Thursday, January 25, 2024

वृत्त क्र. 82

 नांदेडचा मानबिंदू असलेला पक्षी कोणता ?

▪️निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्वेमध्ये सहभाग घ्या 
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, आसना, मन्याड, लेंडी सारख्या नद्यांच्या काठावर विविध पक्षांचा अधिवास आपण पाहतो. जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि पानथळ भागात प्रामुख्याने तांबट, वेडा राघू, भारतीय नीलपंख, चित्रबलाक, काचाक्ष, पिंगलाक्ष, सुगरन, विनकर, जांभळा सूर्यपक्षी, लाल मनोली पोपट, ठिपक्यांची मनोली, कवडा खंड्या हे पक्षी आढळतात. या पक्षांमधून नांदेडचा मानबिंदू असलेल्या पक्षाची सर्वांनुमते निवड व्हावी व जिल्ह्याला नवीन ओळख मिळावी यादृष्टिने पक्षीमित्रांनी असा निवडीबाबत आग्रह धरला आहे. ही निवड सर्वांनुमते व्हावी यादृष्टिने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nanded.gov.in/bird-of-nanded-
या संकेतस्थळावर प्रातिनिधिक पक्षी निवडीसाठी ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व नांदेड जिल्हाप्रेमींनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 81

 जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.  

 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

 

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

00000 

वृत्त क्र. 80

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

§  ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी,15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

0000

वृत्त क्र. 79

 पशुधनाची ऑनलाइन टॅगिंग व नोंदणी करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासन निर्णयानुसार दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रती लिटर रूपये अनुदान देय आहे.  पात्र पशुधनास कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावशक आहे. त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्था मार्फत पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. सर्व पशुपालक / शेतकरी यांनी आपल्या सर्व  पशुधनास टॅगिंग  ऑनलाईन नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावीअसे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे  उपायुक्त राजकुमार पडिले यांनी केले आहे.

 

पशुधनास टॅगिंग व नोंदणी शेतकरी / पशुपालक यांच्याकडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत  असून आज अखेर पुढीलप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या. पशुधन नोंदणी 5.73 लक्ष, पशुपालक नोंदणी 1.96 लक्ष, पशुपालक हस्तांतरण नोंदणी 3.20 लक्ष, पशुधनाच्या नोंदीत बदल 1.84 लक्ष, कानातील टॅग बदल नोंदी (टॅग बदल) -5 हजार 795, पशुपालकांच्या नावातील बदल 0.50 लक्ष. तसेच अतिरिक्त 56 लक्ष टॅग नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील सर्व पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्याचे कामकाज अभियान स्वरुपात राबविण्याबाबत शासन स्तरावरुन सूचित केले आहे.

 

0000

वृत्त क्र. 78

 पात्र नागरिकांनी उपलब्ध नोंदीच्या आधारे

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 25:-   जिल्‍हयातील विविध विभागातील, कार्यालयातील 1967 पूर्वीच्‍या जुन्‍या अभिलेखांची तपासणी करुन त्‍यात कुणबी, मराठा-कुणबीकुणबी-मराठा अशा नोंदी शोधण्‍याची कार्यवाही चालू आहे. तरी जिल्‍हयातील जास्‍तीत जास्‍त पात्र नागरीकांनी उपलब्ध नोंदी आधारे कुणबी,मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाचे वतीने करण्‍यात आले आहे.

