Tuesday, March 16, 2021

 

नांदेड जिल्ह्यात आज 552 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू

जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 70 अहवालापैकी 552 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 275 तर अँटिजेन तपासणीद्वारे 277 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 27 हजार 923 एवढी झाली आहे. मंगळवार 16 मार्च 2021 रोजी नाईकनगर नांदेड येथील 46 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 618 एवढी झाली आहे. 

आजच्या 2 हजार 70 अहवालापैकी 1 हजार 472 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 27 हजार 923 एवढी झाली असून यातील 24 हजार 112 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 971 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 60 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 166, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1, मुखेड कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 5, खाजगी रुग्णालय 25 असे एकूण 205 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 86.35 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 208, देगलूर तालुक्यात 1, हिमायतनगर 1, किनवट 3, मुदखेड 2, नायगाव 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 11, हदगाव 12, कंधार 2, लोहा 19, मुखेड 12, जालना 2 असे एकूण 275 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 174, अर्धापूर तालुक्यात 11, बिलोली 4, हदगाव 4, कंधार 3, लोहा 15, नायगाव 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 12, भोकर 1, देगलूर 30, हिमायतनगर 10, किनवट 8, मुदखेड 1, औरंगाबाद 1, हिंगोली 1 असे एकूण 277 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 2 हजार 971 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 143, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 77, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 78, किनवट कोविड रुग्णालयात 54, मुखेड कोविड रुग्णालय 55, देगलूर कोविड रुग्णालय 14, हदगाव कोविड रुग्णालय 8, लोहा कोविड रुग्णालय 48, कंधार कोविड केअर सेंटर 2, महसूल कोविड केअर सेंटर 85, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 702, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 477, खाजगी रुग्णालय 258 आहेत. 

मंगळवार 16 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 25 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 54 हजार 209

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 11 हजार 546

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 27 हजार 923

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 112

एकुण मृत्यू संख्या-618

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 86.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-305

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 971

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-60.

0000

 

शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा  

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग यांनी सन 2020-21 आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय हरभरा खरेदी केंद्र अर्धापूर येथे नुकतीच भेट देऊन खरेदीबाबत विविध सूचना दिल्या. हरभराचा शासकीय हमीभाव 5 हजार 100 रुपये प्रती क्विंटल असून खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारे शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवसात अदा केली जातील. सध्या खुल्या बाजारात हरभरा या शेतमालास हमी भावापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करुन हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.

00000

 

 अर्धापूर तालुक्यातील खेळाडूंनी

बॅडमिंटन इनडोअर हॉलचा वापर करावा 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- तालुका क्रीडा संकुल समिती अर्धापूरच्यावतीने बांधण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन इनडोअर हॉल दोनशे मीटर धावनपथ, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल इत्यादी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा कार्यरत आहेत. अर्धापूर तालुक्यातील खेळाडू मुले-मुली, विद्यार्थी, शिक्षक, शारिरीक शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरीक, महिलांनी या सुविधेचा वापर जास्तीत जास्त करुन आपले शारिरीक आरोग्य फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत सुदृढ करावे, असे आवाहन तहसिलदार तथा कार्याध्यक्ष सुचीत नरहरे व तालुका क्रीडा अधिकारी तथा सचिव किशोर पाठक यांनी केले आहे. 

या सुविधेच्या वापराबाबत तहसिलदार तथा कार्याध्यक्ष  यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच बैठकी संपन्न झाली. या बैठकीत सुविधा वापराबाबत नियम, अटी व शर्तीस मान्यता देण्यात आली असून यामध्ये पुढीलप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत. बॅडमिंटन नोंदणी फिस प्रती खेळाडू एकाचवेळी दोनशे रुपये, बॅडमिंटन मासिक फिस प्रती खेळाडू 12 वी पर्यंत शिकत असलेला विद्यार्थ्यांना दोनशे रुपये, बॅडमिंटन मासिक शुल्क प्रती इतर सभासद चारशे रुपये असे निश्चित करण्यात आले आहेत.

0000

 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा

केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) रविवार 21 मार्च 2021 रोजी  सकाळी 10.30 ते दुपारी 12  व दुपारी 1.30 ते दुपारी 3 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 11 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू राहतील.  

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) साठी 11 परीक्षा केंद्रात ही परीक्षा होत आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. त्यानुसार या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

000000

 

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणातून

रब्बी हंगामासाठी उन्हाळी हंगामातील पाणीपाळी सुरू

सुरक्षेच्यादृष्टिने जनतेने सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे

नांदेड, (जिमाका) दि. 16 :-उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरणाच्या) लाभक्षेत्रांतर्गत नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लाभधारक व जनतेसाठी सन 2020-21 मधील रब्बी हंगामातील सिंचनाकरीता इसापूर उजवा कालवा व इसापूर डावा कालव्यातून 3 पाणीपाळ्या देण्यात आलेल्या आहेत. प्रकल्पावरील कालव्यातुन लाभक्षेत्रांना पाणी सोडले जात आहे. कालवे पुर्ण भरून वाहत असल्यामुळे कोणीही व्यक्ती, मुले, स्त्रिया यांनी कालव्यावरून फिरू नये, कालव्यामध्ये पोहण्यास जाऊ नये, कालव्यामध्ये धुणी, भांडी , वाहने, जनावरे, धुण्यासाठी जाऊ नये, कालव्याच्या सेवापथावरून वाहनांची, बैलगाड्यांची, जनावरांची ये-जा करू नये, यामुळे अपघात होऊन जीवीत व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही व अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या सुचनांचे सर्व जनतेने  काटेकोरपणे पालन  करावे असे, आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे. 

रब्बी हंगाम राबविण्यात आलेला असून सध्या उन्हाळी हंगाम सुरू झालेला आहे. उन्हाळी हंगामातील पाणी चालु आहे. दिलेल्या सूचनांकडे कोणीही दुर्लक्ष करू नये अन्यथा दुर्देवाने काही जीवीत व वित्त हानी झाल्यास हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही. अशावेळी कालवा बंद करण्यात येणार नाही. या प्रकल्पावर जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली भिजते. त्यामुळे कालवा बंद केल्यास लाखो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहून सिंचन विस्कळीत होऊन हजारो शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यांचे हाताशी आलेल्या पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान होऊ शकते. उन्हाळा चालु झाला असल्यामुळे पिण्याच्या पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे शेतकरी व जनतेमध्ये असंतोष पसरून शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्व जनतेस दिलेल्या सुचनांचे पालन करावे असेही आवाहन जलसंपदा विभागाने कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...