Saturday, September 25, 2021

 नित्य व्यायाम व सरावातच फिट इंडियाचा मंत्र

-         जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे

नांदेड (जिमाका) दि. 25 :- प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरुकता ठेऊन दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. अलिकडच्या काळात कोविड-19 सारख्या साथीच्या आजारांचा विचार करता प्रत्येकाने जागरुक राहण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. भारताला खऱ्या अर्थाने फिट अर्थात तंदुरुस्त ठेवायचे असेल तर प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यातच फिट इंडियाचा मंत्र दडलेला असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेहरु युवा केंद्रातर्फे आयोजित फिट  इंडिया रनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नेहरु युवा केंद्राच्या अधिकारी चंदा रावळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

नेहरु युवा केंद्र संगठन युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकारच्यावतीने फिट इंडिया रनचे आयोजन करण्यात आले होते. येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोर आयोजित केलेल्या या कार्यक्रमास विविध क्रीडा  संघटनांचे युवक व युवती सहभागी झाले होते.

 एनसीसीचा फिट इंडिया रन

 प्राचार्य  डॉ. आर. एम. जाधव

भारताला आरोग्याच्यादृष्टिने सशक्त करण्यासाठी छात्र सैनिकांनी पुढे येऊन युवकांच्या मनात जनजागृती करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांनी केले. 52 महाराष्ट्र बटालीयन राष्ट्रीय छात्रसेना नांदेडच्यावतीने येथील पिपल्स महाविद्यालयाच्या प्रांगणातून दौड आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी तथा प्रभारी समादेशक अधिकारी लेफ्टनंट कर्नल वेंट्रीवेलू, लेफ्टनंट आर. पी.  गावंडे, केअर टेकर डॉ. आर. पी. कुलकर्णी, डॉ. के. वाय. इंगळे, स्वच्छता निरीक्षक वाय. के. ढगे, डॉ. अन्सारी, सुबेदार जमन सिंघ, सुभेदार महादेव भोसले, नायब सुभेदार लाल मोहमंद, हवालदार जोगिंदर लाल, देवेंद्रसिंघ, संजय कुमार, सरोज कुमार, नायक सुनिल कुमार यादव, राजेंद्र कुमार, आर. आर. पवार, व्हि. एम. गवळी, शेख अहमंद, रोहित चव्हाण आदी उपस्थित होते.     

0000





 डॉक्टारांना युजरआयडी प्राप्त करुन घेण्याचे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 25 :- अनुज्ञप्ती विषयक कामासाठी अर्जदारांची तपासणी संबंधीत डॉक्टरांमार्फत करण्यात येऊन नमुना-1 (अ) अपलोड करण्यात येणार आहे. जिल्हयातील पात्र डॉक्टारांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन परिवहन कार्यालयामार्फत युजरआयडी प्राप्त करावयाचे आहे. सर्व संबंधीत वैद्यकीय व्यवसायिकांना आवश्यक कागदपत्रांच्या मूळप्रतींसह अनुज्ञप्ती विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे संपर्क साधून युजरआयडी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत प्राप्त करुन पुढील कार्यवाही करुन घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

शासनाने आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सेवेचा लाभ घेण्याची तरतुद केली आहे. त्यामुळे घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देण्याची सुविधा अर्जदारास उपलब्ध करुन दिली आहे. या चाचणीत उत्तीर्ण होऊन त्यास घर बसल्यास शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रिंट मिळणार आहे. नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही व यातून वेळेची बचत होणार आहे. मोटार वाहन कायदा अनुषंगीक नियमा नमूद अनुज्ञप्ती विषयक कामासाठी आवश्यक नमुना-1(अ) हे मेडीकल प्रमाणपत्र सुध्दा पात्र डॉक्टरांमार्फत (नोंदणीकृत एमबीबीएस वैद्यकीय व्यवसायिक किंवा त्यावरील अर्हता प्राप्त) ऑनलाईन पध्दतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित करण्यात आली आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 801 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 309 एवढी झाली असून यातील 87 हजार 645 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 2, खाजगी रुग्णालय 1, बिलोली तालुक्यातर्गंत 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 13 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 29 हजार 834

