Tuesday, December 17, 2019


जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची
31 डिसेंबरला बैठक ; तक्रारी देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार सोमवार 30 डिसेंबर 2019 रोजी आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात सोमवार 30 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 4 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत तक्रारीचे निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने सबळ पुराव्यासह दोन प्रतीत सादर करावे लागेल.
या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेवून शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले आहे.
00000


अल्पसंख्यांक हक्क दिवस
साजरा करण्याचे निर्देश
नांदेड, दि. 17 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून बुधवार 18 डिसेंबर 2019 हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणवी, माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, या कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद आदींचा समावेश असावा, असे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले.                                        
00000


राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजनेंतर्गत अनुदानाचे वाटप
नांदेड, दि. 17 :- राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजनेंतर्गत नांदेड तालुक्यात पाच लाभार्थ्यांना 16 डिसेंबर रोजी अनुदान वाटप करण्यात आले आहे. ज्यामध्ये श्रीमती कुशवर्ता साहेबराव मनोहरे, श्रीमती लता रजनीकांत सदावर्ते, श्रीमती शिला गणेश श्रीमंगले, श्रीमती बायनाबाई दिलीप पोटफोडे व श्रीमती पुण्यरथा परमानंद पवार या पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान नांदेडचे तहसिलदार अरुण जऱ्हाड यांच्या हस्तेप वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय योजनेंतर्गत राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजनेत कुटूंबातील ज्यांचा उत्पन्नाचा वाटा मोठा असेल अशा प्रमुखकर्ता पुरुष किंवा स्त्री ज्यांचे वय 18 ते 59 वर्ष लाभासाठी सदरचे कुटूंब हे दारिद्रयरेषेखालील असणे आवश्यक आहे.
या लाभार्थ्यास त्यांच्या पश्चात त्यांचे जे वारस आहेत त्यांना शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचा निर्णय 12 मार्च 2013 अन्वये एक रक्कमी 20 हजार रुपये ऐवढे अनुदान वाटप करण्यात येते. यावेळी नायब तहसिलदार व्ही . एन. पाटे, अ.का. डी.आर.पोकले, लिपीक प्रशांत गोडबोले हे उपस्थित होते.
00000


पंचायत समिती सभापती, उपसभापती
पदाची निवडणूक पुढील आदेशापर्यंत रद्द
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची 21 डिसेंबर 2019 रोजी आयोजित निवडणुक तांत्रिक कारणामुळे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
ग्रामविकास विभाग, मुंबई यांच्याकडील 10 डिसेंबर 2019 रोजीच्या पत्रात नमुद सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 22 दिनांक 23 ऑगस्ट 2019 अन्वये जिल्हा परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची मुदत 20 डिसेंबर 2019 रोजी संपत असल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 42 45 खाली जिल्हा परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणुक  20 डिसेंबर 2019 रोजी पासुन उर्वरित पुढील कालावधीसाठी घेण्यात येणार होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश दिनांक 10 डिसेंबर 2019 अधिनियमातील कलम 45 (2) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर जिल्हा परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
ग्रामविकास विभाग मुंबई यांच्याकडील दिनांक 10 डिसेंबर 2019 रोजीच्या सुधारित शासन पत्रात या आदेशान्वये 120 दिवसाचा कालावधी हा दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर प्रचलीत कार्यपद्धती नुसार आवश्यक ती सूचना नोटीस निर्गमीत करुन सदर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्याचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना नमुद आहेत. त्यामुळे 21 डिसेंबर 2019 रोजीची जिल्हा परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणुक तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांनी अधिनियमातील कलम 45 (2) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर जिल्हात परिषद नांदेड अंर्तगत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्यासाठी 10 डिसेंबर 2019 च्या आदेशान्वये पिठासीन अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्तीव संपुर्ण निवडणुक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत रद्द केली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
00000


 राष्ट्रीय पुरुष / थोर व्यक्तींची जयंती,
राष्ट्रीय दिन साजरा करण्याचे निर्देश
नांदेड, दि. 17 :- सन 2020 मध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक 12 डिसेंबर 2019 नुसार सर्व राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्यात यावेत. परिशिष्टात दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व रविवारी तसेच महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी येत असले तरी ते कार्यक्रम त्या-त्या दिवशी साजरे करण्यात यावेत. आपल्यास्तरावरुन सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील संबंधीत सर्व कार्यालयांना सदरचे कार्यक्रम घेण्याबाबत आवश्यक त्या सुचना देवून त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000



  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...