Tuesday, March 16, 2021

 

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणातून

रब्बी हंगामासाठी उन्हाळी हंगामातील पाणीपाळी सुरू

सुरक्षेच्यादृष्टिने जनतेने सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे

नांदेड, (जिमाका) दि. 16 :-उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरणाच्या) लाभक्षेत्रांतर्गत नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लाभधारक व जनतेसाठी सन 2020-21 मधील रब्बी हंगामातील सिंचनाकरीता इसापूर उजवा कालवा व इसापूर डावा कालव्यातून 3 पाणीपाळ्या देण्यात आलेल्या आहेत. प्रकल्पावरील कालव्यातुन लाभक्षेत्रांना पाणी सोडले जात आहे. कालवे पुर्ण भरून वाहत असल्यामुळे कोणीही व्यक्ती, मुले, स्त्रिया यांनी कालव्यावरून फिरू नये, कालव्यामध्ये पोहण्यास जाऊ नये, कालव्यामध्ये धुणी, भांडी , वाहने, जनावरे, धुण्यासाठी जाऊ नये, कालव्याच्या सेवापथावरून वाहनांची, बैलगाड्यांची, जनावरांची ये-जा करू नये, यामुळे अपघात होऊन जीवीत व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही व अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या सुचनांचे सर्व जनतेने  काटेकोरपणे पालन  करावे असे, आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे. 

रब्बी हंगाम राबविण्यात आलेला असून सध्या उन्हाळी हंगाम सुरू झालेला आहे. उन्हाळी हंगामातील पाणी चालु आहे. दिलेल्या सूचनांकडे कोणीही दुर्लक्ष करू नये अन्यथा दुर्देवाने काही जीवीत व वित्त हानी झाल्यास हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही. अशावेळी कालवा बंद करण्यात येणार नाही. या प्रकल्पावर जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली भिजते. त्यामुळे कालवा बंद केल्यास लाखो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहून सिंचन विस्कळीत होऊन हजारो शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यांचे हाताशी आलेल्या पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान होऊ शकते. उन्हाळा चालु झाला असल्यामुळे पिण्याच्या पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे शेतकरी व जनतेमध्ये असंतोष पसरून शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्व जनतेस दिलेल्या सुचनांचे पालन करावे असेही आवाहन जलसंपदा विभागाने कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...