Thursday, July 29, 2021

 

तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत सांस्कृतिक भवनाला प्राधान्य

- अध्यक्ष भिकू रामजी इदाते 

विमुक्त जाती व भटक्या जमाती योजनांचा घेतला आढावा  

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती वर्गातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात असलेला दुर्गम भाग लक्षात घेता तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत समाज मंदिर भवनाला विशेष प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना भारत सरकारच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास आयोगाचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी दिल्या.

 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी या योजनांचा आढावा घेतला. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सामाजिक न्यायाच्या दृष्टिने केंद्र सरकारच्या योजना राज्यस्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नात आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजुंना घेता यावा यासाठी शासनस्तरावर आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करुन देणे हे संबंधित विभागाचे काम आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या वर्गातील लोकांच्या जात पडताळणी समितीकडे असलेल्या प्रकरणांचा नियमाप्रमाणे तात्काळ निपटारा करुन त्यांना न्याय देण्याच्या सूचना अध्यक्ष भिकू रामजी इदाते यांनी केल्या.

 

या बैठकीत जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांना देण्यात आली. कै. वसंतराव नाईक महामंडळ, घरकूल, तांडावस्ती सुधार योजना, समाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना यांची माहिती त्यांना देण्यात आली.  



00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...