 

तपासणीअंती आढळून आलेल्‍या नोंदींचा अहवाल समितीस वेळीवेळी सादर केला आहे. आढळून आलेल्‍या सर्व नोंदी जिल्‍हा संकेतस्‍थळावर अपलोड करुन सर्वांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत. महसूल विभागभूमी अभिलेख, शिक्षण विभागसह जिल्‍हा निबंधक इत्‍यादींसह विविध शासकीय कार्यालय/ विभागातील जुन्‍या अभिलेखांची तपासणी करुन कुणबी नोंदींचा शोध घेण्‍यात आला आहे. आजपर्यत 25 लाख 90 हजार 168 इतक्‍या नोंदींची तपासणी करण्‍यात आली असून त्‍यात 1 हजार 748 एवढया कुणबी नोंदी आढळून आल्‍या आहेत. त्‍यापैकी 1 हजार 222 नोंदी मोडी लिपीतील असल्‍याने त्‍यांचे लिप्‍यंतर, तर 25 नोंदी उर्दू भाषेतील असल्‍याने त्‍यांचे भाषांतर करून सर्व 1 हजार 748 नोंदींचे स्‍कॅनिंग करुन जिल्‍हा संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आल्या आहेत.

 

या कुणबी जात नोंदी सर्वसामान्‍य नागरीकांना सहज उपलब्‍ध होण्‍यासाठी आढळून आलेल्‍या नोंदींची यादी संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच तलाठी कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. जिल्ह्यातील जास्‍तीत जास्‍त पात्र नागरीकांना जात प्रमाणपत्र वितरीत करण्‍यासाठी 17 व 18 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवून प्रमाणपत्र मिळवणे बाबत जागृती करण्‍यात आली आहे. नोंदी तपासणीची आणि आढळून आलेल्‍या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदीच्‍या आधारे पात्र व्‍यक्‍तींना जात प्रमाणपत्र देण्‍याची कार्यवाही निरंतर चालू आहे. आजपर्यंत 579 पात्र अर्जदारांना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्‍यात आले आहे.

 

नागरीकांनी प्रथमत: त्‍यांचेशी संबंधीत नोंदी शोधण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या https://nanded.gov.in/en/talukawise-kunbi-records/ या संकेतस्‍थळावर आपले पुर्वजांचे नावांचा शोध घ्‍यावा. संबंधीत नोंद सापडल्‍यानंतर संबंधीत कार्यालयातून नोंदीची प्रमाणित प्रत मिळवावी. उदा. मोडी भाषेतील नमुना ३३ व 34 साठी संबंधीत तालुक्‍याच्‍या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयप्रवेश निर्गम उतारा संबंधीत शाळेतून तर खासरा पत्रक,क-पत्रकपाहणी पत्रककुळ नोंदवही इत्‍यादी अभिलेखांतील आवश्‍यक नोंदीच्‍या प्रमाणित प्रती संबंधीत तहसिल कार्यालयातून विहित शुल्‍क भरणा करुन प्राप्‍त करुन घ्‍याव्‍यात. प्रमाणपत्रासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता झाल्‍यानंतर नजिकच्‍या सेतू-सुविधा / सामायिक सेवा केंद्रावर आपला अर्ज सादर करावा. आवश्‍यकता असल्‍यास याकामी संबंधीत गावचे तलाठीमंडळअधिकारीग्रामसेवक यांचे कडून मार्गदर्शन घ्‍यावे. तसेच तहसिल कार्यालयातील कुणबी मदत कक्षात कार्यान्वित करण्‍यात आला आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्र. 77

 गुरांचा चारा, गवत, वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी 

नांदेड, (जिमाका) दि. 25:-  नांदेड जिल्ह्यात सन 2023 च्या पावसाळयात सरासरीपेक्षा अल्प पर्जन्यमान  झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई उद्भवण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश 2001 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातून गुरांचा चारा, गवत, वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

0000

 वृत्त क्र. 76

मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा योजनेला

30 जानेवारी पर्यंत मुदतवाढ 


नांदेड, (जिमाका) दि. 25:-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतची योजना शासनाने सुरु केली असून शासन निर्णयान्वये योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मंगळवार 30 जानेवारी 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. 

