Thursday, July 29, 2021

 

तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत सांस्कृतिक भवनाला प्राधान्य

- अध्यक्ष भिकू रामजी इदाते 

विमुक्त जाती व भटक्या जमाती योजनांचा घेतला आढावा  

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती वर्गातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात असलेला दुर्गम भाग लक्षात घेता तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत समाज मंदिर भवनाला विशेष प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना भारत सरकारच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास आयोगाचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी दिल्या.

 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सामाजिक न्यायाच्या दृष्टिने केंद्र सरकारच्या योजना राज्यस्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नात आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजुंना घेता यावा यासाठी शासनस्तरावर आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करुन देणे हे संबंधित विभागाचे काम आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या वर्गातील लोकांच्या जात पडताळणी समितीकडे असलेल्या प्रकरणांचा नियमाप्रमाणे तात्काळ निपटारा करुन त्यांना न्याय देण्याच्या सूचना अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी केल्या.

 

या बैठकीत जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. कै. वसंतराव नाईक महामंडळ, घरकूल, तांडावस्ती सुधार योजना, समाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना यांची माहिती त्यांना देण्यात आली.  



00000

 

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र

बोधाचिन्ह (लोगो) स्पर्धेचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठाच्या बोधचिन्ह (लोगो) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नियम, अटी व पुरस्काराची माहिती क्रीडा व युवक संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेत भारतातील नागरीक भाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याची मुदत मंगळवार 10 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 50 हजार, 30 हजार व 20 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.   

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्यासाठी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिने प्रोत्साहन मिळावे याअनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे हा राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जोचे क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे. याच उद्देशाने शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र स्थापन केले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

*****

 

नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 595 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर ॲटीजन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 172 एवढी झाली असून यातील 87 हजार 467 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 50 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, मुखेड तालुक्यात 1, हिंगोली 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे हदगाव तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 5 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मुखेड कोविड रुग्णालयातील 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 50 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 144 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 54 हजार 624

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 52 हजार 510

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 172

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 467

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-42

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-50

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

जिल्ह्यातील 91 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 30 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर एकूण 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय मांडवी, लोहा, उमरी या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले आहेत.

 

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण भागात 50 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 7 प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 50 डोस कोविशील्डचे देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 28 जुलैपर्यंत एकुण 7 लाख 98 हजार 805 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 54 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 95 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 49 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात

तंबाखू सेवन करणाऱ्या 15 व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड (जिमाका) दि. 29 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्या 15 व्यक्तीवर जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकामार्फत कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही नुकतीच करण्यात आली. या कार्यवाहीत 2 हजार 850 रुपयाचा दंड आकारण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  ही कार्यवाही करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच अन्न व औषध विभागाकडून सहाय्यक आयुक्त प्रविण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न संरक्षण अधिकारी उमेश कावळे आदी उपस्थित होते. 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री, सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास व कोरोना संक्रमनास प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी केले आहे.

*****


 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 29 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजीच्या आत आवश्यक त्या कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावीत, असे आवाहन जिल्हा कार्यालयाने केले आहे.    

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, बारावी, पदवी पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज मागविण्यात आली आहेत. ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे.   

अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रक, उत्पनाचा दाखला, छायाचित्र, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्रासह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज आदी कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर (दूरध्वनी क्रमांक 02462-220088) नांदेड येथे मुदतीत प्रत्यक्ष अर्ज करता येतील, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जी. जी. येरपवार यांनी केले आहे.

******

 

आंतरजातीय विवाह करणाऱ्या 20 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अनुदान वाटप 

·         समाज कल्याणच्या विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत समाज कल्याण समितीच्यावतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या 20 लाभार्थी जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयाचे वाटप धनादेशाद्वारे नुकतेच करण्यात आले. भविष्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी या अनुदान योजनेसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या जाती भेदाची व असमानतेची दरी दूर होऊन समाज एकसंघ व्हावा म्हणून मागासवर्गीयातील विविध प्रवर्गातील आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य 50 हजार रुपये दिले जाते. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार मागासवर्गीय कल्याणाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजना या समितीच्या सभेत पारीत करण्यात आल्या. 

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विषय समितीची मासिक सभा नुकतीच जिल्हा परिषदेत संपन्न झाली. या सभेत जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती रामराव नाईक, समिती सदस्य गंगाप्रसाद काकडे, सौ. संगिता अटकोरे, सौ. शकुंतला कोमलवाड, भाग्यश्री साबणे, चंदसेन पाटील, सुर्यकांत आरंडकर, सौ. संगिता गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषद सेस स्व उत्पन्नातील मागास कल्याण अंतर्गत पुढील योजना सर्वानुमत राबविण्याचा ठराव संमत करण्यात आला. मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कार्यक्रम आयोजन करणे या योजनेत ग्रामीण भागातील मुळ रहिवासी असलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज प्रवर्गातील मार्च 2021 परिक्षेत इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 हजार 100 रुपये अर्थसहाय्य, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. 

मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांचे स्पर्धा परिक्षार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेत ग्रामीण भागातील मुळ रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज प्रवर्गातील स्पर्धा परीक्षा युपीएससी, एमपीएससी, बँकींग व इतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान या योजनेत नोंदणीकृत संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना घेण्यास मंजुरी देण्यात आली. या दोन्ही योजनेसाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे 5 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

मागासवर्गीयांना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल खरेदीसाठी अनुदान योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज या प्रवर्गातील ग्रामीण भागातील व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल खरेदीसाठी अर्थसहाय्य ही योजना मंजुर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पंचायत समितीमार्फत अर्ज सादर करता येणार आहे. 

मागासवर्गीय व्यक्तींना दुधव्यवसायासाठी गाई, म्हैस पुरविण्याच्या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, प्रवर्गातील ग्रामीण भागातील व्यक्तींना दुध व्यवसायाकरिता गाई, म्हैस खरेदीसाठी अर्थसहाय्य ही योजना मंजूर करण्यात आली. या योजनेसाठी पंचायत समितीमार्फत अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती ॲड. रामराव नाईक यांनी केले आहे.

*****

 

डेंग्यू मुक्त नांदेड जिल्ह्यासाठी विशेष मोहिम

प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी” 

-         - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोरोनाच्या प्रादुर्भावासमवेत डेंग्यूचेही रुग्ण इतर काही जिल्ह्यामध्ये आढळून येत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय डासांमुळे उद्भवतो. या आजाराला आपण आपल्या परिसराची ठेवलेली अस्वच्छता यातूनच निमंत्रण देतो. हा आजार केवळ डासांमुळे होत असल्यामुळे यावर प्रभावी उपाय म्हणजे परिसराची स्वच्छता हाच होय. एडिस इजिप्टाय डास होण्याच्या घरातील व आसपासच्या जागा नागरिकांनी सतत स्वच्छ करणे आवश्यक आहे. आरोग्य साक्षरतेसाठी व सुरक्षित आरोग्यासाठी नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्ह्यात प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी ही विशेष मोहिम राबविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण, नियमित लसीकरण कार्यक्रमात पीएलव्ही लसीचा अंतर्भाव, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण या आरोग्य विषयावर असलेल्या विविध समित्यांची बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विद्या झिने आदी अधिकारी उपस्थित होते. 

डेंग्यू तापाचे ही लक्षणे अंगदुखी, ताप, उलट्या, जुलाब, मळमळ असे असल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकांच्या मनामध्ये अधिक दडपण भिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याचे नाही ते संकट आपण स्वत:हून ओढवून घेण्यापेक्षा आपल्या घरातील व परिसरातील पाणी साचणाऱ्या जागा, शोभेच्या कुंड्या, घरातील कुंड्या, पाणी साठवणुकीचे पात्र, हौद स्वच्छ करुन एक दिवस त्या कोरड्या ठेवल्या तर यावर शंभर टक्के आळा बसू शकतो. नागरिकांनी स्वत:हून ही काळजी घेतली तर नांदेड जिल्हा आरोग्य सुरक्षिततेत आपला वेगळा ठसा निर्माण करेल असा विश्वास डॉ. इटनकर यांनी व्यक्त केला. यादृष्टिनेच डेंग्यू मुक्त जिल्हा होण्यासाठी येत्या शनिवारपासून नांदेड जिल्ह्यात  प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी या विशेष मोहिमेत नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ करुन सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यात मागील 3 वर्षात डेंग्यूची परिस्थिती पुढीलप्रमाणे आहे. सन 2018 मध्ये एकुण 1 हजार 245 लोकांचे रक्त नमुने घेतले यात 378 डेंग्यू रुग्ण आढळले. सन 2019 मध्ये एकुण 1 हजार 527 लोकांचे रक्त नमुने घेतले यात 473 डेंग्यू रुग्ण आढळले. सन 2020 मध्ये एकुण 320 लोकांचे रक्त नमुने घेतले यात 97 डेंग्यू रुग्ण आढळले. एप्रिल 2021 अखेर एकुण 53 लोकांचे रक्त नमुने घेतले यात 19 डेंग्यू रुग्ण आढळले.  

या बैठकीत जिल्ह्यातील एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांनाही विशेष मोहिम हाती घेऊन कोरोना लसीकरण करण्याचे ठरले.  जिल्ह्यात सद्यस्थितीत 6 हजार 481 एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. या रुग्णांच्या लसीकरणासाठीही आरोग्य विभागातर्फे नियोजन करण्याचे निर्देश डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

*****

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...