Thursday, February 16, 2023

 वृत्त क्रमांक  72 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू   

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून दिनांक 20 फेब्रुवारी ते 19 मार्च 2023 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मार्च 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 

 वृत्त क्रमांक  71 

डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास प्रतिबंध 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज जयंती काळात जिल्हयात डॉल्बी सिस्टीमचे मालक, चालक व इतर कोणत्याही व्‍यक्‍तीस डॉल्‍बी सिस्‍टीमचा वापर करण्यास व चालविण्‍यास दिनांक 19 ते 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत प्रतिबंध करण्‍यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्‍वये आदेश निर्गमीत केले आहेत.    

000000

 

वृत्त क्रमांक 69

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी

निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून मिळणार

 

·  प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करण्याची सुविधा झाली बंद


नांदेड (जिमाका) दि. 16 :- इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठीआकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. या परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या जीवनात एक महत्वपूर्ण टप्पा असतो. पालक व समाज घटकांचे या परीक्षेकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी घटना मंडळाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होवून परीक्षा निकोपभयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात सुरळीत पार पडण्याच्यादृष्टीने परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनीटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. परंतू विद्यार्थ्याचे हित लक्षात घेवून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.

 

फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून सकाळ सत्रात सकाळी 11 वा. तसेच दुपार सत्रात दुपारी 3 वा. परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात सकाळी 10.30 वा. तसेच दुपार सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 असून सुधारित वेळ सकाळी 11 ते दु.2.10 याप्रमाणे राहील. परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दु. 1 असून सुधारित वेळ दुपारी 11 ते दु.1.10 याप्रमाणे राहील. परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दु. 1.30 असून सुधारित वेळ दुपारी 11 ते दु.1.40 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 6 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 6.10 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 5 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 5.10 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 5.30 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 5.40 याप्रमाणे राहीलअसेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  70

 

सर्वधर्मीय सामुहीक विवाह मेळाव्याचे 23 एप्रिल रोजी आयोजन

 

·   नाव नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या समन्वयाने नांदेड जिल्ह्यातील विश्वस्त संस्थेच्या सहकार्याने धर्मादाय संघटना सार्वजनिक सामुहीक विवाह सोहळा समिती नांदेड यांच्या पुढाकारातून सर्वधर्मीय सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विवाह सोहळा रविवार 23 एप्रिल 2023 रोजी शहीद बाबा दीपसिंघजी गुरुद्वाराकौठा (विमान गुरुद्वारा) नांदेड येथे दुपारी 12.31 वाजता संपन्न होणार आहे. गरजुनी या सामुहिक विवाह सोहळयाचा लाभ घ्यावाअसे आवाहन धर्मादाय उप आयुक्त किशोर वसंतराव मसने यांनी केले आहे.

 

सन 2018 प्रमाणे यावर्षी धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे निर्देशानुसार या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  हा विवाह सोहळा विनामूल्य होणार असून यामध्ये वधू-वरांना मणीमंगळसुत्रजोडवेलग्नाचा ड्रेस व संसार उपयोगी साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व गरजू व्यक्तींनी विशेषत: आत्महत्या शेतकरीशहीद जवानअपंगनिराधार व कोरोना काळात मृत्यू पावलेल्या कुटूंबातील वधू-वरांनी आपले नाव नोंदणी करुन या सर्वधर्मीय सार्वजनिक विवाह सोहळयाचा लाभ घ्यावाअसे आवाहन विवाह सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

 

संपर्क व नाव नोंदविण्यासाठी धर्मादाय उप कार्यालयनांदेड दू. क्र. 02462-249770अध्यक्ष सुधाकर गोपीनाथ टाक मो.क्र.7588889000सचिव मिनलताई निरंजन राव खतगावकर पाटील मो.क्र. 7507346600कोषाध्यक्ष कामाजी गंगाधरराव पवार मो. क्र. 9158049999 व सदस्य शिवाजी राघोजीराव पवार मो.क्र. 8411999901 वर संपर्क साधावाअसे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...