Monday, November 1, 2021

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह,

ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार येत्या 3, 4 व 5 नोव्हेंबर हे तीन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 3, 4 व 5 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये यात या गोष्टी करा- विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका: आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. 

पूर परिस्थितीत : काय करावे आणि काय करू नये

पूर येण्यापूर्वी: अफवांकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका. आपत्कालीन परिस्थितीसाठी एस.एम.एस. चा उपयोग करा. आपले मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहितीसाठी रेडीओ ऐका, टी.व्ही. पहात रहा, वर्तमानपत्र वाचत रहा. गुरेढोरे /पशूच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करून घ्या. सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन कीट तयार ठेवा. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक (वाटर-प्रूफ) बॅग मध्ये ठेवा. जवळपास असलेली निवारा/पक्के घराकडे जावयाचे सुरक्षित मार्ग जाणून घ्या. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करा. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा. पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्या यापासून नागरिकांनी सतर्क/जागरूक रहावे. 

पूर दरम्यान : पूर प्रवाहात प्रवेश करू नका. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल,नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहा. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहा. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फुट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खा. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले/क्लोरीन युक्त पाणी प्या. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करा. 

पूर येऊन गेल्यानंतर मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका.  कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौच्यालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका. आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका. 

पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास: घरातील वस्तू  पलंगावर आणि टेबल्सवर ठेवा. शौच्यालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान/सुरक्षित निवारा येथे जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्या बरोबर घ्या. खोल, अज्ञात पाण्यात प्रवेश करू नका; पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेंव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेंव्हाच घरात प्रवेश करा.  कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा. ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 


आयकर मर्यादेपेक्षा जास्त निवृत्ती वेतन असणाऱ्या

निवृत्ती वेतनधारकांनी माहिती सादर करावी 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- येथील कोषागारामार्फत सेवानिवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारकांनी  ज्यांचे सन 2021-22 एकत्रित निवृत्ती वेतन 5 लाख 50 हजार व त्यापेक्षा जास्त आहे त्यांनी आपला आयकर सुट मिळण्यासाठी पात्र बचतीचा तपशील बुधवार 10 डिसेंबर 2021 पर्यंत अर्जासोबत पुराव्यासह कोषागारात सादर करावा, अन्यथा नियमाप्रामणे आयकर कपात करण्यात येईल. 

आयकर वसुलीचे नवीन नियम सेक्शन- 115 बीएसी नुसार  नवीन कर व्यवस्था (New Tax Regime  ) व जूनी कर व्यवस्था (Old Tax Regime) असे दोन पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. यापैकी आपणास जो पर्याय आयकर कपातीसाठी निवडावयाचा आहे. त्याची माहिती 10 डिसेंबर 2021 पूर्वी कळविण्यात यावी अन्यथा जूनी कर व्यवस्था (Old Tax Regime)  हा विकल्प आपण स्विकारल्याचे गृहीत धरुन नियमाप्रमाणे आयकर कपात करण्यात येईल. कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी आयकरासाठी कोणतीही बचतीची माहिती सादर करु नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000


 नांदेड जिल्ह्यात 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 583 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 407 एवढी झाली असून यातील 87 हजार 723 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 31 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे.

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 31 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 31 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 55 हजार 310

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 51 हजार 629

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 407

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 723

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-31

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 आझादी का अमृत महोत्सव” निमित्त 

विविध कायदेविषयक कार्यक्रमांचे आयोजन 

नांदेड (जिमाका) 1 :-  “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत वेगवेगळया ग्रामपंचायत, शाळा, बाजारपेठ येथे कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तालुका विधी सेवा समितीमार्फत हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृतीचे केली जात आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड आणि तालुका विधी सेवा समितीच्यावतीने 1 हजार 460 गावामध्ये 10 लाख 13 हजार 383 लोकांना कायदेविषयक माहिती देण्यात आली. तसेच 683 गावांमध्ये कायदेविषयक शिबीर घेऊन 2 लाख 43 हजार 930 लोकांना विविध कायदेविषयक माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव राजेंद्र रोटे हे परिश्रम घेत आहेत. त्यांनी नांदेड तालुक्यातील 70 ग्रामपंचायती व गावांना भेटी दिल्या असून गावातील लोकांना प्रत्यक्ष भेटून कायदेविषयक शिबिराद्वारे माहिती दिली आहे. 

तसेच नांदेड जिल्हा कारागृह येथे कैद्यांना त्यांचे अधिकार व हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 नांदेड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे, रिटेनर लॉयर नय्युमखान पठाण आदी उपस्थित होते. तसेच निळा आणि आलेगाव येथेही कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी कायदयाच्या अज्ञानातून न्यायालयातील खटले निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांनी कायदयाविषयी जागृत राहिले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी दिवाणी न्यायाधीश व. स्तर संजय बी. डिगे हे उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे रिटेनर लॉयर सुभाष बेंडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

 मतदान मोजणीसाठी कडेकोट सुरक्षेसह तयारी पूर्ण

नांदेड (जिमाका) दि. 1 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी सुमारे 150 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी 14 टेबल तयार करण्यात आले असून सुमारे 30 मतमोजणीच्या फेऱ्या होतील. पहिली फेरी सकाळी 8 पासून सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने उर्वरीत फेऱ्या पूर्ण होतील.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...