Friday, May 29, 2020


 विशेष श्रमिक रेल्वेने  नांदेड येथून 1420 प्रवासी
 पश्चिम बंगालकडे रवाना
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साधला समन्वय
नांदेड, (जिमाका) दि. 29 :- कोरोना प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या 1 हजार 420 प्रवाशांना घेवून आज नांदेड येथून विशेष श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगालकडे रवाना झाली.  जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवासी, यात्रेकरु, विद्यार्थी, मजूर यांना त्यांच्या मुळगावी परतता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करुन प्रत्येक तालुक्यातून प्रवाशांना एकत्र करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत या सर्व प्रवाशांची प्राथमिक  वैद्यकीय चाचणी करुन त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसल्याची खातरजमा करुन घेण्यात आली. त्यांना तसे वैद्यकीय प्रमाणपत्र देवून पुन्हा आज रेल्वेत बसण्यापुर्वी आरोग्य विभागातर्फे तापमान व इतर तपासणी करण्यात आली. आवश्यक ती सर्व वैद्यकीय खबरदारी घेवून सर्व प्रवाशांना आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी भेट देवून सर्व परिस्थितीची पाहणी करुन योग्य त्या सुचना दिल्या.
यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त सुनिल लहाने, निवासी उपजिल्‍हाधिकारी सचिन खल्‍लाळ, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, प्र. तहसीलदार सारंग चव्हाण, तहसीलदार अर्धापूर सुजित नरहिरे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे आदि संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.   
नांदेड येथून निघालेल्या या प्रवाशांमध्ये लातूर येथील 49, बीड येथील 125 , परभणी येथील 140, नांदेड येथील 402 , जालना येथील 18, औरंगाबाद येथील 288, अमरावती येथील 200, यवतमाळ येथील 198 असे एकूण 1 हजार 420 प्रवासी आहेत. ही रेल्वे रात्री 2-00 च्या सुमारास बडनेरा येथे पोहचल्यावर तेथून कांही प्रवासी घेण्याचे नियोजन झाले आहे.
दोन दिवसांच्या या प्रवासात प्रवासी उपाशी राहू नयेत यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन, सराफा असोसिएशन नांदेड, ओमप्रकाश पोकर्णा मित्र मंडळ व इतर सेवाभावी संस्था यांच्यावतीने विशेष नियोजन केले. सर्व प्रवाशांना दोन दिवस पुरेल ऐवढे अन्नाची पाकिटे, फळ व पाण्याच्या बॉटल्स पुरविण्यात आल्या. याचबरोबर सर्व प्रवाशांना मास्कही पुरविण्यात आले. 
000000









कोव्हिड 19 च्या प्रतिबंधासाठी
आयुष संचालनालयाने सुचविले उपाय
नांदेड, (जिमाका) दि. 29 :- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या आजारापासून बचावासाठी आयुष संचालनालयाने नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय सुचविले आहेत. यात आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमियोपॅथी या उपचार पद्धतीमध्ये रोगप्रतिकार क्षमता वर्धक व रोगप्रतिकार औषधी सुचविल्या आहेत.   
कोविड- 19 हा आजार मुख्यत: वयोवृद्ध व्यक्ती, रोगप्रतिकार क्षमता कमी असलेल्या व्यक्ती तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूल असणाऱ्या व्यक्तीसाठी अधिक घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांची व सामान्य नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यानुसार आयुर्वेदातील संशमनी वटी, आयुष काढा, होमियोपॅथी मधील आर्सेनिक अल्बम-30, युनानी मधील वेहिदाना उन्नाव, सॅपिस्टन यांचा काढा तसेच सिद्ध चिकित्सा पद्धतीतील निळेम्बु कुडीनीर काढा याचा वापर करावा. योग चिकित्सेमधील प्राणायाम, सुर्यनमस्कार व ध्यान इत्यादीचा अवलंब करावा. वर उल्लेख केलेल्या औषधांचा वापर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्यानुसारच करावा. तोंडाला मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, खोकलतांना किंवा शिंकतांना तोंडावर रुमाल लावणे आदी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.  
रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेद उपचारात संशमनी वटी 500 मि.ग्रॅ. दोन वेळा पंधरा दिवस, आयुष काढा 40 मिली दिवसातून दोन वेळा चौदा दिवस. होमिओपॅथी उपचार Arsenicum Album 30  पाच गोळ्या सकाळी उपाशी पोटी तीन दिवस आणि एका महिन्यानंतर पुन्हा तीन दिवस. सिद्ध  उपचार निळवेम्बु कुडीनिर काढा 60 मिली दिवसातून दोन वेळा चौदा दिवस. युनानी : बेहीदाना 3 ग्रॅम उन्नाब 5 नग सॅपीस्टन 1 नग 40 मिली दिवसातून दोन वेळा चौदा दिवस. योग- प्रात: काळी 5 ते 6 वा. अनुलोम, विलोम, भस्म्रिका, भ्रामरी व कपाल भारती, सुर्यनमस्कार तसेच ध्यान दररोजन नित्य नियमाने करावे, असे आवाहन शासकीय आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांनी केले आहे.
000000


