Friday, October 23, 2020

 

रोपवाटीकेच्या उभारणीसाठी 50 टक्के अनुदान

अहिल्यादेवी होळकर योजना :

शेतकऱ्यांना अर्ज करण्यास 2 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेंतर्गत राज्यात 500 रोपवाटीकांची उभारणी करण्यात येणार आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आदी व इतर भाजीपाल्याची प्रत्येक रोपवाटीका उभारणीसाठी 4 लाख 60 हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 50 टक्के म्हणजे, 2 लाख 30 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अथवा तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पध्दतीने सोमवार 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करावा लागेल. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन किमान एक रोपवाटीका उभारण्याचे प्रस्तावीत आहे. भाजीपाला रोपवाटीकेसाठी एक हजार चौरस मिटरचा सव्वातीन मिटर उंचीचे शेडनेटगृह (सांगाडा) एक हजार चौरस मिटरचे प्लास्टीक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर, 62 प्लास्टीक क्रेट यांचा रोपवाटीकेच्या प्रकल्पात समावेश असेल. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटीकेसाठी पाण्याची कायमची सोय आवश्यक असेल. महिला कृषि पदवीधारकांना पहिले प्राधान्य असेल. महिला गट, महिला शेतकऱ्यांना दुसरे, तर भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी गटांना तिसरे प्राधान्य असेल. 

रोपवाटीका पुर्णपणे नव्याने उभारायची आहे. पात्र अर्जानुसार सोडत पध्दतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्राधान्यक्रमानूसार निवड केली जाईल. तालुक्याला प्राप्त उदिष्टानुसार स्थळाची पाहणी करून हमीपत्र घेतल्यावर उदिष्टाच्या अधीन राहून पूर्वसंमती देण्यात येईल. त्यानंतर पंधरा दिवसाच्या आत काम सुरू करून तिन महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे.

अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांचा परवाना

रोपवाटीकाधारकास बियाणे कायदा 1966 अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक राहील. उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडुन पहिली तपासणी केल्यावर 60 टक्के अनुदान बँक खात्यात जमा होईल. रोपांची प्रत्यक्ष विक्री अथवा उचल झाल्यावर मंडळ कृषि अधिकाऱ्यांनी दुसरी तपासणी केल्यावर 40 टक्के अनुदान बँक खात्यावर दिले जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...