Saturday, November 20, 2021

 शेतकरी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- ग्रामीण कृषि मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषि विभाग आत्मा व जनशक्ती शेतकरी उत्पादन संघ हरडफ यांच्या संयुक्त विद्यमाने माहूर तालुक्यातील हरडफ येथे 19 नोव्हेंबर रोजी हवामान अंदाज व कृषि तज्ञांचा सल्ला व शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   

यावेळी किनवटचे उपविभागीय कृषि अधिकारी डी. एम. तपासकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे उपसंचालक संशोधन (पीके) डॉ. अशोक जाधव, ग्रामीण कृषि मोसम सेवा, वनामकृवि, परभणीचे प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे, संशोधन सहयोगी प्रमोद शिंदे, हवामान निरीक्षक ए. आर. शेख, तालुका कृषि अधिकारी बालाजी मुंडे, मंडळ कृषि अधिकारी अमित पवार, जनशक्ती शेतकरी प्रोडयूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सर्व कृषि सहाय्यक, आत्मा प्रकल्पाचे कर्मचारी, प्रगतशील शेतकरी डॉ. बाबा डाखोरे, अमोल आडे, दत्तात्रय सोनटक्के, डॉ. विजय जाधव व परिसरातील जवळपास शंभरपेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते. 

याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषि अधिकारी तपासकर यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना व त्याचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया याबद्दल सखोल मर्गदर्शन केले. डॉ. अशोक जाधव म्हणाले, शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलानुसार हवामानाचा अंदाज वापरून आपल्या शेतीचे नियोजन करावे जेणेकरून होणारे नूकसान टाळता येईल. सध्या शेतात उभे असलेल्या रब्बी पिकांच्या नियोजनाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. कैलास डाखोरे, प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वनामकृवि, परभणी यांनी हवामानाचा अंदाज व त्याचा पिकांवर होणारा परिणाम याबद्दल मार्गदर्शन करून हवामान अंदाजाबद्दल माहिती मिळण्याचे स्त्रोत याबद्दल माहिती दिली. कृषि हवामान सल्ला मिळवण्यासाठी मेघदूत ॲप व विजांच्या माहितीसाठी दामिनी ॲपचा वापर करावा, असे आवाहन केले. तालुका कृषि अधिकारी बालाजी मुंडे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन, हरभरा व तूर या पिकावरील किड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. 

शेवटच्या प्रश्नोत्तर सत्रात मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे व शंकांचे समाधान केले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी भाजीपाला उत्पादक शेतकरी रवी राठोड यांच्या वांगी व टोमॅटोच्या प्लॉटला तसेच प्रगतशील शेतकरी डॉ. बाबा डाखोरे यांच्या डाळींब बागेस भेट दिला. 

00000

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- उर्ध्व पैनगंगा प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेता चालू वर्ष सन 2021-22 रब्बी हंगामासाठी पुढील अटींच्या अधिन राहुन नमुना नं. 7 वर पाणी पुरवठा करण्याचे ठरले आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये  नमुना नं. 7 वर भुसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले नमुना नं. 7 चे  पाणी अर्ज नजीकच्या शाखा कार्यालयात 10 डिसेंबर 2021 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह पुर्ण भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज कोणत्याही कारणास्तव स्विकारले जाणार नाहीत व अशा क्षेत्रास कोणत्याही परिस्थीत पाणी पुरवठा केला जाणार नाही. याची उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील सर्व लाभधारकांना नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी केले आहे. 

शासनाच्या प्रचलित धोरणानुसार प्राधान्याने  शक्यतो चारा पिके व भुसार पिके करावीत. लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना कालव्यास उपलब्ध होणाऱ्या पाणी कोटयानुसार नमुना नं. 7 वर मंजुरी देण्यात येईल. या वर्षीच्या रब्बी हंगामासाठी नमुना नं. 7 चे पाणी अर्ज संबधित शाखा कार्यालयात 10 डिसेंबर 2021 पर्यंत  कार्यालयीन वेळेत देण्यात यावे. कोरे पाणी अर्ज शाखेत विना मुल्य उपलब्ध होतील. पाणी अर्जासोबत वहिवाटीचा 7/12 उतारा जोडण्यात यावा. पाणी नाश टाळण्यासाठी सर्व लाभधारकांनी शेतचाऱ्या दुरुस्त करुन घ्याव्यात, पाटमोट सबंध नसावा.

