Thursday, July 29, 2021

 

आंतरजातीय विवाह करणाऱ्या 20 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अनुदान वाटप 

·         समाज कल्याणच्या विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत समाज कल्याण समितीच्यावतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या 20 लाभार्थी जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयाचे वाटप धनादेशाद्वारे नुकतेच करण्यात आले. भविष्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी या अनुदान योजनेसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या जाती भेदाची व असमानतेची दरी दूर होऊन समाज एकसंघ व्हावा म्हणून मागासवर्गीयातील विविध प्रवर्गातील आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य 50 हजार रुपये दिले जाते. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार मागासवर्गीय कल्याणाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजना या समितीच्या सभेत पारीत करण्यात आल्या. 

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विषय समितीची मासिक सभा नुकतीच जिल्हा परिषदेत संपन्न झाली. या सभेत जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती रामराव नाईक, समिती सदस्य गंगाप्रसाद काकडे, सौ. संगिता अटकोरे, सौ. शकुंतला कोमलवाड, भाग्यश्री साबणे, चंदसेन पाटील, सुर्यकांत आरंडकर, सौ. संगिता गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषद सेस स्व उत्पन्नातील मागास कल्याण अंतर्गत पुढील योजना सर्वानुमत राबविण्याचा ठराव संमत करण्यात आला. मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कार्यक्रम आयोजन करणे या योजनेत ग्रामीण भागातील मुळ रहिवासी असलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज प्रवर्गातील मार्च 2021 परिक्षेत इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 हजार 100 रुपये अर्थसहाय्य, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. 

मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांचे स्पर्धा परिक्षार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेत ग्रामीण भागातील मुळ रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज प्रवर्गातील स्पर्धा परीक्षा युपीएससी, एमपीएससी, बँकींग व इतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान या योजनेत नोंदणीकृत संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना घेण्यास मंजुरी देण्यात आली. या दोन्ही योजनेसाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे 5 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

मागासवर्गीयांना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल खरेदीसाठी अनुदान योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज या प्रवर्गातील ग्रामीण भागातील व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल खरेदीसाठी अर्थसहाय्य ही योजना मंजुर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पंचायत समितीमार्फत अर्ज सादर करता येणार आहे. 

मागासवर्गीय व्यक्तींना दुधव्यवसायासाठी गाई, म्हैस पुरविण्याच्या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, प्रवर्गातील ग्रामीण भागातील व्यक्तींना दुध व्यवसायाकरिता गाई, म्हैस खरेदीसाठी अर्थसहाय्य ही योजना मंजूर करण्यात आली. या योजनेसाठी पंचायत समितीमार्फत अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती ॲड. रामराव नाईक यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...