Wednesday, October 6, 2021

कोविड-19 च्या नियमावलीचे काटेकोर पालन करुन प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा

 - प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

नांदेड (जिमाका) दि. 6 :- लोकशाही प्रक्रियेत महानगरापासून गावकुसातल्या प्रत्येक मतदाराचे मत हे अत्यंत मोलाचे आहे. मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये याची खबरदारी निवडणूक विभाग घेऊन सर्व नियोजन करते. मतदारांनीही आपला हक्क बजावण्यासाठी पुढे सरसावून देशातील लोकशाही प्रक्रियेला भक्कम करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. 

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची पूर्वतयारी याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली आज देगलूर येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम आदी वरिष्ठ अधिकारी आणि विविध राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देतांना मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांनी जर त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरणे प्रलंबित असतील तर त्यांनी ज्या पक्षाकडून ते निवडणूक लढवित आहेत त्या पक्षाला वस्तुस्थिती कळविली पाहिजे. पक्षानेही अशी जर माहिती असेल तर ती आपल्या पक्षाच्या संकेतस्थळावर दर्शवून जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने लोक प्रहरी विरुद्ध भारत सरकार व इतर आणि पब्लीक इंट्रेस्ट फाउंडेशन आणि इतर विरुद्ध भारत सरकार व इतर या प्रकरणाच्या निकालात स्पष्ट केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आपण निवडणूक प्रक्रियेला सामोरे जातांना प्रत्येकाच्या जीवाची काळजी घेण्याला प्राधान्य दिले आहे. या निवडणूकीत मतदान करणारे मतदार, उमेदवार आणि निवडणूक यंत्रणेत सहभागी होणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह बुथ एजंट पर्यंत लसीकरणाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. शासकीय यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण याबाबत खात्री करुनच निवडणूक प्रक्रियेत सर्व स्टाफ नेमला जात आहे. इतरांसाठीही कोविड-19 बाबतची नियमावली उपलब्ध करुन दिली असून प्रत्येकाने कोविड-19 बाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करीत आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले. 

80 वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदार, तृतीयपंथी मतदारांना काही आजार असले तर त्यांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे यादृष्टिने स्वतंत्र ॲप तयार केला असून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. दिव्यांग व्यक्तींनी पूर्वकल्पना दिली तर व्हीलचेअर पासून इतर व्यवस्था मतदान केंद्रातर्फे केली जाईल, असे देशपांडे यांनी स्पष्ट करुन मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

00000



 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित

तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 6:- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 805 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 330 एवढी झाली असून यातील 87 हजार 663 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 असे एकूण 2 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 1 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज 15 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 37 हजार 514

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 34 हजार 45

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 330

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 663

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-14

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

00000

 जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 103 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. 7 ऑक्टोंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, अरबगल्ली, खडकपुरा, रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, खडकपुरा, अरबगल्ली रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस कोव्हॅक्सीन लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद,हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 5 ऑक्टोंबर 2021 पर्यंत एकुण 15 लाख 62 हजार 890 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 5 ऑक्टोंबर 2021 पर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 13 लाख 47 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 45हजार 120 डोस याप्रमाणे एकुण 16 लाख 92 हजार 150 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 सोयाबीन काढणीनंतर पिकाची काळजी घ्यावी   

नांदेड (जिमाका) दि. 6 :- गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सतत येणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे व ज्यांची काढणी सुरू असून सोयाबिन काढणी नंतर सुरक्षित आणि उंच ठिकाणी ढिग करून ताडपत्री अथवा मेनकापड झाकुन ठेवावे अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्या आहे. 

खोलगट किंवा सखल भागात सोयाबिन साठवून  ठेवू नये.खराब आणि ओलसर असलेले सोयाबिन स्वतंत्र ठिकाणी ठेवावे.ऊन पडल्यास ते वाळवावे पुढील वर्षाच्या हंगामासाठी न भिजलेले चांगल्या दर्जाचे सोयाबिन मळणी करताना साठवून ठेवावे.या सोयाबिनची  अधून मधून उगवन क्षमता तपासावी 70 टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवावे. उन्हाळी हंगामा मध्ये सोयाबीन  15 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधी मध्ये पेरणीकरून बिजोत्पादन करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...