Saturday, July 22, 2023

 राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण दि. 24 व 25 जुलै, 2023 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 

 

श्रीमती चव्हाण ह्या जिल्ह्यातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत महिला कामगार यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेणार आहेत. तसेच काही उद्योगांच्या आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथे कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. 

00000

 दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कारासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकरीता राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 साठी नामांकन व अर्ज गृह कामकाज मंत्रालयाच्या केंद्रीकृत पोर्टल www.awards.gov.in वर ऑनलाईन पद्धतीने सोमवार 31 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात आले आहेत.   

 

अर्ज / नामांकन हे www.awards.gov.in  या संकेतस्थळावर भरण्यात यावे. राष्ट्रीय पुरस्कार 2023 साठी अर्ज / नामांकने सादर करण्याच्यादृष्टिने 15 जून ते 31 जुलै 2023 या कालावधीत संकेतस्थळ सुरू राहील. राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करीता अर्ज/नामांकन केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL www.award.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावेत. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जात सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याचा सविस्तर वर्णनासह भरावी. सक्षम सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

 

पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील www.disibilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमिकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्काराच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विचारात घेण्यात येतील. केंद्र शासनाच्या सामाजिक व न्यायअधिकारीता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या व्यक्तीसाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करीता नामांकन व अर्ज मागविण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 0000

 

 किनवट तालुक्यात गत दोन दिवसापासून 

अतिवृष्टीमुळे शेतीसह जनजीवन विस्कळीत 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  किनवट तालुक्यात 20 ते 22 जुलै रोजी सर्व 9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील एकुण 176 गावातील 21 हजार 415 शेतकऱ्यांचे 13 हजार 246 हेक्टर आर. वरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून 2 पशुधन दगावले आहेत. 

पिंपरी येथे डोंगराचे माळरान खचून जवळपास 65 घरांची पडझड झाली आहे. तसेच भंडरवाडी येथील 12 घरांचे व इतर गावातील 25 असे 90 घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे पेनगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा दुथडी भरून वाहत आहे.  सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाने हा धबधबा नागरीकांसाठी तसेच पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत बंद केला आहे. 

किनवट तालुक्यातील सिंगारवाडी, भंडारवाडी, सुंगागुडा बोधडी, बेल्लोरी कि., झेंडीगुडा, नागझरी, मलकापूर, खेर्डा या गावाचा किनवट शहरापासून संपर्क तुटला आहे. किनवट तालुक्यातील बेंदी गाव व चिखली खुर्द येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने किनवट-भोकर-नांदेड हा मार्ग बंद आहे. किनवट शहरातील मोमीनपुरा भागातील जवळपास 100 ते 110 अतिवृष्टीने बाधित नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर जवाहर उलूम उूर्द शाळेत करण्यात आले. येथे नगरपरिषद किनवटतर्फे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

ज्या पुलावरून पाणी वाहत आहे अशा सर्व ठिकाणी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्यावतीने बॅरिकेटस लावून पुल बंद करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतेही अधिकचे नुकसान होणार नाही याबाबत सर्व यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयीन उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

0000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...