Saturday, August 14, 2021
जिल्ह्यातील 79 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण
नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 79 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. रविवार 15 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 13 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 11 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व ग्रामीण रुग्णालय उमरी या 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 42 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 8 प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत.
वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
जिल्ह्यात 13 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 8 लाख 89 हजार 486 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 14 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 50 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 94 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
00000
नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 5 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 786 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 662 एवढी झाली असून यातील 87 हजार 946 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 57 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1 व ॲटिजेनद्वारे मुदखेड 3 असे एकूण 6 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात किनवट कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 57 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 44, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 87 हजार 177
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 84 हजार 372
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 662
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 946
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-10
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-57
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3
00000
कंधार तहसील कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सव संपन्न
नांदेड, (जिमाका) दि. 14 :- तहसील कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन नुकतेच 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. हा महोत्सव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्रीमती एम आर सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
रानभाज्यांचे आरोग्यासाठीचे महत्व, त्याची नैसर्गिक उपलब्धता, किटकनाशकांच्या अन्नापासून मुक्त व विविध औषधी गुणधर्म याबाबतीत तसेच या रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला. कार्यक्रमासाठी तालुक्यातून विविध बचतगटांचे शेतकरी बांधवाचा भाजीपाला, सुयोग इंडस्ट्री संगुचीवाडी यांचे विविध वजनाचे लाकडी घाण्यावरील तेल, मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर अशी विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती.
याप्रसंगी पेठवडज शेतकरी व कर्मवीर भाऊराव पाटील शेतकरी गटाचे पांडुरंग व्यंकटराव कंधारे, संगुचिवाडी येथील बळीराम गंगाराम मुंजे, पानशेवडी येथील अनिल बाबुराव मोरे, ब्रह्माजी संभाजी मोरे, यशोदीप चिली पावडर इंडस्ट्रीचे विठ्ठल वारकड, सुयोग फूड इंडस्ट्री संगुचिवाडी येथील चंद्रकांत, पेठवडज येथील बालाजी शिंदे, ज्ञानेश्वर डावखरे आदी शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून "विकेल ते पिकेल" "शेतकरी ते ग्राहक थेट विक्री" या रानभाजी महोत्सवाचे आयोजन मागील वर्षापासून सुरू असून चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला आहे. जिल्हा स्तरावरील यशस्वी योजनेंतर्गत या प्रकारचे महोत्सव आयोजन करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
विक्रीसाठी रानभाज्या, करटुले, वाघाटे, आघाडा, अळू कुंजर, कुरडू, डेवडांगर, नाय, केना, सुरकंद, मोठी घोळ, छोटी घोळ, अंबाडी, तरोटा, कडीपत्ता, चमकुरा, चुका, शेपू या रानभाज्या, उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. या संपूर्ण उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची मागणी होती. रानभाज्या महोत्सवातून शेतकऱ्यांना विक्रीसाठी नवे दालन उपलब्ध झाले असून "विकेल ते पिकेल" या शासनाच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी राबविण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी विकास नारळीकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार, मंडळ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
000000
ब्रेक द चेन- सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमीत
नांदेड, (जिमाका) दि. 14 :- साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतूदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्वये प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहेत त्याकरण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून तसेच फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिलेल्या आदेशातील निर्देशानुसार 15 ऑगस्टपासून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत पुढीलप्रमाणे सुधारित मार्गदर्शक सूचना आदेश निर्गमीत केले आहेत.
राज्यात कोविड-19 साथरोगामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमजबजावणी सुरू असून राज्यात कोविड-19 ची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. परंतू अद्यापही कोविड रूग्ण आढळून येत असल्याने राज्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे. साथरोग अधिनियम, 1897 मधील खंड-2 नुसार प्राप्त अधिकार व आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समिती यांनी आदेश 11 ऑगस्ट 2021 रोजी क्र. 5 व 6 मधील नमूद आदेश अधिक्रमित करून संपूर्ण राज्यासाठी निर्देश पारित केले आहेत. त्यानुसार पुढीलप्रमाणे आदेश जिल्ह्यात लागू राहतील.
उपहारगृहे : खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह/बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपहारगृह/बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचा-यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह/बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
वातानुकुलित उपहारगृह/बार असल्यास, वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील. प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील. उपहारगृह/बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी. उपहारगृह/बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहील. उपहारगृहे/बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह/बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 9 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
दुकाने : जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचा-यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.
शॉपिंग मॉल्स : जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि शॉपिंग मॉलमध्ये काम करणाच्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहिल.
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून-स्पा : वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नशिअम, योगसेंटर, सलून-स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहिल.
इनडोअर स्पोर्टस : इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पैरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.
कार्यालय /औद्यागिक/ सेवाविषयक आस्थापना : सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनाचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन याचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचा-यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचा-यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचा-यांच्या गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.
विवाह सोहळे : खुल्या प्रांगणातील /लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण/लॉन मंगल कार्यालय हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादित असेल. मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिका-याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल/ कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय / हॉटेल/लॉन व्यवस्थापन भोजन व्यवस्थापन/बँडपथक/ भटजी/फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.
सिनेमागृहे व मल्टिप्लेकस : जिल्ह्यात सिनेमागृह /नाटयगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) बंद राहतील. धार्मिक स्थळे : जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील. आंतरराज्य प्रवास : ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहील.
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, इ. वरील निर्बंध कायम राहतील.
मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता मर्यादीत असल्याने, जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन 700 मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करून त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यास राज्य शासनाने सूचीत केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहील.
सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक / व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचा-यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खात्री करावी व या कर्मचा-यांची यादी (लसीकरण माहिती, प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षमप्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी.
दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्सचे, कार्यालये, औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जंतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड, कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल.
या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी (Incident Commander) उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहिल. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 13 ऑगस्ट 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.
000000
समस्याग्रस्त व पिडीत महिलासांठी 17 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन
जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील अर्ज
नांदेड, (जिमाका) दि. 14 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी मंगळवार 17 ऑगस्ट 2021 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 ऑगस्ट 2021 रोजी सुट्टी येत असल्याने मंगळवार 17 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा नांदेड दौरा
नांदेड (जिमाका) दि. 14 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मंगळवार 17 ऑगस्ट रोजी हिंगोली येथून नांदेड येथे आगमन व सकाळी 10 वा. नांदेड येथे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीतर्फे "व्यर्थ न हो बलिदान" आयोजित अभियानास उपस्थिती. दुपारी 2 वा. नांदेड येथे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली संघटनात्मक आढावा बैठक. सायं 6.50 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...