मु.पो. महाबळेश्वर जिल्हा सातारा. 412806 यांचा दुरध्वनी क्रमांक 02168-260264 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

या योजनेचे वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. मध्य उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती करणे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रता अर्जदार साक्षर असावा स्वत:ची  शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्रचालक प्रगतीशिल मधपाळ व्यक्तीची पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्यानावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 

केंद्रचालक संस्था यांची पात्रतेत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची किंवा भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी निवड प्रक्रीयेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 

0000

बहिणी-बहिणीची शेती ! 

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील बनचिंचोली हे अवघ्या साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. संपूर्ण गावचे अर्थकारण हे शेती भोवती अवलंबून असलेले. या गावातील अनेक शेतकरी कुटूंबापेकी एक असलेले कुटूंब पौळ यांचे.  पिढीजात असलेली नऊ एकर शेती जुन्या वळणाने कसता कसता गणेश पऊळ यांच्या नाकीनऊ आले. शेतीत काही परवडत नाही असा समज करुन घेत गणेश पऊळ यांनी वाहनचालकांची खाजगी नौकरी पत्करुन कसाबसा संसार सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांची होणारी आर्थिक ओढाताण त्यांच्या दोन मुली पुजा आणि धनश्री जवळून पाहत राहील्या. बालपणानंतर या दोघींनी शेतीतूनच घराला हातभार लावण्याचा निश्चय केला. आठवीपर्यंच शिक्षण घेवून त्यांनी पुढे शेतीलाच शाळेचे स्वरुप दिले. वय वर्षे 17 आणि 19 हे तसे अनेक स्वप्नांना घेवून आपल्या भावविश्वांना रंगविण्याचे असते. या दोघींनी हे स्वप्न शेतीभोवती रंगवून चांगले उत्पादन हाती घेण्याचा ध्यास बाळगला. 

घरचीच शेती असल्यामूळे पेरणीपासून वखरणीपर्यंत नांगरणी पासून तण काढेपर्यंतची सारी कामे त्यांनी शिकून घेतली होती. यात एक नैपुण्य जे लागते ते त्यांनी स्वत: शेतात राबवून हाती घेतले. हे कसब घेतले त्यांनी त्यांच्याच वडीलांकडून अर्थात गणेश पऊळ यांचेकडून ! 

पऊळ यांना पाच अपत्य असून चार मुली व एक मुलगा आहे. त्यांची पत्नी मिळून सात जणांचा परिवार आहे. या सात सदस्यांची जबाबदारी कुटूंब प्रमुख म्हणून त्यांची आहे. परिस्थिती बेताचीच असल्याने लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता पूजा व धनश्री यांनी शेतीकडे वळले अधिक सुरक्षित मानले. मुलीचे हे धाडस पाहून कुटूंबातील इतर सदस्यही शेतीकडे वळले. घरचेच मनुष्यबळ शेतीसाठी उपलब्ध झाल्यामूळे त्यांचा मजुरीसाठी द्यावा लागणारा खर्च वाचला.  

गणेश पऊळ यांच्या शेतीपासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावरुन पैनगंगा नदी वाहत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष लाभ त्यांना झाला. या परिसरात विशेषत: त्यांच्या शेतात टयुबवेलला चांगले पाणी लागले. पाण्याची उपलब्धता झाल्यामूळे पुजा व धनश्री यांनी त्यांच्या शेतामध्ये ऊस, कापूस, सोयाबिन, हरभरा, टरबूज, मिर्ची या पिकाचे प्राधान्याने उत्पादन घेण्याला पसंती दिली.  वडिलांचा उपलब्ध असलेला वेळ घेत त्यांनी या पिकांचे नियोजन स्वत: करुन दाखविले. उपलब्ध असलेले पाणी सर्व पिकांना व विशेषत: नोव्हेंबर ते जुलैपर्यंत पुरावे यासाठी ठिंबक सिंचनचा पर्याय त्यांनी निवडला. या तंत्रज्ञानामूळे पिकांना आवश्यक तेव्हा ताण देणे हेही शक्य झाले. पाण्याचा या आधुनिक व्यवस्थापनासमवेत त्यांनी पारंपारिक पेरणीला छेद देत सरीवंरबा पध्दतीचा वापर करुन मल्चिंग पध्दतीचा वापर केला. पेरणीला जे बियाणे निवडले ते अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून नंतर दीड इंच जमिनीत पेरले. 

