Tuesday, June 6, 2017

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड, दि. 6 :-   राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे शुक्रवार 9 जून 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 9 जून 2017 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. नांदेड जिल्हा प्रमुख भुजंग पाटील (नांदेड द., नायगाव, देगलूर या तीन विधानसभा) चर्चेसाठी राखीव. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 12 वा. नांदेड जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख (नांदेड उ., लोहा, मुखेड या तीन विधानसभा) चर्चेसाठी राखीव. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 वा. जिल्हा प्रमुख बाबुराव कदम (किनवट, हदगाव, भोकर या तीन विधानसभा) चर्चेसाठी राखीव. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायंकाळी 6 वा. शासकीय वाहनाने नांदेड येथून हिंगोली जिल्ह्याकडे प्रयाण करतील.

00000
मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
नांदेड, दि. 6 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यावतीने 31 मे ते 7 जून जागतिक तंबाखू नकार दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने आज श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड  येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून 80 रुग्णांची  मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी 7 रुग्ण मौखिक कर्करोग संशयित आढळून आली. एका रुग्णास कर्करोग असल्याचे निदान झाले. शिबिरास जिल्हा कार्यक्रम अधिकारी  डॉ. दीपक हजारी, डॉ अन्सारी, डॉ. रोशनी चव्हाण व डॉ घोडजकर हे उपस्थित होते.

00000
इतर मागासवर्गीयांसाठी मोफत प्रशिक्षण
            नांदेड, दि. 6 : - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून इतर मागास प्रवर्गातील इच्छूक व्यक्तीला कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्यादृष्टिने सहाय्यक मशिन चालक या विषयाचे तीन महिन्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी अधीक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्यासमोर  नांदेड  येथे मंगळवार 31 जुलै 2017 पर्यंत संपर्क साधावा, असे  आवाहन  महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे  यांनी  केले आहे.

00000
इतर मागासवर्गीय महामंडळाच्या
बीज भांडवल योजनेबाबत आवाहन
            नांदेड, दि. 6 : - राज्य इतर  मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इतर  मागासवर्गीय  समाजातील  नागरिकांनी  महामंडळाच्या या कर्ज योजनेची  माहिती  घ्यावी  व  कर्ज  योजनेचा  जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधीक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्या  समोर  नांदेड  येथे संपर्क साधावा , असे  आवाहन  महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे  यांनी  केले आहे.
इतर मागासवर्गीय समाजाच्या पात्र उमेदवारांसाठी महामंडळाच्या  20 टक्के बीज भांडवल  कर्ज  योजनेसाठी  यावर्षाचे  उद्दीष्ट  प्रस्ताव संख्या 50 असून  त्याकरीता  लागणारे भागभांडवल 20 लाख रुपये आहे. या योजनेमध्ये प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत आहे. त्यामध्ये  2 लाख 50 हजारापर्यंतचे कर्ज प्रस्ताव 40 असून त्यासाठी निधी 12 लाख व त्यापेक्षा जास्त रुपये 5 लाखापर्यंत कर्ज प्रस्ताव 10 व त्याकरीता निधी 8 लाख याप्रमाणे आहे. या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची (बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर) 20 टक्के रक्कम महामंडळाची त्यावर 6 टक्के व्याज दर राहील. पाच टक्के स्वत:चा सहभाग राहील. परतफेडीचा कालावधी हा 60 महिन्याचा आहे.
            थेट  कर्ज  योजनेअंतर्गत  छोट्या  उद्योगासाठी महामंडळामार्फत 25 हजार रुपयापर्यंत थेट कर्ज दिल्या जाते. यामध्ये 2 टक्के व्याज आकारल्या जाते व कर्ज परतफेड ही 36 महिन्यात केली जाते. या योजनेकरीता अर्जदार लाभार्थ्याची अर्हता पुढील प्रमाणे आहे. लाभार्थी हा इतर मागासवर्गीय असावा. तो महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे तो कोणत्याही बँकेचा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा तसेच कुटंबातील सर्व सदस्याचे एकत्रीत वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. या योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येईल.

0000000
अंबाजोगाई येथे शासकीय अपंग केंद्रात प्रवेश
नांदेड, दि. 6 :-  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील शासकीय बहुउद्देशीय संमिश्र अपंग केंद्र या संस्थेत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी अपंग अंध, अस्थिव्यंग व मुकबधीर प्रवर्गातील मुलांना प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख शुक्रवार 23 जून 2017 पर्यंत राहील, असे संस्थेचे अधीक्षक यांनी कळवले आहे.
या प्रवेशासाठी मुलाचे वय 6 ते 14 वर्ष यागटातील असावे. मुलगा अंध, अस्थिव्यंग व मूकबधीर यापैकी कोणत्याही  एकाच प्रकारे अपंग असावा. तो संसर्गजन्य रोगाने पिडीत किंवा मंदबुद्धी असू नये. प्रवेशित अपंग विद्यार्थ्यांना  राहाणे, जेवण, कपडे, शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय उपचार इत्यादी विनामूल्य सुविधा असून तज्ज्ञ अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत शैक्षणिक, वैद्यकीय उपचार व शारीरिक पुनर्वसन इत्यादी विनामुल्य सेवा शासनामार्फत केल्या जातात. विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून शनिवार 17 जून 2017 पर्यंत विनामुल्य मिळतील. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख शुक्रवार 23 जून 2017 पर्यंत राहील असे आहे. गरजुनी प्रत्यक्ष किंवा पत्राद्वारे शासकीय बहुउद्देशीय संमिश्र अपंग केंद्र, हौसींग सोसायटी यादव हॉस्पीटलच्या पाठीमागे अंबाजोगाई जि. बीड येथे संपर्क साधावा.

0000000
ज्ज्वल भविष्यासाठी इतिहास विषय
समजून घेणे आवश्यक - प्रा. निवृत्ती पाटील 
नांदेड, दि. 6 :- इतिहासापासून धडा शिकून झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत तसेच चांगल्या गोष्टीचे अनुकरण  करून वर्तमान सावरून भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी इतिहास विषय समजून घेऊन याविषयाचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील प्रा. निवृत्ती पाटील यांनी केले.
ज्ज्वल नांदेड या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित दरमहा 5 तारखेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात "आधुनिक भारताचा इतिहास" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे तर शैलेश झरकर, साईनाथ बोराळकर, डॉ. बालाजी चिरडे, प्रा. श्रीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून आधुनिक भारताचा इतिहास ,त्यातील महत्वाच्या घटना, त्यावेळी प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती व त्यांचे कार्य याविषयी सखोल माहिती दिली. स्पर्धा परीक्षा देताना याविषयाची कशी तयारी करावी यासंबंधी काही क्लुप्त्यासुद्धा सांगितल्या. तसेच लगेच होऊ घातलेल्या पोलीस उपनिरीक्षक व विक्रीकर निरीक्षक या संयुक्त परीक्षेची तयारी कशी करावी याबाबतसुद्धा मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात सुनील हुसे यांनी उज्ज्वल नांदेड या मोहिमेअंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नजीकच्या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या मार्गदर्शन शिबीर व इतर बाबीविषयी माहिती दिली. यावेळी व्याखाते प्रा. निवृत्ती पाटील यांचे ग्रामगीता देऊन श्री. हुसे यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे सत्रसंचालन मुक्तीराम शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी बाळू पावडे, अजय वट्टमवार, कोंडीबा गादेवाड, रघुवीर श्रीरामवार, लक्ष्मण शंनेवाड, विठ्ठल यनगुलवाड, अभिजित पवार यांनी संयोजन केले.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...