 

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावर उपसा सिंचनास मंजूरी असणाऱ्या संस्था/ वैयक्तिक बागाईतदार यांनी त्यांचे नमुना नं.7 चे पाणी अर्ज सादर करावेत. थकबाकीदार बागायतदार यांना त्यांचेकडील थकबाकीची संपुर्ण रक्कम भरल्यानंतरच  त्यांना मंजूरी दिली जाईल, कोणत्याही परिस्थीतीत थकबाकीदारानां पाणी दिले जाणार नाही. धरणातील पाण्याचा साठा, कालव्याची व  फाटयाची वहन क्षमता, वहन कालावधी याचा विचार करुन मागणी क्षेत्रास मंजूरी देतांना क्षेत्रात कपात केली जाईल. उडाफ्याचे क्षेत्रास मंजूरी दिली जाणार नाही. पाणी मागणी अर्ज न देता पिके घेतल्यास सदर पिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी  जलसंपदा विभागाची राहणार नाही, व पाणी न मिळाल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास संबधित लाभधारक जबाबदार राहतील. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होईल त्या निर्णयाप्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल. त्यानंतर पाणी न मिळाल्याने पिकांचे कोणत्याही प्रकाराने नुकसान झाल्यास त्यास जलसपंदा विभाग जबाबदार राहणार नाही. या प्रमाणे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठयास महाराष्ट्र शासन अधिनियम सन 1976, कालवे नियम 1934 म.सिं.प.शे.व्य.कायदा.2005 तसेच वेळोवेळी काढण्यात येणारे शासकीय आदेश लागू राहतील, असेही आवाहन नांदेड उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000


 अत्याधुनिक सेवा सुविधांच्या उपलब्धीसह

लोकाभिमूख गतीमान प्रशासनावर भर

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- प्रशासकीय सोईच्या दृष्टीने अनेक नानाविध तंत्रज्ञानावर आधारित माध्यमे विकसीत झाली आहेत. या माध्यमांचा जिल्ह्यातील प्रशासनाला लोकाभिमूखतेची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाला लोकप्रतिनिधींच्या सहमतीतून ज्या सभागृहात नियोजनाचा आराखडा तयार केला जातो त्या सभागृहालाही आता अत्याधुनिक माध्यम व तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या वैभवाला नवी जोड मिळाल्याचे गौरोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्ह्यातील 5 नगरपरिषदांना सुसज्ज अग्निशमन दल वाहनाचे हस्तांतरण, डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथील मुख्य सभागृहात उभारण्यात आलेल्या नवीन भव्य डिजिटल एलईडी डिस्पलेचे अनावरण, ग्रीन जिमचे उद्घाटन, श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे आरोग्य विभागाच्या 10 रुग्णवाहिकेचे लोकार्पण, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅटमेंटन कोर्टचे उद्घाटन, नांदेड वाघाळा शहर मनपाच्या स्टेडिअम परिसरातील बॅटमेंटन कोर्टचे उद्घाटन आणि क्लब रोडच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असून प्रशासकीय सेवा सुधारण्यासमवेत आरोग्याच्या सेवा-सुविधा पर्यंत याचबरोबर चांगले निकोप आरोग्य प्रत्येकाला लाभावे, युवकांना विविध खेळांच्या सरावासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर मी अधिक भर दिला असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील बॅडमिंटन व टेनिस कोर्टचे हे सर्व सुविधायुक्त दोन हॉल राष्ट्रीय पातळीवरील नवीन खेळांडू घडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

नांदेड जिल्ह्याचे पॅरानॅशनल चॅम्पियम बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नाव उज्ज्वल करणाऱ्या लता उमरेकर हिचा यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्कार केला. उत्तराखंड येथे सन 2019 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत लता उमरेकर हिने सिलव्हर मेडल प्राप्त केले आहे. यावेळी महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विरेंदरसिंघ गाडिवाले, महिला व बालकल्याण शिक्षण सभापती संगिता पाटील-डक, नगरसेवक मुन्तजिबोद्दीन, दुष्यंत सोनाळे, नागनाथ गड्डम, विजय येवनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थाना या नवीन 10 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यात  उपजिल्हा रुग्णालय मुखेड, देगलूर,  गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बारड, अर्धापूर, भोकर, नायगाव, माहूर तर किनवट तालुक्यातील सारखणी व बोधडी येथील आश्रम शाळा यांचा समावेश आहे.

