Friday, October 23, 2020

 

170 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

89 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 23 :- शुक्रवार 23 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 170 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 89 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 43 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 46 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 625 अहवालापैकी  1 हजार 511  अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 576 एवढी झाली असून यातील  16  हजार 906 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 43 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 43 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात तीन जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवार 22 ऑक्टोंबर रोजी हडको नांदेड येथील 57 वर्षाचा एक पुरुष, भोकर येथील 70 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर शुक्रवार 23 ऑक्टोंबर 2020 रोजी सिडको नांदेड येथील 50 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 498 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 7, मुखेड कोविड केंअर सेंटर 1, किनवट कोविड केंअर सेंटर 4, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 5, माहूर कोविड केंअर सेंटर 1, कंधार कोविड केंअर सेंटर 1,खाजगी रुग्णालय 35, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, बिलोली कोविड केंअर सेंटर 4, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 90, नायगाव कोविड केंअर सेंटर 5, लोहा कोविड केंअर सेंटर 2, हदगाव कोविड केंअर सेंटर 4 असे  170 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.18 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 25, किनवट तालुक्यात 5, मुदखेड 1, मुखेड 1, उमरी 1, परभणी 3, नांदेड ग्रामीण 1, भोकर 1, देगलूर 3, कंधार 1, यवतमाळ 1 असे एकुण 43 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 21, अर्धापूर तालुक्यात 2,  मुदखेड 3, देगलूर 7, मुखेड 1, माहूर 1, नायगाव 1, किनवट 4, भोकर 1, बिलोली 1, कंधार 1, उमरी 2, हिंगोली 1 असे एकूण 46 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 43 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 151, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 512, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 47, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 30, हदगाव कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 14, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 15, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 6,  मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 9, मुदखेड कोविड केअर सेटर 7, माहूर कोविड केअर सेंटर 23, किनवट कोविड केअर सेंटर येथे 26, धर्माबाद कोविड केअर सेंटर 10, उमरी कोविड केअर सेंटर 7, कंधार कोविड केअर सेंटर येथे 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, भोकर कोविड केअर सेंटर 11,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 24, लातूर येथे संदर्भीत 1, हैद्राबाद येथे संदर्भीत 2 झाले आहेत. 

शुक्रवार 23 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 72, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 84 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 4 हजार 287

निगेटिव्ह स्वॅब- 82 हजार 530

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 576

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 16 हजार 906

एकूण मृत्यू संख्या- 498

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.18

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 280 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 43

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 43.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  जिल्ह्यात रविवार 8  नोव्हेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 25 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रविवार 8 नोव्हेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000 

 

राष्ट्रसंघ दिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा

ध्वज राष्ट्रध्वजासमवेत उभारावा

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  संयुक्त राष्ट्रसंघ दिनानिमित्त शनिवार 24 ऑक्टोंबर 2020 रोजी जिल्ह्यातील ज्या शासकीय कार्यालयावर दररोज राष्ट्रध्वज लावण्यात येतो. त्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजासमवेत संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज उभारण्यात यावा. 

भारतीय ध्वजसंहिता नुसार जेव्हा राष्ट्रध्वजाच्या बरोबर संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज फडकविण्यात येतो तेंव्हा तो सामान्यत: ध्वजस्तंभाच्यासमोर उभ्या असलेल्या प्रेक्षकांच्यादृष्टिने त्याच्या अगदी डावीकडे राष्ट्रध्वज असावा. 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघ दिन म्हणुन साजरा करणे हा वार्षिक कार्यक्रम आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक दि. 18 ऑक्टोंबर 2012 रोजी दिलेल्या सुचनानुसार योग्य ती कार्यवाही करुन त्याचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश संबंधीत कार्यालयांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत. 