इतर पिके घेतांना हवामानाचा व वातावरणाचा अभ्यास करुन पिकांची  लागवड करण्याचे कसब या दोन बहिणींनी आत्मसात केले. पिकावर किड, रोग पसरु नये म्हणून फवारणी करण्यासाठी निमअर्क, निमोल यांचा त्यांनी प्राधान्याने वापर केला.  जास्तीत जास्त सेंद्रीय पध्दतीचा अवलंब करुन नवनीवन तंत्रज्ञान शिकून शेतात नवीन उपक्रम राबविणे या भगिंनीचा हातखंडा बनला आहे. दशपर्णी, अर्क, जीवामृत स्वत: तयार करुन सेंद्रीय जिवाणू ,गांडूळ खत तयार करुन निसर्ग पुरक शेतीला आता त्यांनी प्राधान्य दिले आहे. 

पिकांची लागवड करताना प्रामुख्याने त्यांनी आता जे विकेल तेच पिकेल या धोरणाला जवळ केल्यामूळे शेती उत्पादनाला बाजारपेठेची जास्त अडचण त्यांच्या पुढे निर्माण झाली नाही. पारंपारिक पिकाला छेद देत त्यंनी वर्षातून दोन वेळेस टरबूजचे पिक घेतले. 65 दिवसांचे हे पिक असल्यामूळे बाजारात ज्या महिन्यामध्ये याला मागणी असते तो काळ निवडला. त्यांनी टरबूज पिक व मल्चिंग साठी शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे. टरबूजची बाजारपेठ लक्षात घेवून त्यांनी हा शेतमाल विक्री करण्यासाठी नांदेड, हैद्राबाद, मुंबई, दिल्ली हरियाणा, पंजाब येथील बाजारपेठा निवडल्या. 

पुजा पऊळ यांना शेती फायद्याची आहे की तोटयाची असे विचारले असता वर्षाला पर एकरी एक लाख रुपये उरतात. भाव चांगला मिळाला तर 15 लाख रुपयेही मिळतात असे तीने स्पष्ट केले. त्यामूळे शेती स्वत: लक्ष देवून, जीव ओतून केल्यास कधीही तोटा होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. शेती मन लावून व नियोजनबध्द  केल्यास शेती शंभर टक्के परवडतेच. यावर बाजाराचा अभ्यास करुनच  बाजारात काय विकते तेच पिकविले पाहिजे असे तीने सांगितले. शेतकऱ्यांनी  शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पशुपालन किंवा मधुमक्षीकापालन असे जोड पुरक व्यवसाय करायला पाहिजे असेही तीचे म्हणणे आहे. त्यामूळे शेती अधिक फायदेशिर ठरु शकते. यासाठी शासनाच्या योजनांचा फायदा घेतल्यास जास्त नफा मिळतो. या कुटूंबाने घरच्या दुधासाठी गाय व म्हशी विकत घेतलेल्या आहेत. या दोंघी बहिणीना शेतीच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी कृषी विभागाने गौरविले आहे. आजवर धनश्रीची मला शेती करताना खूप खंबीर साथ राहयची . तिचे नुकतेच लग्न झाल्यामूळे आता मी माझ्या शाळेतील बहिणीला सोबत घेवून शेती करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचे पुजाने सांगितले. आधुनिक शेतीसाठी या दोघींना पुरस्कार मिळाले आहेत.    

-         अलका पाटील, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000





 

बिलोली पिडिता प्रकरणात दोषींवर

ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु

-         केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- बिलोली येथील मुकबधिर दिव्यांग पिडितावर झालेला अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या पिडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोषींविरुद्ध ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु अशी नि:संदिग्ध ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. बिलोलीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी शासकिय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर उपस्थित होते.

00000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...