 

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड-19 च्या रुग्णांसह जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमामध्ये रेफरल ट्रान्सपोर्ट कार्यालयामार्फत माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता आणि आजारी बालकांना मोफत वाहन संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे, गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी तपासणीसाठी वाहन पुरविणे, संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कमीत कमी वेळात सर्व केंद्राना लसीकरणाचा साठा पोहचविणे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, दुर्गम व पहाडी परिसरात तसेच जंगल परिसरात रुग्णांना विविध रुग्ण सर्वेक्षण करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून या शासकीय रुग्णवाहिका उपयोगात आणल्या जाणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

 

जिल्ह्यातील 5 नगरपरिषदांना नवीन अग्निशमन दलाची वाहनांची चाबी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित नगरपरिषदांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या. या नगरपरिषदांमध्ये मुदखेड, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी, अर्धापूर यांचा समावेश आहे. 

पालकमंत्री चव्हाण यांनी दत्तक धनेगाव व मालेगावला

सौर विद्युत संच देऊन मिशन आपुलकीच्या पोर्टलचे केले उद्घाटन 

लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मिशन आपुलकीच्या पोर्टल व वेबसाईटचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कर्तव्यपूर्तीतून केले. केलेल्या विकास कामांची निगा व त्याचा पुरेपुर सदउपयोग जर घ्यायचा असेल तर त्यात प्रत्येक योजना या ग्रामस्थांना त्याच्या वाटल्या पाहिजेत. कोणत्याही योजनेतील लोकसहभाग हा म्हणूनच अधिक महत्वाचा असतो. विकास प्रक्रियेच्या मूळ विचाराला चालना देण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम 15 ऑगस्टपासून जिल्हाभर हाती घेतला आहे. जिल्ह्याच्या विकास कामांची वेगळी ओळख या उपक्रमामार्फत होत असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही नांदेड जिल्ह्यातील धनेगाव व मालेगाव या दोन गावासाठी आपलेही योगदान देण्याचे निश्चित केले आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी या योजनेच्या वेबपोर्टलचे प्रत्यक्ष एका छोट्याशा कृतीतून शुभारंभ केला. 

विशेष म्हणजे हा उपक्रम डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनामध्ये बसविण्यात आलेल्या भव्य डिजिटल एलईडी प्रकल्पाच्या स्क्रिनवर प्रात्याक्षिकासह केला गेला. या वेबपोर्टलवर आता योगदान कर्त्याचे नाव व त्यांनी आपल्या गावासाठी देऊ केलेल्या योगदानाची नोंदणी यावर करता येईल. एका ॲपच्या सहाय्याने प्रत्येक गाव यात जोडले गेले असून योगदान कर्त्यांनी नोंदणी व इतर प्रक्रिया करताच तात्काळ ऋणपत्र (प्रमाणपत्र) पाठवण्याची सुविधा अंर्तभूत केली आहे. आयटी सोलूशन्स कंपनीमध्ये कार्यरत किनवट सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सदर ॲपचे काम केले आहे. सेटट्राइब ही संस्था आदिवासी भागातील मुलांच्या ई-साक्षरतेसाठी योगदान देत असून यापुढेही आवश्यक ती मदत करू असे संचालक सारंग वाकोडीकर यांनी सांगताच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौतूक करुन शासनातर्फेही आम्ही प्रयत्न करु असे सांगितले. 

000000






 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 561 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 461 एवढी झाली असून यातील 87 हजार 782 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालयात 6 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 68 हजार 54

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 64 हजार 172

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 461

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 782

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...