0000

 

रोपवाटीकेच्या उभारणीसाठी 50 टक्के अनुदान

अहिल्यादेवी होळकर योजना :

शेतकऱ्यांना अर्ज करण्यास 2 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेंतर्गत राज्यात 500 रोपवाटीकांची उभारणी करण्यात येणार आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आदी व इतर भाजीपाल्याची प्रत्येक रोपवाटीका उभारणीसाठी 4 लाख 60 हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 50 टक्के म्हणजे, 2 लाख 30 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अथवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पध्दतीने सोमवार 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करावा लागेल. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन किमान एक रोपवाटीका उभारण्याचे प्रस्तावीत आहे. भाजीपाला रोपवाटीकेसाठी एक हजार चौरस मिटरचा सव्वातीन मिटर उंचीचे शेडनेटगृह (सांगाडा) एक हजार चौरस मिटरचे प्लास्टीक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर, 62 प्लास्टीक क्रेट यांचा रोपवाटीकेच्या प्रकल्पात समावेश असेल. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीकेसाठी पाण्याची कायमची सोय आवश्यक असेल. महिला कृषि पदवीधारकांना पहिले प्राधान्य असेल. महिला गट, महिला शेतकऱ्यांना दुसरे, तर भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी गटांना तिसरे प्राधान्य असेल. 

रोपवाटीका पुर्णपणे नव्याने उभारायची आहे. पात्र अर्जानुसार सोडत पध्दतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्राधान्यक्रमानूसार निवड केली जाईल. तालुक्याला प्राप्त उदिष्टानुसार स्थळाची पाहणी करून हमीपत्र घेतल्यावर उदिष्टाच्या अधीन राहून पूर्वसंमती देण्यात येईल. त्यानंतर पंधरा दिवसाच्या आत काम सुरू करून तिन महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे.

अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांचा परवाना

रोपवाटीकाधारकास बियाणे कायदा 1966 अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक राहील. उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडुन पहिली तपासणी केल्यावर 60 टक्के अनुदान बँक खात्यात जमा होईल. रोपांची प्रत्यक्ष विक्री अथवा उचल झाल्यावर मंडळ कृषि अधिकाऱ्यांनी दुसरी तपासणी केल्यावर 40 टक्के अनुदान बँक खात्यावर दिले जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर जेंव्हा

उंबरठ्यातील आदिशक्तीला बोलते करतात...           

नांदेड (जिमाका) दि. 23 :-जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवर जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची वस्तुस्थिती व पाहणी करण्याच्या उद्देशाने मुदखेड येथे दौऱ्यावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना मुगट गावात उंबरठ्यावर अभ्यास करीत असलेल्या आदिशक्तींना भेटण्याचा मोह आवरता आला नाही. मुगट गावातील आरोग्य केंद्राची पाहणी करुन परतत असतांना त्यांनी एका घरासमोर गाडी थांबविण्यास सांगितले. गाडीतून उतरत त्यांनी एका घराकडे वळत दरवाजात अभ्यास करत असलेल्या दोन मुलींशी मनमोकळ्या गप्पा मारुन त्यांचे भावविश्व मोकळे केले. यातील एकीचे नावे पुष्पा ज्ञानेश्वर कदम तर दुसरी दिपिका रामकिशन कदम. पुष्पा दहावीत तर दिपिका चौथीत शिकते. 

या दोन्ही मुलींचे आई-वडिल शेती करतात. शाळा कोविड-19 मुळे बंद असल्यामुळे या बहिणींची शाळा ओसरीवर सुरु होते. यातील एक दहावीत शिकत आहे तर दुसरी चौथीत. घरी तिच्या फक्त भावाकडेच असलेला मोबाईल शिक्षणासाठी तिने जवळ ठेवलेला. मोबाईलच्या माध्यमातून ती गणिताचा सराव करत असतांना कोणीतरी एक महिला आपल्या जवळ बसून बोलते आहे या कृतीमुळे तिचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही आपली ओळख न देता मोकळा संवाद साधल्याने तिच्या स्वप्नांना आणखी बळ घेता आले. 

शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी हिरमुसले आहेत. त्यांच्यात कुठेही नैराश्य येऊ नये, अभ्यासाप्रती कटिबद्धता वाढावी यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांशी उपलब्ध असलेल्या संसाधनाच्या माध्यमातून सतत संपर्कात राहण्याचे एक अभियान आम्ही लवकरच सुरु करत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले. मुगट गावात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थींनींची अधिक संख्या असल्याने या गावची तशी वेगळी ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असेही त्या म्हणाल्या. 

मुगट येथे जिल्हा परिषदेची हायस्कूल पर्यंत शाळा असून एकुण 16 वर्ग, 14 शिक्षक तर 365 पटसंख्या आहे. यात मुलींची संख्या 188 आहे. 

0000

 



महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...