Sunday, August 29, 2021

 कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी रोहयो व फलोत्पादनाच्या विविध योजना 

शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात -         रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- ग्रामीण भागात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचा विकासही तेवढाच अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना दळणवळणाच्या किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मातोश्री पाणंद रस्ते विकासावर शासनाने भर दिला असून रोहयो व फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक सुलभ निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृह येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, रोहयो उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 

शेततळयाच्या योजनेमध्ये पुर्वी असलेल्या त्रुटी आता दुर केल्या आहेत. शेततळ्याच्या अस्तरीकरणासह (पॉलिथीन) 5 लाख 34 हजार रुपयांचे भरीव तरतूद आपण केली आहे. सागवानच्या धर्तीवर ज्या शेतकऱ्यांना वृक्षलागवड करुन अधिकचे उत्पन्न मिळवायचे आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आपण मोहगनी लागवडीवर भर दिला आहे. दहा वर्षात 30 ते 35 लाख रुपये उत्पन्न या वृक्षलागवडीतून शेतकऱ्यांना होत आहे. याचबरोबर रेशीम लागवडीतूनही शेतकरी आता अधिकचे उत्पन्न घेत आहेत. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना आपण नव्याने सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना उत्कृष साधण्याचा नवा मार्ग मिळाला आहे. मोहगनी, रेशीम लागवड, शेततळे या योजना नांदेड जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचनाही रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिल्या. 

प्रत्येक विभागांतर्गत लागणाऱ्या मनुष्यबळाचा आढावा घेऊन आवश्यक ते सर्व मनुष्यबळ व त्यासाठी लागणाऱ्या सोई-सुविधा आपण पोहचविल्या आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी गटविकास अधिकारी यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता प्रामाणिकपणे रोहयोच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. काम करीत असतांना काही चुका झाल्या तर शासन त्या समजून घेईल तथापि जाणिवपूर्वक जर कोणी चुका केल्या तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला. 

विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर यांनी पाणंद रस्त्यासाठी पूर्वी असलेला निधी अपुरा होता. यात वाढ केल्यामुळे पाणंद रस्त्याच्या गुणवत्तेसह अधिकाधिक व्यक्तींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत झाल्याचे सांगून त्यांनी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचे अभिनंदन केले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी नांदेड जिल्ह्यातील मगांराग्रारोहयो व फलोत्पादन विभागांतर्गत सुरु असलेल्या विविध विकास कामांचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी बैठकीत जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण कामांची माहिती दिली.

00000



 

आरोग्याच्या भक्कम सुविधेमुळे दुसऱ्या लाटेतून ग्रामीण भागाला सावरता आले

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

खुजडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोरोनाच्या कालावधीत ग्रामीण भागातील जनतेला अनेक आव्हानाला तोंड द्यावे लागले. आरोग्याच्या सेवा-सुविधा त्यांच्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्नांची शर्थ केली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत आपण वेळीच आरोग्याच्या सर्व सेवा-सुविधा प्रभावीपणे पोहोचविल्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून ग्रामीण भागाला सावरु शकल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

मुदखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खुजडा येथील आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. चिलपिंपरी ते महाटी रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण व पोचमार्गाचे भूमिपूजन, रोहिपिंपळगाव-पिंपळकौठा-पांगरगाव रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा  परिषद सदस्या अरुणा कल्याणे, गोविंदराव नागेलीकर, संजय पाटील कुऱ्हे, मारोतराव कवळे गुरुजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

खुजडा व पंचक्रोशीतील अनेक छोट्या गावांसाठी याठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची अत्यावश्यकता होती. लोकांचीही अनेक दिवसांपासून मागणी होती. ग्रामीण भागातील आरोग्याची यंत्रणा अधिक भक्कम करण्यासाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने पूर्ण करुन लोकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देतांना आनंद होत असल्याच्या भावनाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. राजकारणापेक्षा विकासात्मक कामांवर मी आजवर भर देत आलो आहे. अधिकाधिक विकासाच्या योजना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण भागातील रस्त्यांकडे मागील काही वर्षात मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष होते. विकासाच्या कामात निर्माण झालेली ही पोकळी आता प्राधान्यांने भरुन काढली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

निळ्यापासून सांगवी, गाडेगाव, आंदुरली पर्यंतचा रस्ता आता चांगला होत आहे. नांदेड ते बासर पर्यंतच्या मार्गाचे काम आपण हाती घेतली आहे. हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यावर आपण लक्ष केंद्रित केले आहे. नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या उद्देशाने आपण नांदेड ते जालना हा 196 किमीचा नवा महामार्ग तयार करत आहोत. नांदेड येथून मुंबईला आता अत्यंत कमी कालावधीत पोहचता येईल. एका बाजुला रस्त्यांचा विकास तर त्याच्याच जोडीला ग्रामीण भागातील आरोग्याच्या सेवा-सुविधेपासून गाव तेथे स्मशानभूमी पर्यंत अत्यावश्यक योजनांवर भर दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. दलितवस्ती सुधार योजना, पंधरावा वित्त आयोगातून विविध योजना, पुलाचे पोच रस्ते यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

0000




 नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 569 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 739 एवढी झाली असून यातील 88 हजार 50 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 28 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, लोहा 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे देगलूर 1, उमरी 1 असे एकुण 6 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 28 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 8 हजार 882

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 5 हजार 897

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 739

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 50

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-28

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. सोमवार 30 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालयात 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 28 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 10 लाख 5 हजार 677 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 29 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 45 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 65 हजार 640 डोस याप्रमाणे एकुण 11 लाख 10 हजार 670 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...