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 26 हजार 505

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 309

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 645

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 परीक्षेला काय हवे हे विद्यार्थ्यांनी

समजून घेणे आवश्यक - सुमितकुमार धोत्रे

·         स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना युपीएससी उत्तीर्ण सुमितकुमार यांचा सल्ला

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कोणत्याही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एका बाजूला आत्मविश्वास तर दुसऱ्या बाजुला वाढत्या स्पर्धेनिमित्त येणारा ताण हा गृहित धरावाच लागतो. स्पर्धा परीक्षा देण्याअगोदर यातून निर्माण होणाऱ्या ताण-तणावांना बाजुला सारून ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हणून आपल्याकडून काय अपेक्षित करीत आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. अभ्यासाला शिस्त, मानसीक र्स्थेर्य, अभ्यासाव्यतिरीक्त इतर बाबींचा त्याग आणि विषयांची खोली समजून घेणे हा स्पर्धा परीक्षेतील यशाचा खरा मार्ग असल्याच्या भावना सुमितकुमार धोत्रे यांनी व्यक्त केल्या.

नांदेड येथील पत्रकार दत्ताहरी धोत्रे यांचा मुलगा सुमितकुमार याने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. या यशाबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्याचे अभिनंदन करुन बोलते केले तेंव्हा सुमितकुमार याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचनाही केल्या.

कोविड-19 पूर्वीच्या स्पर्धा परीक्षा आणि दिड वर्षे संपल्यानंतर आताच्या परीक्षा यात कमालीचे अंतर पडले आहे. सोशल मिडिया व डिजिटल शिक्षण प्रणालीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. पूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी जिथे 6 लाखापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या होती ती आता 11 लाखाच्या पुढे येऊन ठेपली आहे. ऑनलाईन शिक्षणाची माध्यम वाढली आहेत. मुलांना त्यांच्या गावी यामुळे कोणत्याही महानगरातील क्लासचे शिक्षण घेणे सोपे झाले आहे. यातून मुलांना आत्मविश्वास वाढवत आपण देत असलेल्या परीक्षेची व विषयांची खोली व व्याप्ती लक्षात घेतली पाहिजे. ही परीक्षा सलग एक वर्षे चालणारी आहे. यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर आपला कस लागतो. यातून जिद्यीने सावरत नैराश्याला दूर ठेवले पाहिजे, असे सुमितकुमार यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांकडून आता अपेक्षा बदल्या आहेत. घोकमपट्टी याला फारसा वाव राहिला नाही. विषयाचे मूळ आकलन विद्यार्थ्यांना आहे की नाही यावर आता अधिक भर आहे. त्यामुळे निवडलेल्या विषयांचा अभ्यास करतांना केवळ प्रश्नोत्तरांकडे लक्ष न देता हा विषय नेमके काय सांगत आहे याकडे  लक्ष देणे गरजेचे आहे. यातूनच एक-एक गुण आपल्या साध्य करता येईल. 2 हजार 25 गुण असलेली ही परीक्षा अशा एक-एक गुणांपासूनच विद्यार्थ्यांना यशापर्यंत घेऊन जाते. स्पर्धा परीक्षा म्हणून असलेले ओझे, दडपण बाजुला ठेऊन अभ्यास केला की गुण संपादनाच्या जवळ जाता येते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची व्याप्ती बहुज्ञान शाखेसमवेत वाढवत परीपूर्ण दृष्टिकोनातून ठेवली पाहिजे. याचबरोबर महत्वाचे म्हणजे नैराश्याला झटकून सहनशीलतेचे बळ अंगी बाळगणे आवश्यक असल्याचा सल्ला सुमितकुमार धोत्रे यांनी दिला.

00000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...