या योजनेंतर्गत इच्छूक लाभार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात व शासन निर्णयातील अटीशर्तींची पूर्तता करुन घेऊन पात्र बचतगटांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास 16 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख दिली गेली होती. परंतु विविध संघटनांनी दिलेली तारीख पुन्हा वाढवून मिळण्याबाबत विनंती केल्याने मंगळवार 30 जानेवारी 2024  पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहेअसे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्र.  75 

नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करा

- क्षेत्रीय व्यवस्थापक निती सरकार

 

नांदेड (जिमाका) दि. 25:- लोकशाहीत मतदान व मतदार या दोन्ही गोष्टींना खूप महत्व आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पालन करण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत नवमतदारांनी इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावेअसे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक निती सरकार यांनी केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊतअपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकरराज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणीनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरमतदार नोंदणी अधिकारी विकास मानेतहसिलदार संजय वारकडभटक्या विमुक्त जाती जमातीचे निवडणूक प्रतिनिधी देविदास हादवे आदींची उपस्थिती होती.

 

मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. यामुळे नवमतदाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना भारत निवडणूक आयोगाकडून उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही आपल्या सर्वासाठी गौरवास्पद बाब असल्याचे निती सरकार यांनी सांगितले.

 

पहिले मत अविस्मरणीय करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

जिल्ह्यातील तृतीयपंथीभटके विमुक्तगारुडीकुडमुडे जोशी व इतर समाजातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष प्रत्यत्न करण्यात आले. त्यांना आधाररेशन कार्ड व इतर शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासमवेत निवडणूक ओळखपत्र देवून मतदानाचा अधिकार बहाल केला. याबाबत नुकताच भारत निवडणूक आयोगाकडून नांदेड जिल्ह्याला मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील नवमतदाराकडून अपेक्षा वाढल्या असून नवमतदारांनी आपले पहिले मत जागरुक राहून अविस्मरणीय बनवावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

मतदार व मतदान प्रक्रियेत महिलांचे योगदान मोठे असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना भारत निवडणूक आयोगाकडून पुरस्कार मिळाल्याबाबत भटक्या विमुक्त जाती जमातीचे नागरिक व पथनाट्याचे विद्यार्थी यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

मतदार जागृती दिवस हा लोकशाहीतील मोठा दिवस असून यात मतदार जागृतीचे कार्य खूप मोठे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदार जागरुक असणे आवश्यक आहे. नवमतदारानी आपले नाव मतदान यादीत नोंदवून मतदान प्रक्रियेत आपला व इतरांच्या सहभागासाठी पुढाकार घ्यावाअसे आवाहन राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केले.

 

भटक्या विमुक्तांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांनी जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांना आधाररेशनमतदान कार्ड देण्यासोबत हजार मतदारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील 500 ते 700 भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळाले असून इतरही सोयी-सुविधा प्राप्त झाल्याची माहिती भटक्या विमुक्त जाती जमातीचे निवडणूक प्रतिनिधी देविदास हदवे यांनी यावेळी दिली.

 

भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली होणाऱ्या निवडणूकाबाबत माहिती अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी दिली. तसेच लोकशाहीत एका मताचे महत्व काय असते यांचे महत्व विशद करुन नवमतदारांनी नैतिकतेच्या आधारावर आपले मतदान करावेअसेही त्यांनी युवा मतदारांना सांगितले.

 

यावेळी भोकर येथील कुशल देशमुख यांच्या पथनाटय संचाने मतदानाचे महत्वमतदानाचे अधिकारप्रक्रिया याबाबत पथनाट्याचे सादरीकरण केले. तसेच यावेळी जिल्हा निवडणूक दूत म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. सृष्टी जोगदंडभाग्यश्री जाधवअभिनेता कपिल गुडसुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते नेमणूक पत्र देण्यात आले. या कार्यक्रमात 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले महाविद्यालयनिवडणूक साक्षरता मंडळसंपर्क अधिकारीविद्यार्थीबिएलओनवमतदारतहसिल कार्यालयातील ऑपरेटर इत्यादीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. शेवटी आभार तहसिलदार संजय वारकड यांनी मानले.

0000







  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...