गुणांची सरासरी विचारात घेऊन
दहावीचा निकाल होणार जाहीर 
नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्यात कोराना आजाराच्या प्रार्दुभावामुळे दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर- 2 भूगोल विषयाची परीक्षा तसेच दिव्यांग विद्यार्थ्याच्या कार्यशिक्षण या विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या दोन विषयांसाठी अन्य विषयांच्या लेखी परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून गुणदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी एका प्रकटनाद्वारे दिली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान हे त्यांने अन्य विषयांच्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक अंतर्गत मुल्यमापन / तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. सदर कार्यपद्धती अवलंबून दहावीचा निकाला जाहिर केला जाणार आहे.  
                                                           00000


नांदेड जिल्ह्यात आज पाच रुग्णांची भर
नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी
नांदेड (जिमाका) दि. 29 :- नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 29 मे, 2020 रोजी सांयकाळी  5  वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 113 व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी 108 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 5 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही 143 झाली आहे. या रुग्णावर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे.
जिल्ह्यात आज एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील 8 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 1 रुग्ण असे एकूण 9 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 143 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 99 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरित 36 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 2 स्त्री रुग्ण वय वर्षे 52 व 55 यांची प्रकृती गंभीर आहे.
आज सांयकाळी 5-00 पर्यंत आढळलेले 5 पॉझिटिव्ह रुग्ण हे पुढील भागातील आहेत. मिल्लत नगर भागातील 32 वर्षाचा 1 पुरुष रुग्ण, लोहार गल्ली भागातील 28 वर्षे वयाचा 1 पुरुष रुग्ण, मुखेड येथील गोळी गल्ली येथील 40 वर्ष वयाची 1 स्त्री रुग्ण व कळमनुरी जि. हिंगोली येथील 38 वर्ष वयाचा 1 पुरुष रुग्ण तर 35 वय वर्षाची 1 स्त्री रुग्ण यांचा 5 रुग्णात समावेश आहे. यापैकी 4 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मुखेड येथील एका महिला रुग्णाचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , नांदेड येथे मृत्यू झाला आहे.
कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 38 हजार 466, घेतलेले स्वॅब 3 हजार 751, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 238, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 05, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 143, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 143, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 99, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 36, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 209 एवढी आहे.
दिनांक 28 मे  रोजी पाठविण्यात आलेल्या 108 स्वॅब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील. ‍आज 29 मे  रोजी 101 रुग्णांची स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील.
एकुण 143 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 99 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उपचार घेत असलेल्या 36 रुग्णांपैकी 09 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड . पंजाब भवन कोवीड केअर सेंटर, यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 14 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय, माहूर येथे 1 रुग्ण व उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहेत.  सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
0000


नमूद दुकाने, बाजारपेठा सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत सुरु राहणार
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी डॉ. विपीन  
नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रशासनातर्फे योग्य प्रतिबंधात्‍मक उपायोजना केल्या असून सामान्य जनजीवन सुरळीत रहावे यादृष्टिने जिल्ह्यातील नमूद दुकाने व बाजारपेठा सकाळी 9 ते सायं 5 यावेळेत सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे. काही सोशल मिडियावर यासंदर्भात येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता योग्य ती सुरक्षीतता घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
 जिल्हा प्रशासनाने नमूद दुकाने, बाजारपेठा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु नमूद दुकाने, बाजारपेठच्या ठिकाणी गर्दी वाढल्यस किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गमीत आदेशाचे पालन न झाल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यात येईल. प्रतिबंधीत क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) मध्ये केवळ जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व अत्यावश्यक वैद्यकीय सेवांना मुभा राहील. तर प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्या अधीन राहून मुभा यापूर्वीच देण्यात आली असल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...